आरोग्य

आरोग्यदायी गुणधर्म असलेला लिंबू | पुढारी

Pudhari News

डॉ. भारत लुणावत

लिंबातील सर्वात विशेष गुण म्हणजे अत्यंत आंबट असूनही शरीरात गेल्यावर मात्र हे फळ अल्कली घटक निर्माण करते. लिंबाच्या या वैशिष्ट्याचा उपयोग अ‍ॅसिडिटी कमी करणार्‍या काही औषधांमध्ये केलेला दिसतो. लिंबाचे गुणधर्म पुढीलप्रमाणे…

पी. एच. बॅलन्स :  लिंबू हा शरीरातील अ‍ॅसिड—अल्कलीयांचा योग्य समतोल राखतो. त्यामुळेच रोजच्या जेवणात  लिंबाची फोड असणे महत्त्वाचे आहे. हाय प्रोटिन जेवणात (उसळी, मांसाहार वगैरे) लिंबाचा वापर वाढवावा.शरीरात प्रथिने गेल्यावर रक्‍ताचा पी. एच. काहीकाळ अ‍ॅसिडिक बनतो. रक्‍त हे अ‍ॅसिडिक पी. एच. ला योग्य कार्य करू शकत नाही. हा पी. एच. बॅलन्स करण्यास लिंबू उपयुक्‍त ठरतो.

यकृतसंरक्षक : लिंबू हे लिव्हरला लाभदायक आहे. लिंबामुळे पित्तरसाचा घट्टपणा कमी होतो. ज्यायोगे पित्ताशयात खडे बनण्याची प्रक्रिया मंदावते. लिंबूरस हा युरिक अ‍ॅसिडवरदेखील नियंत्रण आणतो.

मुतखड्यावर उपचार : लिंबू, संत्रे, मोसंबी ही तीन फळे काही विशिष्ट प्रकारच्या मुतखड्यांपासून संरक्षण देतात. या तिन्ही फळांमध्ये लिंबात सर्वाधिक सायट्रेट असते. त्यामुळे हा परिणाम लिंबामुळे जास्त आढळून येतो.

आतड्यास फायदा : ज्या व्यक्तींना रोजच्या रोज शौचास साफ होत नाही, ज्यांना गॅसेसची किंवा अजीर्णाची तक्रार आहे, अशांसाठी लिंबू-पाणी हा चांगला घरगुती उपाय आहे. एका पूर्ण लिंबाचा रस कोमट पाण्यातून रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा.

जुलाबावरील जलसंजीवनी :  जुलाब  होत असतील तर मीठ, साखर, पाणी याबरोबर लिंबू रसाचाही उपयोग केल्यास यामधील जंतुहारक गुणाचा फायदा मिळू शकतो. त्याचप्रमाणे प्रतीकारक्षमताही वाढते.

मधुमेहींना फायदा : लिंबातील रुटिन हा घटक नेत्ररक्षक असून, तो मधुमेहींना होणार्‍या डायबेटिक रेटिनोपॅथीपासून संरक्षण देतो.

कर्करोग प्रतिरोधी : लिंबात जवळजवळ 33 कर्करोग प्रतिरोधी घटक सापडले आहेत. उदा. लायमोनिन तेल, ग्लायकोझाईडस्.

लिंबाचे साल आरोग्यदायी : लिंबाच्या सालीमध्ये टॅनजेरेटिन हे फायटोन्यूट्रिएंट आहे. जे पार्किन्सनसारख्या मेंदू विकारांपासून संरक्षण देते. 

सौंदर्यवर्धक गुण : डोक्यातील कोंडा कमी करणे, केसाला नैसर्गिक तजेला देणे, चेहर्‍यावरील, हातावरील टॅन व पिटिका कमी करणे अशामध्ये लिंबाचा पोटातून व बाह्यत: उपयोग होतो.

नियम : लिंबू थेट चोखू नये. अन्न किंवा पाण्याबरोबर घ्यावे. त्वचेलादेखील लिंबू दूध, पाणी, ग्लिसरीन अशा माध्यमातून लावावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT