फ्रोझन शोल्डर किंवा अॅडहेसिव्ह कॅप्स्युलायटिस हा खांद्याचा एक सामान्य व दीर्घकालीन विकार आहे. यामध्ये खांद्याच्या सांध्याभोवती असलेल्या ऊतींमध्ये सूज येते, जाडसरपणा व घट्टपणा निर्माण होतो. परिणामी, खांद्याची हालचाल अत्यंत मर्यादित होते. फ्रोझन शोल्डर या विकारामध्ये रुग्णास तीव्र वेदना, खांदा हलवण्यात अडथळा आणि दैनंदिन कामांमध्ये अडचणी जाणवतात. सुरुवातीला सौम्य वाटणारा हा त्रास हळूहळू वाढत जातो. वेदना, हालचालींचा अडथळा आणि स्नायूंचा जडसरपणा यामुळे रुग्ण हैराण होतो. सुरुवातीस हलक्याफुलक्या हालचालींमध्ये अडथळा येतो; पण नंतर दैनंदिन कामांमध्येही अडचण निर्माण होते.
मानवी खांदा हा बॉल-अँड-सॉकेट प्रकारच्या सांध्याचा एक अत्यंत लवचिक व महत्त्वाचा भाग आहे. या सांध्यामध्ये वरच्या हाताचे हाड (ह्युमरस), खांद्याचा पाट (स्कॅप्युला) आणि कॉलर बोन (क्लॅव्हिकल) यांचा समावेश असतो. या सांध्यास वेढून ठेवणार्या ऊतींना कॅप्स्युल म्हणतात. या कॅप्स्युलमध्ये सायनोव्हियल फ्लुईड असतो, जो सांध्यास योग्य प्रमाणात वंगण (लुब्रिकेशन) देतो. फ्रोजन शोल्डरमध्ये या कॅप्स्युलमध्ये सूज येते, ऊती जाडसर होतात आणि चिकट बनतात. याला अॅड्हेशन म्हणतात. त्यामुळे सांध्यामध्ये हालचाल करताना वेदना व अडथळा निर्माण होतो.
1. फ्रीझिंग स्टेज ः या टप्प्यात हळूहळू वेदना वाढतात. संध्याकाळी किंवा रात्री वेदना अधिक जाणवतात. खांद्याची हालचाल कमी कमी होत जाते. हा टप्पा 6 आठवड्यांपासून 9 महिन्यांपर्यंत चालतो.
2. फ्रोझन स्टेज ः या टप्प्यात वेदना काहीशी कमी होते; पण खांद्याचा जडपणा खूप वाढतो. खांदा हलवणे अत्यंत कठीण होते. कपडे घालणे, केस विंचरणे, डबा उचलणे यासारख्या साध्या कामातही अडचण येते. हा टप्पा 4 ते 6 महिने टिकतो.
3. थॉईंग स्टेज ः या टप्प्यात हळूहळू हालचाली पूर्ववत होतात. वेदना कमी होतात व खांद्यामधील जडसरपणा कमी होतो. पूर्ण बरे होण्यासाठी 6 महिने ते 2 वर्षे लागू शकतात.
या विकारामागे ठोस कारण निश्चित नाही; मात्र काही विशिष्ट परिस्थितींमध्ये हा त्रास जास्त आढळतो. मधुमेह (डायबेटीस) : या विकाराच्या रुग्णांमध्ये फ्रोझन शोल्डरची शक्यता अधिक असते. थायरॉईड विकार : हायपोथायरॉईड किंवा हायपरथायरॉईडच्या रुग्णांमध्येही हा त्रास दिसतो. याशिवाय हृदयरोग व पार्किन्सनसारखे आजार असल्यास शस्त्रक्रिया किंवा अपघातानंतर खांद्याची हालचाल कमी झाल्यास ही समस्या अधिक जाणवण्याची शक्यता असते. महिलांमध्ये विशेषतः 40 ते 60 वयोगटात फ्रोझन शोल्डरची समस्या जाणवण्याची शक्यता अधिक असते.
खांद्यामध्ये बोथटपणा आणि सतत वेदना जाणवतात. विशेषतः बाहेरील भागात व कधी कधी वरच्या हातात वेदना जाणवतात.
हालचाल करताना वेदना वाढते.
हालचालींची मर्यादा येतात.
स्वतःहून किंवा दुसर्याच्या मदतीनेही खांदा हलवता येत नाही.
रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, लक्षणे व शारीरिक तपासणी यांच्या आधारे निदान होते. सुयोग्य पद्धतीने उपचार घेतल्यास फ्रोझन शोल्डर सर्जरीशिवाय बरा होतो. उपचाराचा उद्देश वेदना कमी करणे, हालचाल वाढवणे व पुन्हा ताकद येण्यासाठी मदत करणे हा असतो.
फ्रोझन शोल्डरमध्ये रुग्णाने संयम बाळगणे फार महत्त्वाचे असते. हा त्रास बरा होण्यास काही काळ जावा लागतो.
(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ असून शोल्डर आणि अपर लिंब सर्जन आहेत.)