नवी दिल्ली : ग्राहकांना मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आरोग्यासाठी लाभदायक ठरणाऱ्या सुका मेवा व ड्रायफ्रूट्सवर लागू होणाऱ्या वस्तू व सेवा करात (GST) कपात करण्यात आली आहे.
याअंतर्गत खजूर, अंजीर, बदाम, पिस्ते, हेजलनट्स, चेस्टनट्स, मॅकॅडेमिया आणि कोला नट्स यांवरचा जीएसटी आता १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून या संदर्भातील माहिती जाहीर करण्यात आली. मंत्रालयाने म्हटले आहे की, "निरोगी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांनी भरलेल्या या पदार्थांचा दर आता सर्वसामान्यांसाठी अधिक परवडणारा होणार आहे."
पूर्वीची GST स्थिती : या सुका मेव्यावरील जीएसटी दर १२% इतका होता.
नवीन GST स्थिती : आता तो फक्त ५% इतका राहणार आहे.
या निर्णयामुळे नागरिकांना रोजच्या आहारात पोषक आहाराचा समावेश करणे सोपे होईल. ड्रायफ्रूट्स हे प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि हेल्दी फॅट्सचा उत्तम स्त्रोत आहेत. त्यामुळे हृदयविकार, मधुमेह नियंत्रण, स्मरणशक्ती सुधारणा यांसारख्या अनेक बाबींमध्ये त्यांचा मोठा उपयोग होतो.
सरकारच्या या निर्णयामुळे बाजारात सुका मेवा अधिक स्पर्धात्मक दरात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यामुळे उत्सवांच्या काळात तसेच दैनंदिन जीवनात ग्राहकांना मोठा फायदा होईल.आपला दैनंदिन पोषणाचा डोस आता अधिक परवडणारा झाला आहे," असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.