डॉ. राजेंद्र जोशी
आजच्या काळात तासन्तास खुर्चीवर बसून काम करणे ही अनेकांची अपरिहार्यता बनली आहे. सकाळी खुर्चीवर विराजमान झाल्यानंतर मीटिंग, संगणक, भ्रमणध्वनीच्या संगतीत संपूर्ण दिवस निघून जातो. या सततच्या बैठ्या जीवनशैलीचा सर्वाधिक परिणाम पायांवर दिसून येतो.
तासन्तास खुर्चीवर बसून हळूहळू पायांमध्ये जडपणा, आखडलेपणा, झिणझिण्या आणि ताण अशा तक्रारी जाणवू लागतात. काही व्यक्तींना तर दीर्घकाळ बसून राहिल्यानंतर उठताना पायांमध्ये बधिरताही जाणवते. यावर उपाय म्हणून कठोर व्यायाम करण्याची आवश्यकता नाही. कार्यालयातील खुर्चीवर बसल्या बसल्याच करता येणारे काही सोपे व्यायामप्रकार पायांना आरामदायक ठेवण्यास मदत करू शकतात.
घोटे फिरवा : दीर्घकाळ एकाच स्थितीत बसले असाल, तर सर्वप्रथम घोट्यांची हालचाल सुरू करावी. खुर्चीवर आरामात बसून एक पाय किंचित वर उचलावा आणि हळूहळू गोलाकार फिरवावा - प्रथम क्लॉकवाईज आणि नंतर विरुद्ध दिशेने फिरवा. त्यानंतर दुसर्या पायानेही हीच कृती करावी. ही छोटीशी हालचाल पायांतील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते आणि जडपणा कमी करू शकते.
पाय ताणणे : सतत बसून राहिल्याने गुडघे व मांड्यांमध्ये आखडलेपणा येणे सर्वसामान्य आहे. यावर पाय पुढे ताणण्याचा व्यायाम बराच उपयुक्त ठरू शकतो. खुर्चीवर बसून एक पाय समोरच्या दिशेने सरळ ताणावा आणि काही क्षण त्याच स्थितीत ठेवावा. त्यानंतर हळूहळू खाली आणावा. हीच कृती दुसर्या पायाने पुन्हा करावी. टाच व पंजा उचलाः पायांत जडपणा जाणवत असल्यास टाच उचलण्याचा व पंजा उचलण्याचा व्यायाम नित्यक्रमात समाविष्ट करावा. यामध्ये आधी पंजे जमिनीवर टेकवून टाचा वर उचलाव्यात, त्यानंतर टाचा खाली ठेवून पंजे वर उचलावेत. ही सोपी हालचाल पायांचे स्नायू सक्रिय ठेवते आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करते.
गुडघे उचला : सतत बसून राहिल्याने शरीर सुस्त व जड वाटू लागते. यावर गुडघे उचलण्याचा व्यायाम बराच लाभदायक ठरू शकतो. खुर्चीवर ताठ बसून एक गुडघा वर उचलावा, काही क्षण थांबवावा आणि नंतर हळूवारपणे खाली आणावा. हीच कृती दुसर्या पायाने करावी. यामुळे पायांबरोबरच नितंबांतही सौम्य हालचाल राहते आणि शरीर अधिक ताजेतवाने वाटते.
दर तासाला दोन मिनिटांची फेरी : केवळ व्यायाम पुरेसा नाही, तर दीर्घकाळ सतत बसून राहणेही शरीरासाठी योग्य मानले जात नाही. दर तासाला खुर्चीवरून उठून थोडे चालण्याचा प्रयत्न करावा. कार्यालयात असाल तर पाणी घेण्यासाठी जावे किंवा दालनात थोडा फेरफटका मारावा. ही छोटीशी सवय पायांतील आखडलेपणा कमी करण्यास आणि शरीर सक्रिय ठेवण्यास बरीच मदत करू शकते.
हे सोपे व्यायामप्रकार केवळ पायांना विश्रांती देत नाहीत, तर संपूर्ण दिवसभर शरीर अधिक हलके व ऊर्जावान ठेवण्यासही मदत करतात.