निरोगी आतडे केवळ पचनास मदत करत नाही, तर एखाद्याच्या प्रजनन क्षमतेतही महत्त्वाची भूमिका बजावते. आतडे निरोगी नसल्यास इस्ट्रोजनचे असंतुलन आणि प्रजनन समस्यांची शक्यता वाढते.
आतडे आणि प्रजनन क्षमता यांच्यात एक संबंध आहे. आतड्याची योग्य काळजी घेतल्याने प्रजनन क्षमता आणि गर्भधारणेची शक्यता देखील वाढते. निरोगी आतडे हे पचनास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.
आतड्यात असे बॅक्टेरिया असतात जे अन्नाचे पचन होण्यास, पोषक तत्त्वे शोषण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. या जीवाणूंच्या गटाला आतड्यांचा मायक्रोबायोम असे म्हणतात. जेव्हा आतडे निरोगी असते, तेव्हा ते स्त्रियांमध्ये ओव्हुलेशन आणि नियमित मासिक पाळीसाठी आवश्यक असलेल्या इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारख्या हार्मोन्सचे योग्य संतुलन राखण्यास मदत करते. आणि पुरुषांमधील शुक्राणूंच्या निर्मितीस देखील फायदेशीर ठरते.
अँटिबायोटिक्स किंवा झोपेच्या कमतरतेमुळे आतड्यांचे आरोग्य बिघडते. आतड्यांची जळजळ गर्भाशयाच्या अस्तरावर परिणाम करू शकते, ज्यामुळे गर्भाचे रोपण करणे कठीण होते. हार्मोनल असंतुलनामुळे मासिक पाळी अनियमित होते, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) किंवा शुक्राणूंची संख्या कमी होते आणि एखाद्याच्या प्रजनन क्षमतेला हानी पोहोचू शकते.
फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. आहारात फळे, भाज्या, तृणधान्य आणि शेंगांचा समावेश करावा. ज्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात अशा आंबवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. प्रक्रिया केलेले आणि शर्करायुक्त पदार्थ खाल्ल्याने आतड्यातील चांगले बॅक्टेरिया खराब होतात आणि जळजळ वाढ ते. संतुलित आहाराचे सेवन करणे, किमान 2-3 लिटर पाणी पिणे आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. कारण, झोपेचा अभाव आणि जास्त ताण आतड्यांचे संतुलन बिघडवू शकते. जळजळ कमी करण्यासाठी दररोज व्यायाम करणे देखील फायदेशीर आहे.