डॉ. राजेश जोशी
गॅस्ट्रो एसोफेगल रिफ्लक्स डिसीज (जीईआरडी) हा एक गंभीर आजार आहे. त्याची लक्षणे आणि कारणे समजून घ्यायला हवीत. साधारणपणे पोटातील अन्न पुन्हा उलट अन्ननलिकेत येते आणि जळजळ होते. त्याला गॅस्ट्रो एसोफेगल रिफ्लक्स असे म्हणतात.
गॅस्ट्रो एसोफेगल रिफ्लक्स हा पचनसंस्थेशी निगडीत आजार आहे. त्याला जीईआरडी देखील म्हटले जाते. गॅस्ट्रो एसोफेगल रिफ्लक्समुळे अनेक लोकांना छातीत जळजळ, पित्तप्रकोप आदी समस्यांना तोंड द्यावे लागते. हायटल हार्निया हे जीईआरडीचे मुख्य कारण आहे. छातीत जळजळ होण्याबरोबरच काही लोकांना छातीत वेदना होण्याची समस्याही होऊ शकते. त्यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका आला की काय असे वाटते. गॅस्ट्रो एसोफेगल रिफ्लक्स का आणि कसा होतो, ते जाणून घेऊया!
गॅस्ट्रो एसोफेगल रिफ्लक्स या आजारामध्ये पोटातील अन्नपदार्थ पुन्हा अन्ननलिकेत येतात. त्यामुळे पचनासाठी आवश्यक असलेली आम्ले हीदेखील अन्ननलिकेत जातात. त्यामुळे छातीत जळजळ होऊ लागते. पोटाच्या वारंवार उद्भवणार्या या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यास हानी पोहोचू शकते.
जीईआरडीमध्ये अन्नपचनासाठी लागणारे आम्ल हे पुन्हा वर उलट्या दिशेने अन्ननलिकेत जाते. त्यामुळे छातीत जळजळ होतेच; पण ती वाढल्यास उलटीदेखील होते. त्याशिवाय फुफ्फुसे, कान, नाक किंवा घसा यांनाही त्रास होतो. गॅस्ट्रो एसोफेगल रिफ्लक्सबरोबर इतरही अनेक त्रास होऊ शकतात. जसे अन्ननलिका संकुचित होते.
अन्ननलिकेच्या अंतत्वचेला व्रण पडतात. हा त्रास दीर्घकाळ होत राहिल्यास एक नवी अवस्था निर्माण होते. त्याला बॅरेटस् इसोफेगस होतो आणि वेळेवर या अवस्थेत उपचार न झाल्यास अन्ननलिकेचा कर्करोगही होऊ शकतो.
सातत्याने तणावाखाली राहिल्यास पोटाची अवस्था खराब होते. तणाव आल्यास अॅड्रिनल ग्रंथींमधून अॅड्रेलिन आणि कॉर्टिसोल नावाच्या हार्मोनचे स्राव निघतात. तणावामुळे संपूर्ण पचनसंस्थेमध्ये जळजळ होते. त्यामुळे पचननलिकेला सूज येऊ शकते आणि त्याच्या परिणामस्वरूप शरीरात पोषक घटकांची कमतरता होते.
जीवनशैलीतील बदल हे या आजाराचे मुख्य कारण आहे. अतिमद्यपान, सिगारेट, फास्टफूडचे अतिसेवन आणि अतितणाव यामुळे हे आजार जडतात. तणावाचा परिणाम आपल्या मनोवस्थेवर होतोच शिवाय पचनसंस्थेवरही होतो. त्याव्यतिरिक्त एकाएकी झालेल्या जनुकीय बदलांमुळेही पॅनक्रियाइटिस आणि पित्ताशयात पित्ताचे खडे यासारखे रोग अधिक होतात.
गॅस्ट्रो एसोफेगल रिफ्लक्स, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, फंक्शनल डिस्पेप्सिया, स्थूलता, यकृतात चरबी जमा होणे आणि पेप्टिक अल्सर यासारखे आजार जीवनशैलीशी निगडीत गॅस्ट्रोइटेस्टाईनल रोगांमध्ये सामील आहेत.