टोमॅटो आणि किडनी स्टोनचा काय आहे संबंध?  
आरोग्य

Tomato Myths : टोमॅटो आणि किडनी स्टोनचा काय आहे संबंध? 'या' लोकांनी मात्र काळजी घेणे गरजेचे..

काय खरं आणि काय खोटं जाणून घ्या

पुढारी वृत्तसेवा

डॉ. संतोष काळे

टोमॅटो खाल्ल्याने किडनी स्टोन (खडा) होतो, हा समज भारतीय समाजात बराच काळ रूढ आहे. मात्र, यामागील वास्तव समजून घेणे आवश्यक आहे.

टोमॅटोमध्ये ‌‘ऑक्सलेट‌’ नावाचा नैसर्गिक घटक असतो, जो कॅल्शियमशी संयोग पावल्यास काही लोकांमध्ये खडा तयार होण्यास कारणीभूत ठरू शकतो. परंतु, याचा अर्थ असा मुळीच नाही की टोमॅटो प्रत्येकासाठी हानिकारक आहे. खरे तर, ज्यांची किडनी निरोगी आहे आणि ज्यांना यापूर्वी कधीही स्टोनचा त्रास झालेला नाही, अशा लोकांसाठी टोमॅटो पूर्णपणे सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे. टोमॅटोमध्ये केवळ ऑक्सलेट नसते, तर शरीराला आवश्यक असलेली अनेक जीवनसत्त्वे आणि अँटी-ऑक्सिडंटस्‌‍ही असतात. त्यामुळे सामान्य व्यक्तीने आहारात टोमॅटोचा वापर टाळण्याचे काहीही कारण नाही.

या पार्श्वभूमीवर टोमॅटो पूर्णपणे सोडण्याऐवजी तो योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाणे फायद्याचे ठरते. टोमॅटोमधील बिया काढून त्याचा वापर केल्यास ऑक्सलेटचे प्रमाण कमी करता येते. संतुलित आहार आणि पुरेसे पाणी पिणे हे किडनी स्टोन टाळण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग आहेत. त्यामुळे कोणत्याही भीतीपोटी टोमॅटो खाणे बंद करण्याऐवजी, आपल्या प्रकृतीनुसार त्याचा योग्य वापर करणे हितकारक ठरेल. जोपर्यंत आपण त्याचे अतिप्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने सेवन करत नाही, तोपर्यंत टोमॅटो आरोग्यासाठी अपायकारक ठरत नाही. उलट, संतुलित आहारात योग्य प्रमाणात टोमॅटोचा समावेश करणे शरीरासाठी फायदेशीरच ठरते.

सावधगिरी कोणासाठी?

ज्यांना आधीच किडनी स्टोनचा त्रास झाला आहे किंवा ज्यांच्या शरीरात वारंवार खडे तयार होण्याची प्रवृत्ती असते, अशा व्यक्तींनी टोमॅटोचे सेवन मर्यादित ठेवावे. काही रुग्णांना डॉक्टर ‌‘लो-ऑक्सलेट डाएट‌’ घेण्याचा सल्ला देतात, अशा वेळी पालक, बीट आणि टोमॅटो यांसारख्या पदार्थांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. जर तुम्हाला वारंवार स्टोन होत असेल, तर तो केवळ टोमॅटोमुळे नसून शरीरातील पोषक घटकांच्या असंतुलनामुळे असू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT