डॉ. प्राजक्ता पाटील
शरीराच्या झाकलेल्या भागातील बुरशीजन्य संसर्ग (फंगल इन्फेक्शन) ही एक अत्यंत सामान्य आरोग्य समस्या आहे. जननेंद्रिय, गुदद्वार अशा ठिकाणी हा संसर्ग अनेकांना होतो, तरीही सामाजिक संकोचामुळे अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात किंवा डॉक्टरांकडे जाणे टाळतात. प्रामुख्याने कॅन्डिडा नावाच्या यिस्टच्या अतिवृद्धीमुळे हा त्रास उद्भवतो.
भारतासारख्या उष्ण आणि दमट हवामान असलेल्या देशात घामाचे प्रमाण जास्त असते, अशा ठिकाणी संसर्गाचा धोका अधिक वाढतो. हे संसर्ग जीवघेणे नसले तरी, त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास दैनंदिन जीवनात प्रचंड अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
बुरशीला वाढण्यासाठी उबदार आणि ओलसर जागेची गरज असते. गुप्तांगांचा भाग या संसर्गासाठी अधिक संवेदनशील ठरतो. कडक उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात जास्त घाम येणे, घट्ट आणि हवा खेळती न राहणारे कपडे घालणे यामुळे बुरशीची वाढ वेगाने होते. याव्यतिरिक्त, स्वच्छतेचा अभाव, प्रतिजैविकांचा (अँटिबायोटिक्स) दीर्घकाळ वापर, अनियंत्रित मधुमेह आणि शरीरातील हार्मोनल बदल (उदा. गर्भधारणा किंवा मासिक पाळी) यांमुळे शरीरातील सूक्ष्मजीवांचा नैसर्गिक समतोल बिघडतो आणि संसर्ग वाढतो.
या संसर्गाची लक्षणे स्पष्ट असतात; परंतु सुरुवातीच्या काळात लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. सतत खाज सुटणे, गुप्तांगांच्या ठिकाणी लालसरपणा येणे, जळजळ होणे (विशेषतः लघवी करताना) आणि त्वचेचे पापुद्रे निघणे ही याची प्राथमिक लक्षणे आहेत. महिलांच्या बाबतीत पांढर्या रंगाचा घट्ट स्राव होणे हे देखील एक महत्त्वाचे लक्षण मानले जाते. हा त्रास गंभीर नसला, तरी योग्य उपचार न मिळाल्यास तो वारंवार उद्भवू शकतो, ज्यामुळे जीवनाची गुणवत्ता खालावते.
या समस्येवर उपचार करण्यासाठी अँटिफंगल क्रीम, पावडर किंवा गोळ्यांचा वापर केला जातो; मात्र स्वतःच्या मनाने औषधोपचार करणे अत्यंत धोक्याचे ठरू शकते. उपचार अपूर्ण सोडल्यास बुरशीमध्ये औषधांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि संसर्ग पुन्हा पुन्हा होतो. तसेच, ही लक्षणे काही वेळा इतर गंभीर आजारांशी साधर्म्य दर्शवणारी असू शकतात. त्यामुळे अचूक निदानासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.
प्रतिबंध हा उपचारापेक्षा केव्हाही चांगला असतो. यासाठी वैयक्तिक स्वच्छता राखणे, गुप्तांगांचा भाग कोरडा ठेवणे आणि नेहमी सुती व सैल कपडे वापरणे आवश्यक आहे. तीव्र सुगंधी साबण किंवा रसायनांचा वापर टाळावा. मधुमेह असलेल्या रुग्णांनी आपली रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आणि प्रतिबंधात्मक उपायांची जोड दिल्यास या त्रासातून पूर्णपणे मुक्तता मिळवता येते. उन्हाळ्याच्या दिवसांत अधिक सतर्क राहून स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे हाच यावरील सर्वोत्तम उपाय आहे.