आरोग्य

हृदयाच्या झडपांचे आरोग्य | पुढारी

Pudhari News

डॉ. कौशल पांडे

कोरोना व्हायरसनंतरच्या आयुष्याचा विचार करताना असे दिसते, की या काळात भारतासारखे विकसनशील देश पुनश्‍च असंसर्गजन्य (नॉन-कम्युनिकेबल डिसिज-एनसीडी) आजारांचा भार कमी करण्याच्या कामाला लागतील. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या मते, 'भारतामध्ये होणार्‍या एकूण प्रौढ मृत्यूंमागील सुमारे 60 टक्के मृत्यूंचे कारण कार्डिओव्हॅस्क्युलर आजारासह (सीव्हीडी) असंसर्गजन्य आजार हे आहे. एक चतुर्थांश (26 टक्के) मृत्यू हे सीव्हीडींमुळे होतात आणि सर्व सीव्हीडींमध्ये कोरोनरी आर्टरी आजाराच्या पाठोपाठ सर्व वयोगटांमध्ये सरसकट सर्वाधिक प्रमाणात आढळणारा दुसर्‍या क्रमांकाचा आजार म्हणजे हार्ट व्हॉल्व्हचा किंवा हृदयाच्या झडपेशी संबंधित आजार होय. नवजात शिशूपासून ते प्रौढ व्यक्‍तींपर्यंत कोणालाही हार्ट व्हॉल्व्हचा आजार होऊ शकतो.

त्यात एकतर रक्‍तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो किंवा तो अनैसर्गिकरीत्या उलट फिरू शकतो. याची लक्षणे अत्यंत मूक, लक्षात न येण्याजोगी आहेत. कारण, आपले संपूर्ण आयुष्य हा आजार घेऊन जगणारे आणि त्याबद्दल अनभिज्ञ असणारे अनेकजण आहेत. तुम्हाला तीव्र लक्षणे जाणवत असतील किंवा तुमच्या बाबतीत झडपेची समस्या किरकोळ स्वरूपाची असू शकेल किंवा तुम्हाला जराही लक्षणे जाणवत नसतील, तरीही सगळ्यांना वेळेवर उपचारांची गरज भासू शकेल. म्हणूनच या महामारीच्या काळामध्ये तुम्ही घरात अडकून पडला असताना धाप लागणे, छातीत दुखणे, हृदयाची धडधड वाढणे, पायाचे घोटे, पावले यांना सूज येणे किंवा पोटात दुखणे व भूक मंदावणे अशा लक्षणांकडे मात्र दुर्लक्ष करता कामा नये.

हृदयाच्या झडपेविषयी

हृदयाला चार झडपा असतात ज्या रक्‍तप्रवाह योग्य दिशेने व्हावा, याची काळजी घेत असतात. या झडपांमध्ये मिट्रल व्हॉल्व्ह, ट्रायक्युस्पिड व्हॉल्व्ह, पल्मनरी व्हॉल्व्ह आणि ओरटिक व्हॉल्व्ह यांचा समावेश असतो. या झडपांना लिफलेटस् म्हणून ओळखले जाणारे कप्पे असतात, ज्यांना लिफलेटस् असे म्हणतात. हृदयाच्या एखाद्या कप्प्यातून पुढे निघालेले रक्‍त पुन्हा त्याच कप्प्यामध्ये जाऊ नये, यासाठी त्यांची उघडझाप चालू असते. काही वेळा या झडपा नीट उघडत किंवा बंद होत नाहीत व त्यामुळे हृदयातून जाणार्‍या रक्‍तप्रवाहामध्ये अडथळा येतो. सुद‍ृढ रक्‍तप्रवाह शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण, त्याद्वारे शरीराला सातत्याने ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो.

झडपा निकामी होण्याचे दोन प्रकार आहेत. एकाला रिगर्गिटेशन असे म्हणतात, ज्यात झडपांचे कप्पे संपूर्णपणे उघडू शकत नाहीत व पुरेसे रक्‍त प्रवाहित होत नाही. काही लोकांमध्ये हृदयाच्या झडपांची समस्या जन्मजात (को-जेनिटल) असते, तर इतर व्यक्‍तींमध्ये प्रौढत्वाकडे जाताना हा आजार विकसित होतो. 

उपचारांचे संभाव्य पर्याय

झडपांवरील उपचार हे आजाराची स्थिती किती गंभीर आहे, यावर अवलंबून असतात. एकदा का कार्डिओलॉजिस्टने या स्थितीचे चिकित्सात्मक निदान केले की ईसीजी, छातीचा एक्स-रे आणि 2-डी एको कार्डिओग्राफीसारख्या चाचण्या करून निदान पक्के केले जाते. अशा वेळी डॉक्टर्स हृदयाच्या झडपा दुरुस्त करण्याचा किंवा बदलण्याचा सल्ला देतात.

तुम्हाला नादुरुस्त झडपांच्या आजाराचे निदान झाले असेल आणि तुमच्या हृदयाची झडप दुरुस्त करण्यात किंवा बदलण्यात आली असेल, तर हे आपले हृदय सामान्यत: निरोगी ठेवण्यासाठी आयुष्यभर काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

हृदयासाठी पोषक आहाराचे फायदे 

कोलेस्ट्रॉलचे प्रमाण निरोगी असलेल्या लोकांच्या तुलनेत ते अधिक असलेल्या लोकांचे ओरटिक व्हॉल्व्ह अधिक वेगाने अरुंद होत जाते. म्हणूनच शरीरातील कॉलेस्ट्रोलची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सकस आहाराद्वारे हे शक्य आहे. रिफाइंड कार्बोहायड्रेट्ससह प्रक्रियायुक्‍त पदार्थांचे प्रमाण अधिक असलेला आहार टाळा आणि सोडियमचे सेवन कमी करा. विविध फळे आणि ब्रसेल स्प्राऊट्स, कोबी, कॉलिफ्लॉवर किंवा ब्रोकोलीसारख्या भाज्या, स्निग्धांश कमी असलेले किंवा काढून टाकलेले दुग्धजन्य पदार्थ, मासे, पोल्ट्री आणि अखंड धान्ये यांचा आहारात समावेश असू द्या.

व्यायाम, ताणतणाव यांचे व्यवस्थापन 

व्यायामामुळे शरीर बळकट होते व कार्डिअ‍ॅक समस्यांसाठी धोक्याचे घटक असलेल्या उच्च रक्‍तदाब आणि कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या कमी करण्यास मदत होते. दिवसातून किमान अर्धा तास भरभर चालणे, योगा किंवा पोहणे यांसारख्या शारीरिक व्यायामांना आपल्या दिनक्रमाचा भाग बनविण्याचे लक्ष्य बाळगा. कोविड-19 च्या या उदास काळामध्ये सतत या विषाणूशी संबंधित बातम्याच कानावर पडत राहतात. त्यामुळे येणारा ताण, मन शांत करणारे व्यायाम, ध्यानधारणा, शारीरिक हालचाली तसेच आपल्या मित्र व कुटुंबीयांसोबत वेळ घालवून भरकटलेले मन आटोक्यात ठेवा.

देखभालीचा पाठपुरावा करा

आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा आणि नियमितपणे ईसीजी, छातीचा एक्स-रे, सीटी स्कॅन किंवा एमआरआय काढून घेत जा. याशिवाय झडपेच्या रचनेत झालेले बदल आणि हृदयाच्या स्नायूंची ताकद तपासणार्‍या इको कार्डिओग्रामसारख्या अतिरिक्‍त तपासण्यांची गरज आहे का, हेही आपल्या डॉक्टरांना विचारा.

दातांचे आरोग्य अनिवार्य

निरोगी हिरड्या आणि हृदय या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. झडपांच्या आजाराचा सामना करताना तोंड आणि हिरड्यांतील जीवाणू रक्‍तप्रवाहात जाऊ शकतात व हृदयात प्रवेश करू शकतात. असे झाल्यास एन्डोकार्डायटिस नावाचा संसर्ग होऊ शकतो. त्यात व्यक्‍तीच्या हृदयाच्या कप्प्यांचे आतील अस्तर व हृदयाच्या झडपा संसर्गबाधित होऊ शकतात.

व्यसन टाळा

निरोगी हृदय हवे असेल, तर धूम्रपान सोडून द्या. धूम्रपान सोडण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन देणार्‍या एखाद्या आधारगटाचा भाग व्हा. तुम्ही भरपूर मद्यपान करत असाल, तर ते कमी करा. भरपूर मद्यपान केल्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.

आता तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली आहे. आता ट्रान्स आर्टेरियल व्हॉल्व्ह बसविणे/ बदलणे (टीएव्हीआय/टीएव्हीआर) यांसारख्या शस्त्रक्रिया शरीराला कमीतकमी छेद देऊन पार पाडल्या जातात. हे तंत्रज्ञान वयोवृद्ध रुग्णांवर कमीतकमी हस्तक्षेपासह उपचार करण्यास मदत करतात व त्यामुळे वेदना कमी होतात आणि जीवनमान सुधारते. टीएव्हीआय व्हॉल्व्ह हा ओर्टिक स्टेनोसिसच्या साहाय्याने रुग्णाच्या हृदयात बसविला जातो. या शस्त्रक्रियेनंतर फार काळ हॉस्पिटलमध्ये थांबावे लागत नाही, तसेच आपले दैनंदिन आयुष्य पुन्हा एकदा सुरळीतपणे व्यतीत करता येते.

हृदयाला निरोगी राखण्याचे काम हे योग्य जीवनशैलीसाठी केलेल्या उपाययोजनांपासून सुरू होते. आपल्या डॉक्टरांचा सल्ला लवकरात लवकर घ्या आणि उपचाराचा सर्वात चांगला पर्याय कोणता ठरू शकेल, हे विचारून घ्या. लोक ओपन-हार्ट सर्जरीला घाबरायचे. तो काळ आता इतिहासजमा झाला आहे. नवनव्या शोधांमुळे हृदयाच्या देखभालीचे अधिक चांगले मार्ग उपलब्ध झाले आहेत. 330 दशलक्ष लोकसंख्येच्या अमेरिकेमध्ये वर्षाकाठी 85 हजार ओरटिक झडपा बदलण्याच्या शस्त्रक्रिया पार पडतात, ज्यापैकी 40 टक्के शस्त्रक्रिया या टीएव्हीआय/टीएव्हीआर प्रकारातल्या असतात. भारताने या देशाकडून इशारा घ्यायला हवा व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले हृदय निरोगी ठेवायला हवे, असे वाटते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT