Gum disease | समस्या हिरड्यांच्या आजाराची 
आरोग्य

Gum disease | समस्या हिरड्यांच्या आजाराची

पुढारी वृत्तसेवा

डॉ. निखिल देशमुख

पेरिओडोंटायटिस हा हिरड्या बाधित करणारा संसर्ग आहे. आधुनिक वैद्यकीय परिभाषेत याला हिरड्यांचा प्रगत आजार मानले जाते, जो दातांना आधार देणार्‍या पेशी आणि हाडांना हळूहळू नष्ट करतो. सर्वसामान्यपणे दातांच्या स्वच्छतेकडे होणारे दुर्लक्ष हे या आजाराचे मूळ कारण असते.

आपल्या तोंडात शेकडो प्रकारचे जिवाणू वास्तव्य करत असतात, त्यापैकी काही जिवाणू दातांच्या पृष्ठभागावर अन्नातील शर्करा आणि पिष्टमय पदार्थांच्या मदतीने एक चिकट थर तयार करतात, ज्याला ‘प्लाक’ असे संबोधले जाते. हा प्लाक जर वेळेत स्वच्छ केला नाही, तर त्याचे रूपांतर लाळेतील खनिजांमुळे ‘टार्टर’ किंवा ‘कॅल्क्युलस’ या कडक थरात होते. हा कडक थर दात आणि हिरड्यांच्या फटीत जमा होऊन संसर्गाला सुरुवात करतो. सुरवातीच्या टप्प्यात याला ‘जिंजिव्हायटिस’ म्हटले जाते. यामध्ये हिरड्या लाल होतात आणि दात घासताना रक्त येते. मात्र, या स्थितीत उपचार न मिळाल्यास याचे रूपांतर पेरिओडोंटायटिसमध्ये होते.

या प्रगत अवस्थेत हिरड्या दातांपासून वेगळ्या होऊ लागतात आणि तिथे लहान पोकळ्या निर्माण होतात. या पोकळ्यांमध्ये जिवाणूंचे साम्राज्य पसरते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती या संसर्गाशी लढताना काही रसायने उत्सर्जित करते. दुर्दैवाने, या प्रक्रियेत संसर्गासोबतच दातांना आधार देणारे जबड्याचे हाड आणि लिगामेंटदेखील विरघळू लागतात. पेरिओडोंटायटिसचे स्वरूप इतके गंभीर असते की, बाह्यतः दात निरोगी दिसत असले तरी आतून त्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले असते.

वैद्यकीय संशोधनानुसार, हिरड्यांमधील या दीर्घकालीन संसर्गामुळे निर्माण होणारे जिवाणू आणि त्यांची विषारी द्रव्ये रक्तप्रवाहाद्वारे शरीराच्या इतर भागांत पोहोचू शकतात. यामुळे हृदयविकार, मधुमेह आणि श्वसनसंस्थेचे आजार बळावण्याची शक्यता असते. विशेषतः मधुमेही रुग्णांमध्ये पेरिओडोंटायटिसचे प्रमाण अधिक आढळते आणि या संसर्गामुळे रक्तातील शर्करा नियंत्रित करणे कठीण होते. गरोदर महिलांमध्ये हा संसर्ग अकाली प्रसूतीस कारणीभूत ठरू शकतो, असेही काही अभ्यासांतून समोर आले आहे.

या आजाराची लक्षणे ओळखणे अत्यंत आवश्यक असते. हिरड्यांचा रंग गडद लाल किंवा जांभळा होणे, हिरड्यांना सूज येणे, दात आणि हिरड्यांच्या मधून पू येणे, तोंडाचा तीव्र दुर्गंध येणे आणि दात सैल होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. अनेकदा रुग्ण दात दुखत नाही तोपर्यंत दंतवैद्याकडे जात नाहीत, परंतु पेरिओडोंटायटिस हा बर्‍याच अंशी वेदनारहित असू शकतो. जबड्याच्या हाडाची झीज झाल्यामुळे दातांची मांडणी बदलू शकते आणि चावताना किंवा अन्न खाताना त्रास होऊ लागतो.

दिवसातून दोनदा योग्य पद्धतीने ब्रश करणे, डेंटल फ्लॉसचा वापर करणे आणि दर सहा महिन्यांनी दंतवैद्याकडून तपासणी करून घेणे हाच या आजारापासून वाचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. निर्व्यसनी जीवनशैली आणि पोषक आहार यामुळे हिरड्यांची प्रतिकारशक्ती वाढते आणि पेरिओडोंटायटिससारख्या गंभीर आजाराला प्रतिबंध करणे शक्य होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT