डॉ. मनोज शिंगाडे
आजकाल कुरकुरीत आणि चांगली भाजलेली तंदुरी रोटी, ब्रेडचे जळालेले कोपरे, बटाटा चिप्ससारखे पदार्थ खाणे अनेकांना आवडते. ही चव अतिशय मोहक वाटते आणि सोशल मीडियावर अनेक सेलीब्रिटी व इन्फ्लुएन्सरसुद्धा अशा अन्नाचे फोटो टाकत असल्यामुळे हा ट्रेंड झपाट्याने वाढतो आहे; मात्र असे अन्न खाण्याच्या सवयी आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतात.
अतितळलेल्या किंवा क्रिस्पी अन्नपदार्थांमध्ये आरोग्यावर विपरीत परिणाम करणारे घटक तयार होतात. विशेषतः ज्यावेळी अन्न अतिजास्त तापमानावर भाजले किंवा तळले जाते, तेव्हा त्यातील पोषकतत्त्वे नष्ट होतात आणि काही हानिकारक रासायनिक संयुगे निर्माण होतात. ही संयुगे दीर्घकाळ शरीरात गेल्यास गंभीर आजार उद्भवू शकतात. सर्वात प्रथम याचा परिणाम पाचनतंत्रावर होतो. असे अन्न पचवायला जड असते आणि त्यामुळे अपचन, सूज, गॅस, पोटफुगी, मलावष्टंभ यासारख्या समस्या वाढतात. शरीराला आवश्यक असलेले फायबरही अशा अन्नातून मिळत नाही.
दुसरा मोठा धोका म्हणजे कर्करोग. जळलेल्या अन्नामध्ये ‘एक्रिलामाईड’ आणि ‘पॉलीसायक्लिक अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन’ हे घटक तयार होतात, जे कर्करोगास कारणीभूत ठरतात. या पदार्थांचे दीर्घकाळ सेवन केल्यास पचनसंस्थेतील किंवा इतर अवयवांतील पेशींमध्ये बदल होऊन कर्करोगाची शक्यता वाढते. अशा अन्नामध्ये उष्णतेमुळे नैसर्गिक जीवनसत्त्वे आणि खनिजद्रव्येही नष्ट होतात. यामुळे शरीरात पोषणतत्त्वांची कमतरता भासू लागते. अशक्तपणा, थकवा आणि त्वचेवर परिणाम दिसू लागतो. शिवाय अन्नाचा चव आणि वास दोन्ही बिघडतो.
अन्नातील साखर व प्रथिनांच्या जळण्यामुळे कडवट चव व दुर्गंधी निर्माण होऊन ती भूक कमी करण्यास कारणीभूत ठरते. याशिवाय हृदयाच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. जास्त तळलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्सफॅट आणि ऑक्सिडाईज्ड फॅटस्चे प्रमाण अधिक असते. हे घटक रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल वाढवतात आणि चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करतात. परिणामी हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. एकंदरीत पाहता कुरकुरीत आणि चविष्ट वाटणारे हे पदार्थ दीर्घकाळ सेवन केल्यास शरीराच्या अनेक अवयवांवर गंभीर परिणाम करू शकतात. म्हणून ताजं, घरचं, कमी तळलेलं आणि नैसर्गिक पोषणमूल्य असलेलं अन्न सेवन करणेच योग्य ठरते. क्षणिक चवेमुळे आरोग्य गमावू नका. चांगले आरोग्य राखण्यासाठी आहारात शहाणपणाने बदल करा.