Dengue Symptoms 
आरोग्य

Dengue Symptoms : सावधान! प्लेटलेटस्ची संख्या योग्य असली तरी डेंग्यू वाढू शकतो; 'या' ७ गंभीर लक्षणांकडे कधीही करू नका दुर्लक्ष

Dengue Symptoms : एडीस डासांचा संसर्ग प्रत्येक शरीरावर करतो वेगळा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

डॉ. संतोष काळे

डेंग्यूच्या आजाराबाबत लोकांमध्ये एक गैरसमज सर्वदूर दिसून येतो. तो म्हणजे, रुग्णाचे प्लेटलेटस्‌ झपाट्याने कमी होतात, तेव्हाच हा आजार गंभीर स्वरूप धारण करतो; मात्र केवळ प्लेटलेटस्‌ सामान्य असणे म्हणजे रुग्ण सुरक्षित आहे असे नाही.

अनेकदा लोक फक्त प्लेटलेटस्‌च्या संख्येकडे पाहून शरीरातील इतर गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करतात; पण काही वेळा ते आजार वाढल्याचे संकेत असू शकतात. एडीस डासांच्या चावण्यामुळे होणारा डेंग्यूचा विषाणू प्रत्येक रुग्णावर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम करतो. काही रुग्णांमध्ये प्लेटलेटस्‌‌ची पातळी अगदी सामान्य असूनही त्यांना प्लाझ्मा लिकेज, अंतर्गत रक्तस्राव, यकृताशी संबंधित समस्या, श्वास घेण्यास त्रास किंवा शॉक लागण्यासारख्या गंभीर गुंतागुंतीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे केवळ प्रयोगशाळेतील अहवालावर अवलंबून न राहता रुग्णाच्या संपूर्ण शारीरिक स्थितीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सतत उलट्या होणे, पोटात तीव्र वेदना, असह्य अशक्तपणा, अस्वस्थता, नाक किंवा हिरड्यांमधून रक्त येणे, लघवीचे प्रमाण कमी होणे आणि श्वास लागणे यासारख्या धोक्याच्या लक्षणांकडे त्वरित लक्ष दिले पाहिजे.

विशेष म्हणजे, डेंग्यूचा सर्वात धोकादायक काळ हा ताप उतरल्यानंतर सुरू होतो, जो साधारणपणे आजाराच्या तिसर्‍या ते सातव्या दिवसाच्या दरम्यान असतो. अनेकदा ताप कमी झाला की, रुग्ण बरा होत आहे असा समज होतो. प्रत्यक्षात याच काळात रुग्णाची सर्वात जास्त काळजी घेणे आवश्यक असते. तसेच, प्लेटलेटस् कमी असलेल्या प्रत्येक रुग्णाला बाहेरून त्या देण्याची गरज नसते. हा निर्णय केवळ संख्येवरून घेतला जात नाही, तर रुग्णाचा रक्तदाब, शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि इतर अवयवांची स्थिती पाहून डॉक्टर निश्चित करतात.

पावसाळ्याच्या काळात डेंग्यूचा प्रसार वेगाने होत असल्याचे दिसून येते. अशावेळी स्वउपचार टाळून डॉक्टरांचा सल्ला घेणे हितकर ठरते. विशेषतः वेदनाशामक गोळ्या स्वतःहून घेऊ नयेत. कारण, यामुळे शरीरांतर्गत रक्तस्रावाचा धोका वाढू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT