डॉ. हंसा योगेंद्र
नाभीमध्ये तेल घालण्याची प्राचीन पद्धत आयुर्वेदामध्ये नाभी चिकित्सा म्हणून ओळखली जात असे. शरीराच्या मध्यभागी असलेल्या नाभीला अनेक नाड्यांचे केंद्र मानले जाते. आयुर्वेदानुसार नाभी शरीरातील 72,000 नाड्यांशी जोडलेली असते, म्हणूनच या ठिकाणी योग्य पद्धतीने तेल टाकल्यास विविध समस्या दूर होऊ शकतात.
सतत 21 दिवस दररोज रात्री नाभीमध्ये तेल टाकल्यास शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. केवळ ही एक कृती करून आपण पचनसंस्था, त्वचा, झोप, हार्मोन संतुलन, तणाव अशा अनेक गोष्टी नियंत्रित करू शकतो. नाभीच्या खाली अग्निकेंद्र असते, जे आपल्या पचनसंस्थेवर आणि मूत्रसंस्थेवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे ज्यांना अपचन, गॅस, अॅसिडिटी यांसारख्या त्रासांची तक्रार असते, त्यांनी शुद्ध खोबरेल तेलामध्ये आले आणि पुदिन्याच्या इसेन्शियल ऑईलचे काही थेंब मिसळून नाभीमध्ये टाकावे. 21 दिवसांपर्यंत ही कृती केल्यास पचनक्रिया सुधारते.
त्वचेवर नैसर्गिक चमक येते : दररोज झोपण्यापूर्वी नाभीमध्ये शुद्ध खोबरेल तेल किंवा बदाम तेलाचे काही थेंब टाकल्यास शरीर आतून हायड्रेट होते. त्यामुळे त्वचा कोरडी न राहता मृदू आणि तेजस्वी होते. या उपायामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकतो.
हार्मोन्सचे संतुलन : ज्यांना मासिक पाळी दरम्यान त्रास होतो, हार्मोनल असंतुलन असते, त्यांनी कोमट कॅस्टर ऑइल (एरंडेल तेल) नाभीमध्ये टाकल्यास फायदा होतो. या उपायामुळे मासिक पाळीत होणार्या वेदना कमी होतात आणि हार्मोन्स संतुलनही राखले जाते.
द़ृष्टी सुधारते : 21 दिवसांपर्यंत दररोज नाभीमध्ये गायीचे शुद्ध तूप किंवा फक्त तिळाचे तेल (बाजारात मिळणारे पामतेलमिश्रित तेल नव्हे) टाकल्यास डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो आणि द़ृष्टी अधिक स्पष्ट होते. संगणक, मोबाईल वापरामुळे डोळ्यांना थकवा येणार्यांसाठी हा उपाय उपयुक्त ठरतो.
तणाव आणि झोपेवर सकारात्मक परिणाम : तणाव, चिंता किंवा झोपेच्या समस्यांमुळे त्रस्त असणार्यांसाठी लव्हेंडर किंवा कॅमोमाईल तेलाने नाभीवर हलक्या हाताने मसाज केल्यास तणाव कमी होतो. मन शांत होते आणि झोप अधिक गाढ लागते. अरोमा थेरपीसारखा हा नैसर्गिक उपाय सहज करता येतो.
शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत : नीम तेल किंवा कॅस्टर ऑईल नाभीमध्ये टाकल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे यकृत (लिव्हर) अधिक कार्यक्षम राहते आणि शरीर शुद्ध होते. ही कृती नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रियेचा भाग ठरते.
तेल घालण्याची योग्य पद्धत :
* स्वतःच्या गरजेनुसार तेल निवडा.
* निवडलेले तेल थोडे गरम म्हणजे कोमट करा.
* झोपण्याआधी नाभीमध्ये 2-3 थेंब टाका. त्याहून जास्त नको.
* बोटाच्या टोकाने हलक्या हाताने मसाज करा.
* तेल रात्रभर तसेच राहू द्या, सकाळी अंघोळीच्या वेळी स्वच्छ धुवा.
आधुनिक विज्ञान : नाभी शरीरातील वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांना नियंत्रित करणारे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे नाभीमार्गे औषधी तेलाचा वापर केल्यास शरीराला थेट फायदा होतो. आधुनिक विज्ञानातही त्वचेच्या नाजूक भागांतून औषधशोषण सिद्ध झाले आहे.
नाभीमध्ये तेल घालण्याची आयुर्वेदीय पद्धत ही सहजसोप्या आणि नैसर्गिक उपायांपैकी एक आहे. सतत 21 दिवस ही क्रिया केल्यास शरीर, मन आणि इंद्रियांचे संतुलन सुधारते, अशी प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्राची धारणा आहे. आधुनिक जीवनशैलीत आलेल्या असंतुलनाला सामोरे जाण्याचा हा एक सुरक्षित आणि प्रभावी उपाय ठरतो, जो आजच्या धकाधकीच्या जीवनातही सहज अवलंबता येतो.