नखांचे आरोग्य (file photo)
आरोग्य

नखे देतात आरोग्याविषयीचे संकेत; जाणून घ्या नखांविषयीचे आजार, लक्षणे आणि उपचार

नखांचे आरोग्य

पुढारी वृत्तसेवा
डॉ. संतोष काळे

हाता-पायांची नखे ही आरोग्याविषयीचे संकेत देत असतात. विशेषतः, शरीरातील काही पोषकतत्त्वांची कमतरता नखांमधून स्पष्ट दिसू शकते.

फिकट, ठिसूळ किंवा पिवळसर नखे ही अनीमिया, थायरॉईड समस्या किंवा पोषणातील कमी दर्शवतात. काही आजारांची प्राथमिक लक्षणे नखांवरून समजू शकतात. पांढरे डाग, काळसर रेषा किंवा अतिशय मऊ नखे ही यकृत, मूत्रपिंड किंवा फुफ्फुसाच्या आजारांची लक्षणे असू शकतात. लोहाची कमतरता असेल तर नखे पातळ आणि ठिसूळ होतात. प्रथिनांची कमतरता असल्यास नखांवर रेषा दिसतात. कॅल्शियम आणि झिंकची कमतरता बहुतेकदा नखे तुटतात आणि त्यांची वाढ मंदावते. फंगल इन्फेक्शनमुळे नखे पिवळे आणि जाडसर होतात. नखांखालील काळ्या रेषा काही वेळा रक्ताभिसरणातील समस्या किंवा त्वचेच्या आजारांशी संबंधित असू शकतात. याउलट मजबूत आणि निरोगी नखे असणे म्हणजे शरीर निरोगी असल्याचा संकेत असतो. अनेकांना नखांविषयीच्या आजारांची माहिती नसते; पण नखांनाही विविध प्रकारचे आजार होतात.

* बुरशीजन्य संसर्ग (फंगल इन्फेक्शन): बुरशीजन्य संसर्गामुळे नखे पिवळी, जाड आणि ठिसूळ होतात. सार्वजनिक ठिकाणी अनवाणी चालणे, ओलसर वातावरण, आणि स्वच्छतेची कमतरता यामुळे हा संसर्ग होऊ शकतो.

लक्षणे : नखांचा रंग बदलणे, जाड होणे, तुटणे, आणि दुर्गंधी येणे.

उपचार : अँटी-फंगल औषधे, मलम डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरावे.

* ठिसूळ नखे : शरीरात कॅल्शियम, लोह, आणि प्रोटिनची कमतरता, तसेच बाह्य रसायनांचा संपर्क यामुळे नखे ठिसूळ होतात.

लक्षणे : नखे सहज तुटणे, पातळ होणे.

उपचार : आहारात प्रथिने, लोह, आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

नखांवरील रेषा (मेलानोमा) : नखांखालील त्वचेतील रंगद्रव्यांच्या पेशींची अनियंत्रित वाढ झाल्यामुळे ही स्थिती उद्भवते.

लक्षणे : यामध्ये नखांवर काळ्या किंवा तपकिरी रेषा दिसणे, नखांच्या आकारात बदल होणे आणि वेदना होणे.

उपचार : त्वरित त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लवकर निदान केल्यास उपचार प्रभावी ठरतात.

लाईकेन प्लानस : ही एक प्रतिकारशक्तीशी संबंधित त्वचेची समस्या आहे, ज्यामुळे नखांवर परिणाम होतो.

लक्षणे : नखांवर खड्डे पडणे, तुटणे, आणि नखांचा रंग बदलणे.

उपचार : आयुर्वेदिक उपचारांमध्ये कडूलिंबाचे तेल, कोरफडीचा गर, आणि त्रिफळा चूर्ण यांचे मिश्रण नखांवर लावणे उपयुक्त ठरते.

नखांचे आरोग्य टिकवण्यासाठी टिप्स

स्वच्छता : नखे स्वच्छ आणि कोरडी ठेवा. हाताची बोटे, नखे साबण, सॅनिटायजर, हँडवॉश आणि पाण्याने धुवा.

आहार : प्रथिने, लोह, आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

रसायनांच्या संपर्कापासून नखांचे संरक्षण करा. घरकाम करताना हातमोजे वापरा. नखांमध्ये कोणतेही बदल दिसल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. नखे नियमितपणे स्वच्छ करणे आणि कोरडी ठेवणे आवश्यक आहे. नखे केवळ सौंदर्यासाठी नसून, त्यांचे शरीराच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचे कार्य असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT