Breast cancer | सतत डाय केल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो? 
आरोग्य

Breast cancer | सतत डाय केल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो?

पुढारी वृत्तसेवा

डॉ. मनोज शिंगाडे

केस रंगवणे हा आजच्या काळातील एक सामान्य आणि लोकप्रिय ट्रेंड बनला आहे. आपला लूक बदलण्यासाठी किंवा पांढरे केस झाकण्यासाठी अनेकजण नियमितपणे हेअर डायचा वापर करतात; पण अलीकडच्या संशोधनाने या सवयीविषयी काही गंभीर आरोग्यविषयक प्रश्न उपस्थित केले आहेत.

नॅशनल इन्स्टिट्यूटस् ऑफ हेल्थ या अमेरिकन संशोधन संस्थेने केलेल्या सिस्टर स्टडी नावाच्या मोठ्या अभ्यासात 45,000 हून अधिक महिलांचा डेटा तपासण्यात आला आणि त्यातून काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले. या अभ्यासानुसार, कायमस्वरूपी (परमनंट) हेअर डाय नियमित वापरणार्‍या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका थोडासा वाढलेला आढळला. विशेष म्हणजे, कृष्णवर्णीय महिलांमध्ये हा धोका 45 टक्क्यांपर्यंत जास्त, तर गोर्‍या महिलांमध्ये सुमारे 7 टक्क्यांनी वाढलेला दिसला. या फरकाचे मुख्य कारण म्हणजे, उत्पादनांमधील रासायनिक घटकांची रचना, त्वचेच्या शोषणशक्तीतील फरक आणि वापराचे प्रमाण असे मानले जाते.

हेअर डायमधील रसायनांवर नजर टाकल्यास त्यात अ‍ॅरोमॅटिक अ‍ॅमाईन्स, पॅराफिनील डायमाईन, रेजिन्स, सॉल्व्हेंटस् आणि इतर घटक असतात. ही रसायनं डोक्याच्या त्वचेतून शोषली जाऊ शकतात, श्वसनाद्वारे शरीरात प्रवेश करू शकतात आणि दीर्घकाळ साठल्यास हार्मोनल सिस्टीममध्ये हस्तक्षेप करू शकतात. हार्मोनल असंतुलनामुळे शरीरातील काही पेशींवर परिणाम होतो आणि त्यातून कर्करोगासारख्या गंभीर आजारांची शक्यता वाढते. हेअर डायचा धोका केवळ वापरात नाही, तर वापरण्याच्या पद्धतीतही आहे. दर दोन-तीन आठवड्यांनी केस रंगवणे, हातमोजे न वापरणे, बंद जागेत डाय लावणे किंवा केस पूर्ण मुळापासून रंगवणे या सवयींमुळे त्वचेला आणि रक्तवाहिन्यांना रसायनांचा अधिक संपर्क येतो. हे सर्व घटक मिळून शरीरावर दीर्घकालीन परिणाम घडवू शकतात.

केस रंगवण्याच्या उत्पादनांशिवाय इतर काही सौंदर्यप्रसाधनेही संशोधनाच्या रडारवर आली आहेत. केस सरळ करणार्‍या काही उत्पादनांमध्ये (केमिकल स्ट्रेटनर्स) फॉर्मल्डिहाईडसारखे विषारी घटक आढळतात, जे गर्भाशयाच्या आणि इतर प्रकारच्या कर्करोगाशी संबंधित आहेत. त्यामुळे सौंदर्यप्रसाधनांचा वापर करताना सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.

केस रंगवण्याचे प्रमाण कमी ठेवा.

* शक्य असल्यास व्यावसायिक सलूनमध्ये प्रशिक्षित व्यक्तीकडूनच डाय लावून घ्या, जेणेकरून रसायनांचा थेट संपर्क टाळता येईल.

* घरच्या घरी रंग लावताना हातमोजे आणि मास्क वापरा.

* उत्पादन खरेदी करताना त्यातील घटक तपासा. कमी रासायनिक आणि नैसर्गिक घटक असलेले डाय निवडा.

* या विषयातील संशोधन अद्याप सुरू आहे; पण संशोधनाने ‘थोडासा धोका’ हा वापरलेला शब्द दुर्लक्षून चालणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT