मुलांच्या मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीमधून ग्रोथ हार्मोन रिलीज होत असतात. हे हार्मोन मुलाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. कारण, ते हाडे आणि स्नायूंच्या विकासास मदत करतात.
मुलांच्या योग्य वाढीसाठी या हार्मोनची योग्य पातळी खूप महत्त्वाची आहे. या हार्मोनची कमतरता असल्यास बाळाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही अनुवांशिक भिन्नतेमुळे ग्रोथ हार्मोन स्रवण्याची प्रक्रिया विस्कळीत होऊ शकते. हा बदल पिट्यूटरी ग्रंथीवरदेखील परिणाम करू शकतो.
प्राडर-विली सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम आणि ऑप्टिक डिस्प्लेसिया इत्यादी जन्मजात परिस्थितींसह जन्मलेल्या मुलांमध्ये ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेचा धोका असतो.
ब्रेन ट्युमरसारख्या आजारात मेंदूतील गाठ त्याच्या सामान्य कार्यात व्यत्यय आणू शकते. त्या भागात मेंदूच्या शस्त्रक्रिया किंवा लेझर थेरपी झाल्यास त्याचा ग्रोथ हार्मोनवरही परिणाम होऊ शकतो.
मेंदुज्वर किंवा एन्सेफलायटीस यासारख्या मेंदूवर परिणाम करणार्या संक्रमणामुळे पिट्युटरी ग्रंथीवर दबाव येऊन ग्रोथ हार्मोन कमी होऊ शकतो.
जेव्हा मुलामध्ये या हार्मोनची कमतरता असते तेव्हा त्याची वाढ खुंटते किंवा मंदावते. अशा स्थितीत मूल त्याच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा लहान राहते.
ग्रोथ हार्मोन तारुण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे किशोरवयीन वयात येण्यास विलंब होऊ शकतो. या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे मुलांच्या स्नायूंच्या वाढीवर परिणाम होऊन ते कमकुवत होतात. मुलांचे चयापचयही प्रभावित होऊ शकते. चयापचयाची क्रिया शरीराच्या सर्व अवयवांना ऊर्जा प्रदान करते. ती बाधित झाल्यास मुलामध्ये ऊर्जेची कमतरता दिसून येते. याखेरीज मुलाच्या लिपिड प्रोफाईलमध्ये बदल होऊ शकतात. त्यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. ज्या मुलांची उंची कमी राहते, त्यांना सामाजिक आणि भावनिक आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. यासाठी वेळीच तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घ्यायला हवेत.