health Awareness | हाता-पायांना मुंग्या येताहेत? चिडचिड वाढलीय? 
आरोग्य

health Awareness | हाता-पायांना मुंग्या येताहेत? चिडचिड वाढलीय?

पुढारी वृत्तसेवा

डॉ. मनोज कुंभार

आपण शरीराच्या आरोग्यासाठी प्रथिने, कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी याबद्दल नेहमी बोलतो; परंतु शरीराच्या अनेक अत्यावश्यक कार्यांसाठी तितकेच महत्त्वाचे असलेले व्हिटॅमिन बी-12 अनेकदा दुर्लक्षित राहते. थकवा येणे, हातापायांना मुंग्या येणे, स्मरणशक्ती कमी होणे, चिडचिड, चालताना तोल जाणे किंवा रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणे यांसारखी अनेक लक्षणे व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेशी संबंधित असू शकतात, पण याबाबतचे निदानच अनेकदा उशिरा होते.

व्हिटॅमिन बी-12 हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व असून लाल रक्तपेशींची निर्मिती, मज्जासंस्थेचे आरोग्य, मेंदूचे कार्य आणि डीएनए निर्मिती यासाठी अत्यंत आवश्यक आहे. भारतात व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेचे प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त आहे. मोठ्या प्रमाणावर शाकाहारी आहार, पोषणाविषयी अपुरी माहिती, वाढते वय, पचनसंस्थेचे विकार आणि काही औषधांचा दीर्घकालीन वापर यामुळे अनेकांना या कमतरतेचा सामना करावा लागतो. शहरी जीवनशैलीत बाहेरचे अन्न सेवन करण्याचे प्रमाण वाढल्याने ही कमतरता अधिक जाणवते.

हे जीवनसत्त्व नैसर्गिकरीत्या मुख्यतः दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मासे, मांस आणि यकृत यामध्ये आढळते. साहजिकच, पूर्णपणे शाकाहारी किंवा व्हेगन आहार घेणार्‍यांमध्ये बी-12 च्या कमतरतेचा धोका अधिक असतो. मात्र फक्त शाकाहार हेच कारण नाही. पोटातील आम्ल कमी करणारी औषधे, मधुमेहासाठी वापरले जाणारे काही औषधोपचार, पोट किंवा आतड्यांवरील शस्त्रक्रिया, दीर्घकालीन जठर-आतड्यांचे विकार आणि वाढते वय यांमुळेही शरीरात व्हिटॅमिन बी-12 चे शोषण कमी होऊ शकते. सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा, कामात लक्ष न लागणे, चक्कर येणे, श्वास लागणे, त्वचा फिकट दिसणे किंवा जीभ लालसर व दुखरी होणे ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात. कालांतराने मज्जासंस्थेवर परिणाम होऊ लागतो. हातापायांना मुंग्या येणे, बधिरपणा, जळजळ, चालताना अस्थिरता, स्नायूंची कमजोरी, विस्मरण, नैराश्य, चिडचिड आणि मानसिक गोंधळ यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास मज्जातंतूंवरील परिणाम काही वेळा कायमस्वरूपीही ठरू शकतो. गर्भवती महिला, स्तनपान करणार्‍या माता, वृद्ध व्यक्ती, मधुमेहाचे रुग्ण, पचनसंस्थेचे विकार असलेले रुग्ण आणि पूर्णपणे व्हेगन आहार घेणार्‍या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गर्भवती महिलांमध्ये बी-12ची कमतरता असल्यास गर्भाची वाढ, बाळाच्या मेंदूचा विकास आणि मज्जासंस्थेच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. व्हिटॅमिन बी-12ची पातळी टिकवून ठेवण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे संतुलित आहार. दूध, दही, ताक, पनीर आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये बी-12चे चांगले प्रमाण असते. अंडी नियमित खाणार्‍यांना त्यातूनही आवश्यक प्रमाणात बी-12 मिळू शकते. मासे, चिकन आणि मांस हे व्हिटॅमिन बी-12चे उत्कृष्ट स्रोत आहेत. विशेषतः सार्डिन, सॅल्मन, ट्युना यांसारख्या माशांमध्ये त्याचे प्रमाण जास्त असते. शुद्ध शाकाहारी व्यक्तींनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात नियमित समावेश करावा. काही देशांमध्ये बी-12 युक्त धान्ये, वनस्पतीजन्य दूध किंवा फोर्टिफाइड खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. अशा अन्नपदार्थांमधूनही बी-12 मिळू शकते.

मात्र भारतात सर्वच फोर्टिफाइड पदार्थांमध्ये बी-12 असते असे नाही. त्यामुळे खरेदीपूर्वी अन्नपदार्थावरील पोषणमूल्यांचे लेबल तपासणे आवश्यक आहे. अनेकांच्या मनात एक गैरसमज आढळतो की अंकुरित धान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे किंवा मशरूममधून भरपूर व्हिटॅमिन बी-12 मिळते. प्रत्यक्षात हे अन्नपदार्थ आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असले तरी त्यामध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन बी-12चे प्रमाण अत्यल्प किंवा नगण्य असते. त्यामुळे केवळ या पदार्थांवर अवलंबून राहून बी-12ची गरज पूर्ण होत नाही. ज्येष्ठ नागरिकांनी आणि मधुमेहावरील विशिष्ट औषधे घेणार्‍या व्यक्तींनी नियमित आरोग्य तपासणी करून व्हिटॅमिन बी-12ची पातळी तपासून घेणे फायदेशीर ठरते. जर कमतरता जास्त प्रमाणात असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने बी-12च्या गोळ्या किंवा इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते. विशेषतः शरीरात शोषणाचा गंभीर प्रश्न असल्यास इंजेक्शनद्वारे उपचार अधिक परिणामकारक ठरतात. उपचार सुरू झाल्यानंतरही आहारातील सुधारणा कायम ठेवणे तितकेच महत्त्वाचे असते. योग्य वेळी निदान आणि उपचार झाल्यास ही कमतरता सहज भरून निघू शकते आणि शरीराची ऊर्जा, मानसिक कार्यक्षमता तसेच मज्जासंस्थेचे आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT