डॉ. सुजाता पटवर्धन,
डॉ. हेमंत पाठक
प्रोस्टेट ग्रंथींशी संबंधित आजार हा वयस्कर पुरुषांमध्ये आढळणारा मुख्यत: आजार आहे. बहुतेक जण या आजाराला सद्यःस्थितीत हवामानातल्या बदलाने, प्रवासामुळे येणार्या ताणाने, वेगवेगळ्या ठिकाणांचं पाणी पिणे, बैठी जीवनशैली इ. गोष्टींमुळे बळी पडतात. प्रोस्टेट मोठे झाल्यामुळे 'लोअर युरिनरी ट्रॅक सिम्पटम्स' दिसतात. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. जेव्हा प्रोस्टेट ग्रंथींमध्ये मायक्रोस्कोपिक एक्सेसिव्ह ग्रोथ होते, त्यामुळे ग्रंथीची अतिरिक्त वाढ होते व ती नुसत्या डोळ्यांनी दिसून येते, तेव्हा त्याला बेनियन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया (बीपीएच) असे म्हणतात.
पुरुषांमध्ये 'बीपीएच'मुळे लोअर युरिनरी ट्रॅकची लक्षणं त्रासदायक असल्याचे लक्षात येते. तरीही, बहुतेक जण डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेत नाहीत किंवा त्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. जोपर्यंत हे दुखणं गंभीर स्वरूप धारण करत नाही आणि त्यात गुंतागुंत निर्माण होत नाही, तोपर्यंत ते हे दुखणे अंगावर काढतात.
वयासोबत प्रोस्टेट ग्रंथींच्या वाढीचे दोन महत्त्वपूर्ण टप्पे असतात. पहिल्यांदा ऐन तारुण्यात प्रोस्टेट ग्रंथींचा आकार दुप्पट होतो. प्रोस्टेट ग्रंथींच्या विकासाचा दुसरा टप्पा साधारणपणे 25 व्या वर्षी सुरू होतो आणि बहुतांश पुरुषांमध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत ही वाढ होत असते. साधारणपणे वाढीच्या या दुसर्या टप्प्यातच बीपीएच होते. बीपीएच झालेले रुग्ण सामान्यपणे रात्री वारंवार लघवीला जायला लागते अशी तक्रार करतात. त्याचबरोबर लघवी होण्यात अडचण होते किंवा मूत्राशय अर्धवटच रिकामं होतं अशाही तक्रारी करतात. प्रोस्टेट ग्रंथी मोठ्या झाल्यामुळे 'लोअर युरिनरी ट्रॅक सिम्पटम्स' दिसून येतात. या लक्षणांशी जुळवून घेण्यासाठी रुग्ण पाणी आणि इतर द्रवपदार्थ घेणं टाळतो.
केवळ प्रोस्टेट ग्रंथींच्या आकारावरूनच आजाराच्या लक्षणांचे गांभीर्य ठरते असे नाही. काही पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथींची थोडीच वाढ झालेली असते; पण त्यांच्यात आजाराची लक्षणे असू शकतात. तसेच काही पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथींचा आकार बराच वाढलेला असतो; पण त्यांच्यात आजाराची खूप किरकोळ लक्षणं दिसतात. जर त्यावर उपचार केले नाहीत तर या आजारामुळे मूत्रवहनाच्या मार्गात अडथळा निर्माण होतो आणि प्रोस्टेटच्या आरोग्यावर परिणाम होतो. या दुखण्याबद्दल त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या आजाराचा किती त्रास होतोय, तुमचं वय काय आहे आणि तुमचं आरोग्य कसं आहे, यानुसार डॉक्टर मदत करू शकतात.
बीपीएचची लक्षणं ही प्रोस्टेटच्या कर्करोगाच्या लक्षणांसारखीही असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांकडे किंवा विशेषज्ञाकडे जाऊन तुमचा आजार किती गंभीर आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
शरीराच्या काही तपासण्या, रेडिओग्राफिक तपासण्या आणि काही लॅब चाचण्या यातून बीपीएचचे निदान केले जाते. शरीराच्या तपासण्यांमध्ये डीआरई (डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन) केले जाते, ज्यामध्ये युरोलॉजिस्ट स्वत: प्रोस्टेट ग्रंथींची तपासणी करतात. अबडॉमिनल आणि पेल्व्हिक अल्ट्रासाउंड चाचणीतूनही प्रोस्टेट ग्रंथींचा आकार मोजता येतो. लॅब चाचण्यांमध्ये पीएसए (प्रोस्टेट-स्पेसिफिक अँटिजेन) चाही समावेश होतो.
लक्षणे :
* सारखे लघवीला जावे लागणे
* लघवी केल्यानंतरही मूत्राशय भरलेले आहे, अशी सारखी जाणीव होत राहणे
* लघवीला लागल्यावर ती 'रोखून धरणे शक्यच नाही' अशी भावना होणे
* लघवीचा मंद प्रवाह
* लघवीचा थेंब थेंब गळतोय असे वाटणे
* प्रवासात असताना मधेच थांबून लघवी करायला लागणे
* लघवीला सुरुवात करताना त्रास होणे
* लघवीसाठी जोर लागणे किंवा त्या जागी दुखणे
*मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असणे.