डॉ. तन्मय दर्डा
पोटात सतत गॅस धरणे, गॅसेस पास होणे आणि पोट डब्ब झाल्यासारखे वाटणे यामुळे अनेक जण सतत अस्वस्थ असतात. शौचास जाऊन आल्यानंतरही पोट पूर्णपणे साफ झाले नसल्याची भावना त्यांच्या मनात घर करून बसलेली असते. दररोज ते या एकाच विचाराने अक्षरशः दिवसदिवसभर बेचैन असतात. काय आहे ही समस्या?
पोटाच्या विविध तक्रारींसोबतच रुग्णाला तीव्र थकवा, मळमळ आणि कधीकधी पाठदुखीचाही त्रास सहन करावा लागतो. बरेचदा पोट मोठे दिसू लागते. या शारीरिक लक्षणांचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावरही होतो, ज्यामुळे चिडचिड होणे, कामात लक्ष न लागणे, सतत संकोचलेल्या स्थितीत राहणे किंवा भविष्याबद्दल चिंता वाटणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. अनेकांच्या यामुळे आहारसवयीही बिघडतात. काहींना दूध प्यायल्याने पोटात दुखू लागते, तिखट खाल्ल्याने शौचास जावे लागू शकते अशी शक्यता वाटते. वैद्यकशास्रात या समस्येला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (आयबीएस) असे म्हटले जाते. आयबीएस हा एक जुनाट आणि सतत उद्भवणारा विकार असून जगातील सुमारे 11.2 टक्के लोकसंख्येला याचा त्रास होतो. पोटदुखी आणि शौचाच्या सवयींमध्ये होणारे बदल ही याची प्रमुख लक्षणे आहेत. जरी याची नेमकी कारणे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नसली, तरी रोगप्रतिकारक शक्ती, हार्मोन्स आणि मज्जासंस्था यांच्यातील गुंतागुंतीच्या परस्परसंबंधामुळे हा आजार होतो. गेल्या दशकातील संशोधनानुसार मानसिक ताण, अन्नाची अॅलर्जी, संसर्ग, अनुवांशिकता आणि बालपणातील कटू अनुभव हे ‘आयबीएस’ वाढण्यास कारणीभूत ठरतात.
क्लिनिकल संशोधनातून असे दिसून आले आहे की, ‘आयबीएस’च्या 40 ते 80 टक्के रुग्णांमध्ये मानसिक व्याधी, विशेषतः नैराश्य आणि चिंता (अँग्झायटी) आढळतात. मानसिक ताण हा ‘इरिटेबल बॉवेल सिंड्रोम’ (आयबीएस) विकसित होण्यामागील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अलीकडील वैद्यकीय पुराव्यांवरून असे स्पष्ट झाले आहे की, ‘आयबीएस’ हा केवळ पोटाचा विकार नसून तो ‘इरिटेबल बॉवेल’ आणि ‘इरिटेबल ब्रेन’ यांचा एक गुंतागुंतीचा मिलाफ आहे.
विविध प्रयोगांतून असे दिसून आले आहे की, मानसिक ताणामुळे आतड्यांची संवेदनशीलता, हालचाल, स्राव आणि पारगम्यता यावर मोठा परिणाम होतो. या प्रक्रियेमागील मुख्य कारण म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होणे आणि मध्यवर्ती मज्जासंस्था, परिघीय मज्जातंतू व आतड्यांमधील सूक्ष्मजीव (मायक्रोबायोटा) यांच्यात होणारे बदल हे होय. तणावामुळे निर्माण होणारे बदल ‘गट-ब्रेनअॅक्सिस’वर परिणाम करतात आणि त्यामुळे ‘आयबीएस’ची लक्षणे अचानक बळावतात. हा आजार पूर्णपणे तणावाशी संबंधित असल्याने, उपचारांमध्ये तणाव व्यवस्थापनाला सर्वाधिक महत्त्व देणे आवश्यक आहे.
बदलत्या काळात आर्थिक तणाव, कौटुंबिक तणाव, नोकरी-व्यवसायातील ताण अशा अनेक प्रकारांनी ताणाचे साम्राज्य वाढत आहे. या ताणांमुळे आयबीएस बळावण्यास मदत होते. तशातच लघुशंका आणि शौचास जावे लागण्याबाबत या व्यक्तींच्या मनात सतत सुरू असलेल्या विचारचक्रातून एक प्रकारची असुरक्षितता निर्माण होते.
होमिओपॅथीमध्ये केवळ पोटाच्या तक्रारींचा विचार न करता रुग्णाची मानसिक स्थिती, ताणतणाव आणि स्वभाववैशिष्ट्ये यांचा अभ्यास करून औषधोपचार निश्चित केले जातात. कारण केवळ पोटाशी निगडीत ही समस्या आहे असे मानून उपचार केल्यास ते बरेचदा अपूर्ण ठरू शकतात. त्यामुळे रुग्णाच्या अँग्झायटीचे मूळ कारण काय आहे, त्याच्या शौचसवयी कशा आहेत, त्याची जीवनशैली कशी आहे या सर्वांचे आकलन करून, त्यातील बदलांबाबत समुपदेश करून या दोन्हींवर एकत्रितपणे उपचार केल्यास आयबीएसग्रस्त व्यक्ती कायमस्वरुपी निश्चिंतपणाने आयुष्य जगू शकतात.