आरोग्य

गर्भाशयाचे फायब्रॉईड आणि आयुर्वेद | पुढारी

Pudhari News

महिला आयोगाकडे मासिक पाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक वेळा मासिक पाळीच्या विविध तक्रारी असताना सोनोग्राफी केल्यावर गर्भाशयात एक प्रकारची गाठ म्हणजेच 'फायब्रॉईड' असल्याचे निदान होते. असे निदान झाल्यावर आता गर्भाशयाचे ऑपरेशन करावे लागणार, अशी भीतीदेखील अनेक महिलांना असते. या फायब्रॉईडच्या विकाराविषयी आज माहिती घेऊया… 

गर्भाशयाला होणार्‍या गाठींमध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारा हा एक विकार आहे. गर्भाशयातील स्नायू आणि फायब्रस म्हणजेच कठीण पेशीसमूहापासून तयार होणारी ही एक विशिष्ट प्रकारची गाठ असते. अंदाजे तीशीच्या वयातील 20% महिलांना सुप्‍त अवस्थेत हा विकार असूनही त्यांना कोणत्याही तक्रारी न झाल्यास तो कळूनही येत नाही. वयाच्या 35 ते 45 या कालावधीत हा विकार होण्याची  शक्यता जास्त असते. एक मुल झाल्यानंतर वंध्यत्व असणार्‍या स्त्रियांत याचे प्रमाण अधिक आढळते तसेच रजोनिवृत्ती लांबलेल्या स्त्रियांत याची शक्यता अधिक असते. या विकाराच्या उत्पत्तीचे निश्‍चित असे एक कारण अजूनही मिळालेले नाही. तरीही गर्भाशयाच्या स्नायूपेशींच्या संरचनेमध्ये अचानक बदल घडून याची सुरुवात होत असावी, असे मानले जाते. इस्ट्रोजेने हार्मोन्सवर याची वाढ अवलंबून असते असे आढळते. 

हे फायब्रॉईड कधी एक तर कधी संख्येेने अनेक आढळून येतात. संख्येने अधिक असताना काहींची वाढ जास्त वेगाने होते तर काहींची कमी वेगाने होते. कुटुंब नियोजनासाठी हार्मोन्सच्या गोळ्या घेणार्‍या स्त्रियांमध्ये यांची वाढ अधिक वेगाने होते. स्थूलपणा म्हणजेच जास्त वजन असणार्‍या स्त्रियांत थोडी अधिक शक्यता असते. 

फायब्रॉईडचे प्रकार : 

मुख्य गर्भाशयाला होणारे आणि गर्भाशयाच्या खालच्या भागाला म्हणजेच सर्व्हिक्सला होणारे असे दोन प्रकार असतात. यातील मुख्य गर्भाशयाला होणार्‍या फायब्रॉईडचे स्तरानुसार इंट्राम्युरल, सबासिरस, सबम्युकस असे उपप्रकार आढळतात.

फायब्रॉईडमुळे कोणत्या तक्रारी होतात :

फायब्रॉईड  असताना अनेकदा कोणत्याही तक्रारी उत्पन्‍न होत नाहीत. साधारणपणे 25% स्त्रियांना यामुळे तक्रारी जाणवतात. अनेकदा सोनोग्राफी, लॅप्रोस्कोपी इ. तपासणी करताना अचानकपणे फायब्रॉईडचे निदान झाल्याचे आढळते. 

फायब्रॉईडमुळे होणार्‍या तक्रारी या फायब्रॉईडचे स्थान आणि प्रकार आणि आकार यावर अवलंबून असतात. तरीही स्थानाला आर्थिक महत्त्व असते. 

मासिक पाळी :- 

मासिक पाळीच्या वेळी अधिक रजस्त्राव होणे तसेच काही प्रकारात वारंवार मासिक पाळी येणे आणि अधिक रजस्त्राव होणे अशा तक्रारी होतात. मासिक पाळीवेळी पोटातून कळा येणे, तीव्र वेदना, काही वेळा रजस्त्रावावाटे व क्‍वचित गाठी जाणे असाही त्रास होतो.

पोटात दुखणे ः- 

फायब्रॉईडमध्ये उपद्रव निर्माण झालेले असल्यासच पोट दुखणे अशी तक्रार उद्भवते. गर्भाशायला सूज येणे किंवा परिसराला जंतुसंसर्ग होणे, सूज येणे यामुळे पोटात विशेषतः ओटी पोटात दुखते. काही स्त्रियांत पोटाच्या खालच्या भागात जडपणा जाणवणे. तसेच काही स्त्रियांत खालच्या पोटात हाताला गोळा लागणे अशा तक्रारीही आढळतात. 

इतर तक्रारी ः- 

फायब्रॉईडच्या इतर अवयवांवर दाब उत्पन्‍न झाल्यामुळे बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होणे, लघवी करताना वेदना काहीजणांत लघवी अडणे. क्‍वचित काही वेळी किडणीला सूज येणे असे उपद्रवही होऊ शकतात. 

वंध्यत्व ः- 

काहीवेळा फायब्रॉईडमुळे गर्भधारणा होत नाही व वंध्यत्व आलेले आढळते. फायब्रॉईडमुळे गर्भाशयाच्या आकारात झालेला बदल, गर्भाशयाच्या हालचालीतील बिघाड, अतिरिक्‍त स्त्राव, स्त्रीबीज तयार न होणे, गर्भाशयाच्या अंतस्तरावर सूज येणे, गर्भाशयाच्या परिसराला सूज येणे, फॅलोपियन ट्यूब ब्लॉक होणे असे दुष्परिणाम होतात, त्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नसते. 

गर्भिणी अवस्था ः-

दिवस राहिले असताना फायब्रॉईड झाल्यास, गर्भाची वाढ खुंटणे, गर्भपात होणे किंवा दिवस भरण्याअगोरदच मुल जन्माला येणे तसेच डिलिव्हरीनंतर अतिरक्‍तस्राव असे दुष्परिणाम आढळून येतात. 

दुष्परिणाम  ः-

फायब्रॉईडचे वेळीच निदान न झाल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास अतिरजास्रावामुळे रक्‍ताची कमी होऊन अशक्‍तपणा, दम लागणे, पायाचे गोळे दुखणे, चक्‍कर अंधारी येणे, अंगदुखी, चिडचिडेपणा असे दुष्परिणाम होत असतात. 

फ्रायबॉईडचे निदान ः-

प्रत्यक्ष पोटाचे हाताने परीक्षण, योनी परीक्षा, याबरोबरच सोनोग्राफीची तपासणी याद्वारे फायब्राईडचे निदान निश्‍चिती होते. काही वेळा इतरही तपासण्या कराव्या लागतात. 

फायब्राईडवरील आधुनिक उपाय ः-

फायब्रॉईडची नुकतीच सुरुवात असेल ते आकाराने लहान असेल होणारा त्रास प्रमाणात असेल अशावेळी जास्त रक्‍तस्राव थांबवण्यासाठी, त्यांचा आकार कमी करण्यासाठी औषधांनी उपचार केले जातात. मेजोपॉज जवळ आला असेल किंवा कोणत्याही कारणांनी ऑपरेशन करणे शक्य होत नसेल अशावेळी या उपचारांबरोबरच शरीरातील रक्‍ताची टक्केवारी भरून येण्यासाठी रक्‍तवर्धक औषधेदेखील दिली जात असतात. काहीवेळा फायब्रॉईड असूनही कोणताही त्रास होत नसेल अशावेळी दर सहा महिन्यांनी सोनोग्राफीने त्याच्या वाढीचा आढावा घेतला जातो. ज्यावेळी औषधी उपचारांचा उपयोग होत नसेल अशा वेळी मात्र ऑपरेशन केले जाते. 

फायब्रॉईडवरील आयुर्वेदिक उपचार ः-

फायब्रॉईड आकाराने लहान असेल, नुकतेच निदान झाले असेल, तक्रारी फार नसतील तसेच प्रकृती फार खालावलेली नसेल अशावेळी आपण ऑपरेशन टाळण्यासाठी किंवा पुढे ढकलण्यासाठी आयुर्वेदिय उपचारांनी प्रयत्न नक्‍कीच करू शकतो. काहीवेळा आर्थिक परिस्थिती, कमी वय असणे, ऑपरेशनची तीव्र भीती अशा कोणत्याही कारणांनी ऑपरेशन करता येत नसल्यासदेखील रक्‍तस्राव कमी करण्यासाठी होणारा त्रास कमी करण्यासाठी आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण आयुर्वेदिक उपचारांनी नक्‍कीच प्रयत्न करू शकतो. 

औषधी उपचार ः-

फायब्रॉईडवर आयुर्वेदिक उपचार करताना सातत्याने होणारा अतिरक्‍तस्राव थांबवण्यासाठी रक्‍तस्तंभन करणारी, गर्भाशय व परिसरातील दाह व सूज कमी करणारी, असलेला रक्‍तक्षय अशक्‍तपणा दूर होण्यासाठी, बलवर्धन करणारी याचबरोबर शरीरातील बातपित्ताशमन करणारी अशी औषधे सांघिक स्वरूपात वापरावी लागतात. 

यासाठी अशोक, लोघ्र, नागकेशर, जांभूळबी, धातकी, गूळवेलसत्व, पाठा, वरुण, निर्गुडी, शतावरी, अश्‍वगंधा, कायफळ, चंदन इ. तसेच मौक्‍तिक, प्रवाळ, माक्षिक अभ्रक, अकीक, कुकुण्डाण्ड भस्म इ. पासून केलेली संयुक्‍त औषधे प्रकृतीनुसार वापरली जातात. रक्‍तातील हार्मोन्सचे संतुलन निर्माण होण्याच्या द‍ृष्टीने तसेच तणाव नियंत्रणासाठी काहीवेळा ब्राम्ही, जटा यांसी, अश्‍वगंधा, तगर यांचाही उपयोग करावा लागतो. रक्‍तस्राव थांबल्यानंतरच्या कालावधीत फायब्रॉईडची गाठ कमी होण्याच्या द‍ृष्टीने औषधी उपचार केले जातात. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT