डॉ. भारत लुणावत
केस गळणे ही गोष्ट अत्यंत दुःखदायक असते. मग बाई असो की पुरुष प्रत्येकाला केस गळतीचे दुःख होते. पूर्वी अगदी प्रौढ वयात जाणवणारी ही समस्या तरुणांमध्येही दिसून येते. बदलता आहार आणि जीवनशैली यांचा एकत्रित परिणाम म्हणून पुरुष आणि महिला या दोघांमध्येही केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. अर्थात, पुरुषांमध्ये केस गळून टक्कल पडण्याचे प्रमाण अधिक असते. केसाची योग्य काळजी घेणे दोघांसाठी गरजेचे आहेच. पुरुषांनीही केसाची योग्य ती काळजी घ्यायला हवी. त्यामुळे केस गळणे थांबवता येईल.
केस गळणे ही स्त्री किंवा पुरुष कोणासाठीही ही समस्या वेगळी नाही. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही केस गळतीचा त्रास होतो. जीवनशैली आणि आहार यांच्या बदलाचे काही शारीरिक परिणाम दिसून येतात. त्यातील महत्त्वाचे म्हणजे केस गळणे, हा परिणाम. महिलांमध्येही केस गळती होते; पण पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. पुरुषांमध्ये केस गळत असल्यास हळूहळू त्यांना टक्कल पडते. वार्यावर उडणारे त्यांचे केस हळूहळू त्यांची साथ सोडून देतात. त्यामुळे पुरुषांनीही आपल्या केसाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. केसाची काळजी कशी घ्यावी, ते तुटू नयेत म्हणून काय उपाय करता येतील, या गोष्टी आपण समजून घेऊ या.
रोज शँपूचा वापर नको ः ज्या पुरुषांना आपल्या केसाची निगा राखायची आहे, त्यांनी एक गोष्ट जरूर लक्षात ठेवली पाहिजे की, केस सारखे धुवू नयेत. सर्वसाधारणपणे पुरुष रोजच्या रोज केस धुतात; मात्र ते योग्य नाही. आठवड्यातून 2-3 वेळेला शँपूने केस धुवावेत. त्यामुळे केस निरोगी राहण्यास मदत होईल. प्रदूषण, धूळ यांचा मारा होत असल्याने केस खराब होतात. ते स्वच्छ करण्यासाठी मग केस धुताना ते रगडून रगडून स्वच्छ केले जातात; पण केस धुण्याची ही पद्धत नक्कीच चुकीची आहे. त्यामुळे केस गळतात. केस हळूहळू धुतले पाहिजेत. रगडून केस धुतल्याने त्यांची मुळे कमजोर होतात आणि केस गळतात.
हेअर ड्रायरचा वापर अयोग्य ः हल्ली कोणाकडेच वेळ नसतो. त्यामुळे केस धुतले की, ते लवकर वाळावेत. यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला जातो. हेअर ड्रायरमुळे केस वाळतात आणि चांगले सेट होतात हे खरे असले, तरी त्यामुळे केसाचे नुकसान होते. केस कमजोर होतात. म्हणून केस नैसर्गिक पद्धतीने वाळू द्यावेत.
रासायनिक उत्पादनांचा वापर बंद करा ः बाजारात अनेक सौंदर्यप्रसाधने मिळतात. त्यात केसांसाठीही अनेक उत्पादने मिळतात; पण सातत्याने रसायनयुक्त उत्पादनांचा वापर केल्यास त्याचा केसांवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे केस अशक्त होतात आणि तुटतात. त्यामुळे केसाला हेअर जेल, हेअर वॅक्स, हेअर स्प्रे आणि इतर काही केसांची उत्पादने वापरण्याआधी काळजी घ्या. केसाची स्टाईल करतानाही वरील सौंदर्यउत्पादनांचा कमीत कमी वापर करावा.
अंड्याचे कंडिशनर ः केसाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अंड्यांचा उत्तम उपयोग करता येतो. अंड्यांमध्ये मुबलक प्रथिने आणि खनिजे असल्याने केसांचे चांगले पोषण होण्यासाठी मदत होते. केसांना अंडे लावल्यास केस रेशमी, मजबूत आणि मुलायम होतात. केस नियमित ट्रिम करून घेतल्यास केसांची काळजी योग्य पद्धतीने घेता येते. त्यामुळे केस स्वच्छ राहतातच, तसेच योग्य प्रकारे सांभाळताही येतात. शक्यतो महिन्यातून एकदा केस जरूर थोडे कापावेत.
क्लोरीनपासून केसाचा बचाव ः क्लोरीन केसाचे नुकसान करते. त्यामुळेच क्लोरीनपासून केसांचा बचाव केला पाहिजे. त्यामुळे स्वच्छ क्लोरीनमुक्त पाण्याने केस धुवावेत. पोहण्यासाठी जातानाही केसाला स्विमिंग कॅप किंवा केसांना हलक्या हाताने कंडिशनर लावून मग पाण्यात उतरावे.
चांगल्या केसासाठी पोषक आहार ः जीवनशैली आणि आहार सवयी बदलल्याचा परिणाम म्हणून केस गळती होते, हे आपल्या लक्षात आले असेलच. पुरुषांनी केसांची काळजी घ्यावी किंवा देखभाल करावी. ती कशी, तर योग्य पोषक आहाराचे सेवन करावे. रोज नियमित व्यायाम करावा. शरीराला आवश्यक तेवढे पाणी जरूर प्यावे. त्याव्यतिरिक्त पुरेशी झोप होणे हीदेखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तसेच सकारात्मक विचार करावेत. नकारात्मकता मनाच्या आसपास फिरकू देऊ नये.
वरील काही गोष्टी जाणीवपूर्वक पाळल्या तर केस गळतीवर त्याचा फायदा होईलच; पण एकूणच जीवनशैलीही आरोग्यदायी होईल.