डॉ. भारत लुणावत
जर्दाळू हा सुकामेव्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. जर्दाळू ओला आणि सुका दोन्ही प्रकारे खाऊ शकतात. हे फळ मूळ आर्मेनियामधील आहे असे म्हटले जाते; मात्र भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत याचे उत्पादन मुबलक प्रमाणात होते. चवीला आंबट गोड असे हे फळ शरीराचे उत्तम पोषण करते. शरीरासाठी आवश्यक सर्व पोषक घटक यामधून मिळू शकतात. जर्दाळूच्या आत असणारी बी फोडली की त्यातही बदामासारखी दिसणारी बीदेखील अत्यंत चविष्ट लागते.
जर्दाळूमध्ये सी जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. डोळ्यांसाठीही जर्दाळूचे सेवन फायदेशीर असते. वाढत्या वयात होणारे डोळ्यांचे आजार, डोळे कोरडे पडणे आणि डोळ्यांतून पाणी येणे आदी समस्यांमध्ये जर्दाळू प्रभावी ठरतो. एक कप कापलेले जर्दाळू सेवन केल्यास ए जीवनसत्त्वाची कमतरता 60 टक्क्यांपर्यंत भरून निघते.
जर्दाळूमध्ये कॅरोटिनॉईड आणि फ्लेवोनॉईड यासारखी अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. हृदयाच्या कोणत्याही विकारात जर्दाळूचे सेवन जरूर करावे. जर्दाळूमध्ये विविध प्रकारचे पोषक घटक असतात जे स्थूलता, मधुमेह यासारख्या आजारांपासून आपला बचाव करतात.
जर्दाळूचे सेवन केल्यास कर्करोग होण्याची शक्यता दूर होऊ शकते. जर्दाळूचा रस, शेक किंवा कच्च्या स्वरूपात जर्दाळू सेवन केल्यास खूप फायदा होतो. त्यातील अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण डीएनए खराब होणे रोखू शकते.
ज्या लोकांना रक्ताची कमतरता भासते त्यांनी जर्दाळूचे सेवन केले पाहिजे. रक्ताची कमतरता कधीच भासू नये असे वाटत असेल, तर नियमितपणे जर्दाळूचे सेवन करावे. जर्दाळूमध्ये असे लोह असते की, जे शरीरात हळुहळू वाढते आणि त्याचा शरीराला फायदाच होतो.
धावपळीच्या जीवनशैलीत कोणाकडेही वेळ नसतो. अगदी घरचे अन्न बरोबर असले तरीही खायला वेळ असेलच असे नाही. मात्र, जेवण टळले की त्याचा परिणाम हळुहळू शरीरावर दिसू लागतो आणि व्यक्तीच्या शरीरात रक्ताची कमतरता जाणवू लागते. व्यक्तीला रक्तपांढरी होऊ शकते; पण जर्दाळू सेवन केल्यास त्याचा फायदाच होतो.
जर्दाळूमध्ये भरपूर तंतुमय पदार्थ असतात. तसेच लॅक्सेटिव्ह गुणही असतात. त्यामुळे बद्घकोष्ठतेचा त्रास असणार्या व्यक्तींना जर्दाळूचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. जर्दाळूमध्ये असलेल तंतुमय घटक पाचक रसाला उत्तेजित करतात. पाचक रसामुळे पोषक घटक शोषून घेणे आणि सहजपणे त्याचे विघटन होण्यासाठी जेवणाचे वर्गीकरण करण्यास मदत करतात. त्याव्यतिरिक्त तंतुमय पदार्थ पचन तंत्र गतिमान करण्यासाठीही मदत करते.
जर्दाळूचा रस तापाने ग्रस्त व्यक्तींना द्यावा. कारण ताप आलेल्या व्यक्तीची ऊर्जा कमी होते, जर्दाळूचा रस दिल्याने शरीराला आवश्यक ती जीवनसत्त्वे, खनिजे, कॅलरी आणि पाणी या सर्वांची पूर्तता होते. तसेच शरीराच्या विविध प्रक्रिया आणि अवयव यांचे शुद्धीकरण किंवा डिटॉक्सिफिकेशन करते.
जर्दाळू शक्यतो उन्हाळ्यात सेवन करावे. त्यामुळे त्वचा उजळते. मुरूम, पुटकुळ्या, त्वचेचा संसर्ग आदींमध्ये जर्दाळूचे सेवन केल्याचा खूप फायदा होतो. जर्दाळूचा वापर करून चेहर्याची त्वचा सुंदर करण्यासाठी मदत होते.
जर्दाळूमध्ये तंतुमय घटकांचे प्रमाण अधिक आहे. ते पचण्यास सुलभ असतात. त्यामुळेच जर्दाळू पचनसंबंधी विकार आणि मूळव्याधीसारख्या विकारांमध्ये मदत करते. पोटातील कृमी नष्ट होण्यासही जर्दाळू मदत करतो.
आपण खूप चांगला आहार सेवन करत असू; पण यकृताचे काम योग्य होत नसेल तर सेवन केलेले अन्न पचत नाही. त्यामुळे यकृताच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. यकृतासाठीही जर्दाळूसारखे दुसरे उपयुक्त फळ नाही.
यकृतावर आपल्या आहाराचा खूप जास्त आणि खूप लवकर परिणाम होतो. त्यामुळे हपेक्टिक स्टाईटोत्स हा आजार जडण्याची शक्यता वाढते; पण जर्दाळू सेवन केल्यास यकृताची आतून स्वच्छता होते आणि हा विकार दूर ठेवण्यास मदत होते.
जर्दाळू हे फळ दिसायला लहानसे असले तरीही त्याच्यात अनेक गुण दडलेले आहेत. त्यामुळे सुका मेव्यातील हे फळ अधिक गुणकारी आहे. त्याचे नियमित सेवन केल्यास शरीराला लोह, सी जीवनसत्त्व यांची कमतरता जाणवणार नाहीच पण रक्ताल्पता, इतर काही विकारही टाळता येतील.