Health Risks of Obesity
स्थूलपणाचे आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात.  Pudhari File Photo
आरोग्य

स्थूलपणामुळे हाेणारे घातक परिणाम अन् त्‍यावरचे उपाय

पुढारी वृत्तसेवा

डॉ. प्राजक्ता पाटील

स्थूलपणाचे आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात. हे परिणाम आपले जगणे तर मुश्कील करतातच; पण दुसरीकडे आपले आरोग्य पोखरत राहतात. स्थूलपणाचे अनेक शारीरिक, मानसिक दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात. खास करून स्थूलपणा आपल्या शरीराच्या चयापचय क्रियेवर खूप गहिरा परिणाम करतो. स्थूलपणामुळे आपल्या चयापचय क्रियेवर विपरीत परिणाम होतो. याला वैद्यकीय भाषेत ‘मेटाबॉलिक सिंड्रोम’ असे म्हणतात. यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाढणे यांशिवाय पुढील रोग होतात.

स्थूलपणामुळे होणारे आजार

1. स्ट्रोक, 2. कोरोनरी हार्ट डिसीज, 3. स्तनाचे रोग, 4. गॉलब्लॅडर आणि यकृताचे आजार, 5. श्वसनासंबंधी समस्या, 6. झोपेशी संबंधित अ‍ॅप्निया आदी समस्या, 7. पुरुषांमध्ये नपुंसकता व स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या तक्रारी निर्माण होणे अशा समस्या उद्भवतात. 8. ऑस्टिओअर्थ्रायटिस, 9. रक्तात मेद जमा होणे असे एकूण 12-13 प्रकाराचे आजार एकट्या स्थूलपणामुळे होतात. त्यामुळे यावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे; अन्यथा जिवावरही बेतू शकते. भारतात स्थूलपणामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण 15 टक्के इतके आहे.

स्थूलपणावर उपाय

स्थूलपणा हा धोकादायक विकार असला, तरी असाध्य नाही. वेळीच आवर घालून व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून स्थूलपणापासून मुक्त होता येते. सर्वप्रथम आपल्या खाण्यापिण्यावर थोडे नियंत्रण ठेवावे. सतत खाणे टाळावे. त्याऐवजी एका विशिष्टवेळी पोटभर खावे. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण उपाशी राहणे टाळावे. उपाशी राहिल्यामुळे चयापचय क्रियेचा तोल जातो व इन्सुलिनच्या प्रमाणावर व रक्तदाबावर त्याचा परिणाम होतो. ताणतणावयुक्त जीवनशैली टाळावी. मनःशांतीसाठी ध्यानधारणा व प्राणायाम इत्यादी गोष्टी कराव्यात. त्याचबरोबर व्यायामावर भर द्यावा. कारण, साचलेली चरबी कमी होण्यासाठी व्यायामाला पर्याय नाही. पायाची पोटाची हालचाल करणारे व्यायाम करावेत. झोपण्याची व उठण्याची वेळ ठरवून घ्यावी. कमी झोपणे व अतिझोपणेही टाळावे.

SCROLL FOR NEXT