डॉ. महेश बरामदे
अलीकडेच नेचर मायक्रोबायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार, हैदराबादमधील 84 टक्के आयटी प्रोफेशनल्स फॅटी लिव्हरने ग्रस्त आहेत. तज्ज्ञांच्या मते, हे प्रमाण अत्यंत गंभीर असून याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
आपल्या यकृतामध्ये चरबी जमा होणे याला फॅटी लिव्हर म्हणतात. या चरबी संचयामुळे शरीरातील हा महत्त्वपूर्ण अवयव कमजोर बनतो आणि वेळेत लक्ष दिले नाही, तर त्याचे यकृत सिरॉसिस किंवा लिव्हर कॅन्सरसारख्या गंभीर आजारात रूपांतर होऊ शकते. या अभ्यासामध्ये फॅटी लिव्हरची अनेक कारणे समोर आली असून ती थेट आपल्या दैनंदिन सवयींशी जोडलेली आहेत.
सर्वात मोठे कारण म्हणजे, फास्ट फूड आणि पॅकेटबंद अन्न सेवन. आयटी सेक्टरमध्ये उशिरापर्यंत काम करणे, तयार अन्न खाण्याची सवय, तसेच दीर्घकाळ एका जागी बसून राहणे, हे लिव्हरवर वाईट परिणाम करतात. यामुळे पोटाभोवती चरबी वाढते, जी लिव्हरमध्ये जाऊन साचते आणि हानी पोहोचवते. झोपेची कमतरता आणि सततचा ताणसुद्धा लिव्हरला कमजोर करतो.
आयटी सेक्टर किंवा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये रात्री उशिरापर्यंत काम करणे हे सामान्य आहे. अशावेळी झटपट तयार होणारे पदार्थ खाण्याची सवय लागते; पण हीच सवय लिव्हरवर वाईट परिणाम करते. यासोबतच तासन् तास एकाच स्थितीत बसून राहण्याची सवय पोटाभोवती चरबी वाढवते, जी लिव्हरमध्ये जाऊन साचते आणि हानी पोहोचवते. झोपेची कमतरता आणि कायम असणारा ताण लिव्हरला कमजोर करतो. अनेक जण ताण कमी करण्यासाठी मद्यपानाचा आधार घेतात; पण हे लिव्हरसाठी अधिक हानिकारक ठरते.
फॅटी लिव्हरची ओळख सुरुवातीला कठीण असते. कारण, याची लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत, तरीही जसजशी आजाराची प्रगती होते, तसतसे शरीर काही संकेत देऊ लागते. विनाकारण थकवा जाणवणे, उजव्या बाजूला वरच्या पोटात वेदना होणे, भूक न लागणे, विनाकारण वजन कमी होणे, डोळे किंवा त्वचा पिवळी पडणे, पोट फुगणे, पाय सुजणे, खाज येणे ही सर्व लक्षणे फॅटी लिव्हरची चिन्हे असू शकतात.
ही लक्षणे बराच काळ टिकून राहिली, तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे. वेळेत जीवनशैलीत बदल केल्यास हा आजार टाळता येतो. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आहारात सुधारणा करणे, ताजी फळे, भाज्या, डाळी, संपूर्ण धान्य, नटस्, सुकामेवा यांचा समावेश करावा. तळलेले, पॅकेटबंद आणि साखरयुक्त पदार्थ टाळावेत. रोज किमान 30 मिनिटे व्यायाम करावा. वजन नियंत्रणात ठेवावे. कारण, लठ्ठपणा लिव्हरवर थेट परिणाम करतो.