आरोग्य

 हातांची थरथर आणि आयुर्वेद | पुढारी

Pudhari News

डॉ. आनंद ओक

आयुर्वेदाने वाताच्या बिघाडामुळे होणारे काही आजार सांगितले आहेत. कंपवात हा त्यापैकीच एक विकार! हात, पाय कापणे म्हणजेच थरथरणे या स्वरूपात आढळणारा हा आजार कधी सौम्य तर कधी तीव्र स्वरूपामध्ये त्रास देतो. लिहिताना हात कापणे, एखादी वस्तू पकडली असताना हात कापतो. चहाचा कप नीट स्थिर धरता न येणे, परीक्षेच्या वेळी किंवा इंटरव्ह्यूच्या वेळी मानसिक तणावामुळे किंवा भीतीमुळे हातातील कागदपत्रे इत्यादी वस्तू कापणे, अतिराग किंवा चीड आल्याने, भांडणाच्या वेळी हातपाय कापणे, रात्रीच्या वेळी घाबरल्यामुळेदेखील अंग कापणारे अनेकजण असतात. अतिमद्यपानाच्या परिणामी हातपाय कापतात, तसेच नियमित मद्य घेणार्‍यांनी अचानक मद्यपान बंद केल्यानेदेखील हातपाय कापू शकतात. थोडक्यात, मानसिक कारणे आणि कंपवात यांचा अगदी निकटचा संबंध आहे. 

'कापरे भरणे' किंवा 'थरकाप उडणे' हे वाक्प्रचारदेखील त्यामुळे प्रचलित झाले आहेत. मोठ्या आजारानंतर निर्माण होणारा तात्पुरत्या स्वरूपाचा कंप हा विकृती असत नाही; पण अतिशय शुल्‍लक चिंता, काळजी किंवा भीतीमुळे जर कंप निर्माण होत असेल, तर मात्र अशा वेळी उपचाराची निश्‍चित गरज असते.

वार्धक्यात शरीरातील वात जास्त प्रमाणात वाढलेला असतो आणि स्नायू, नाड्या यांचे बलदेखील कमी झालेले असते. परिणामी, काही लोकांमध्ये हात, पाय आणि डोके या तिन्ही ठिकाणी कंप हे लक्षण आढळते. काही वेळा हा कंप एवढा जास्त असतो, की माणूस नीट स्थिर चालूदेखील शकत नाही. पार्किन्सन्स च्या विकारामुळे आणि लहान  मेंदूमधील दोष, शिरोमिघात यांच्या परिणामीदेखील 'कंपवात' हा विकार आढळून येतो.

लेखनिकाचा कंप/रायटर्स क्रॅम्प

कंपवाताशी साधारण साधर्म्य असणारा हा एक विकार आहे. सततचे लिखाण करणारे तसेच सतत पैसै मोजण्याचे काम करणारे कॅशियर यामध्ये बोटांवर येणार्‍या सततच्या ताणामुळे लिहायला सुरुवात केल्यास बोटे दुखू लागातात, कोपरापासून हातही दुखू लागतो. लिहिण्याचा वेग मंदावतो, पेन धरण्यासाठी अतिरिक्त ताकद लावावी लागते. लिहिताना काही वेळामध्ये थांबावे लागते. प्राथमिक स्वरूपात अशा लक्षणांनी सुरू होणार्‍या विकारात काही काळानंतर हातातल्या वेदना जास्तच जाणवतात. 

अक्षरांचे वळण बिघडते. लिहिण्याची क्षमता व वेग मंदावतो. लिहिण्याच्या जोडीला पेन धरण्यासाठीदेखील जादा ताकद लावावी लागते आणि नंतर पुढच्या अवस्थेत बोटातील ताकद आणखी कमी झाल्याने पेन धरताही येत नाही. या अवस्थेत नोकरी करताना खूपच अडचणी येतात. असे अनेक रुग्ण पाहण्यामध्ये येतात. त्यांना आयुर्वेद उपचारांनी निश्‍चित उपयोग होतो. 

आयुर्वेदिक उपचार

'कंपवात' हा एक वातविकार असल्याने आयुर्वेदीय पद्धतीने शास्त्रीय उपचार दिल्यास यावर चांगला उपयोग होतो. यामध्ये प्रामुख्याने शरीरातील मांस, मेद, धातूंची शक्ती वाढविणारे तसेच जोडीला मनोबल वाढविणार्‍या औषधी व आहाराचा वापर केला जातो, तसेच पंचकर्म उपचारालादेखील अतिशय महत्त्व आहे.

मसाज व शेक

आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या विविध वातशामक औषधांनी केलेल्या तेलाने शरीराला मसाज करणे, काही वेळा व त्यानंतर 'पिडस्वेद' या प्रकारानेे औषधीयुक्त भात व दूध यांच्या सहाय्याने शेक दिला जातो. बहुतांश रुग्णांमध्ये फक्त मसाज देखील उपयोगी पडतो, जो घरच्या घरी करता येतो. तीव्रता जास्त असल्यास बस्ती तसेच शिरोधारा ही पंचकर्म करावी लागतात. केरळीयन पद्धतीने गरम तेलाने मालीश करत शेकणे म्हणजेच पीडिच्छीत हा उपचार विशेष उपयोगी पडतो.

औषधी उपचार

वनस्पतीज औषधांपैकी बला, शुंठी, लाक्षा, शतावरी, कवचबीज, अश्‍वगंधा, दशमुळ, कुचला, एरंड, विदारीकंद, मुशली, ब्राह्मी, जटांमासी, शंखपुष्पी इत्यादी वनस्पती, तर शृंगभस्म, सुवर्णमाक्षिक भस्म, रौप्य भस्म, सुवर्ण भस्म, नागभस्म, अभ्रकभस्म, त्रिवंग भस्म इत्यादी भस्मांचा व यांच्या एकत्रिकरणातून निर्माण झालेल्या औषधांचा वापर केला जातो.

आहार मार्गदर्शन 

आहारातील दूध, तूप, गव्हाचा शिरा, खीर, उडिदाचे घुटे, फळांपैकी आंबा, सफरचंद ही फळे, कोहळ्याच्या वड्या, कोंबडी किंवा बोकडाचे मांस किंवा मटण, सूप, खजूर, बदाम, पिस्ता इत्यादीच्या खीर, डिकांचा लाडू हे पदार्थ नियमितपणे घ्यावे. दुर्धर असा कंपवात उपचारांना अवघड असून पूर्ण बरा होऊ शकत नसला, तरीही आयुर्वेदीय उपचारांनी याचे प्रमाण अथवा त्रासाची तीव्रता निश्‍चितपणे कमी करता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT