खांद्याच्या दुखापती आणि लक्षणे 
आरोग्य

Shoulder Injury : खांद्याच्या दुखापती आणि लक्षणे

वेळीच निदान करण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

डॉ. आदित्य साई

खांद्यातील वेदना अनेकदा साधा स्नायूंमधील ताण समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वेळेवर उपचार न घेतल्यास या समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकतात आणि त्याचा दैनंदिन कामांवर परिणाम होऊ शकतो.

जड वजन चुकीच्या पद्धतीने उचलणे, चुकीच्या पद्धतीने बॅग पाठीवर घालणे, अचानक झटका बसेल अशी कृती करणे, खेळातील दुखापती, सतत मोबाईल व संगणकाचा वापर, बसण्याची चुकीची पद्धत, जिममधील ताण किंवा प्रवास इत्यादींमुळे खांद्यावर ताण येऊ शकतो. यामुळे रोटेटर कफ टिअर, टेंडोनायटिस, फ्रोजन शोल्डर, लिगामेंट दुखापत, डिसलोकेशन आणि स्नायू ताण यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

1) सतत खांदा दुखणे : काही दिवस सतत वेदना होणे हे काही सामान्य नाही. सततची वेदना ही टेंडनला सूज, स्नायू किंवा लिगामेंट दुखापतीचे लक्षण असू शकते.

2) हात वर उचलताना त्रास होणे : डोक्याच्या वर हात उचलताना वेदना होणे किंवा अडचण येणे ही रोटेटर कफ दुखापत किंवा शोल्डर इम्पिंजमेंटचा संकेत असू शकतो. अशावेळी केस विंचरणे, कपडे घालणे किंवा वस्तू उचलणे देखील कठीण होऊ शकते.

3) खांद्यामध्ये अशक्तपणा जाणवणे : जड वस्तू उचलताना किंवा खांद्यावरील जड बॅगमुळे खांद्यमध्ये अशक्तपणा जाणवत असल्यास स्नायू किंवा स्नायुबंधाचे नुकसान झालेले असू शकते.

4) सूज किंवा क्लिकिंगचा आवाज येणे : खांद्याभोवती सूज येणे तसेच हालचालीदरम्यान खटखट किंवा क्लिकिंगचा आवाज येणे हे सांधा अस्थिर होणे, लिगामेंट दुखापत किंवा कार्टिलेजच्या नुकसानीचे लक्षण असू शकते.

5) झोपताना वेदना वाढणे : रात्री झोपताना किंवा एका बाजूला झोपल्यावर वेदना वाढत असल्यास ते खांद्यातील सूज किंवा रोटेटर कफ सारख्या समस्येचे संकेत असू शकतात.

वेळीच उपचार गरजेचे

उपचार न घेतल्यास खांद्याची हालचाल मंदावणे, फ्रोजन शोल्डर, स्नायूंमध्ये तीव्र वेदना तसेच दीर्घकाळ पुनर्वसनाची गरज भासू शकते. सुरुवातीच्या टप्प्यात विश्रांती, बर्फाने शेकणे, वेदनाशामक औषधे, फिजिओथेरपी आणि योग्य शारीरिक स्थिती यांचा फायदा होतो. मात्र, गंभीर स्नायू किंवा लिगामेंट दुखापतींमध्ये आर्थ्रोस्कोपिक रोटेटर कफ रिपेअर किंवा शोल्डर स्टॅबिलायझेशन शस्त्रक्रिया आवश्यक ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT