Eye Health Awareness | डोळ्यांचे आरोग्य आणि सवयी 
आरोग्य

Eye Health Awareness | डोळ्यांचे आरोग्य आणि सवयी

पुढारी वृत्तसेवा

डॉ. मनोज कुंभार

मानवी डोळा ही अत्यंत गुंतागुंतीची जैविक रचना आहे. प्रकाशाचे ग्रहण, प्रतिमेवर लक्ष केंद्रित करणे आणि मेंदूपर्यंत दृश्य संदेश पोहोचविणे या प्रक्रिया सतत सुरू असतात. आधुनिक जीवनशैलीमुळे या यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे. डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम करणार्‍या अनेक समस्या आपल्या दैनंदिन सवयींशी संबंधित आहेत. या सवयींमागील कारणे समजून घेतल्यास डोळ्यांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येते.

जवळच्या वस्तू स्पष्ट दिसण्यासाठी डोळ्यांतील सिलिअरी स्नायू भिंगाचा आकार बदलतात. या प्रक्रियेला ‘अ‍ॅकॉमोडेशन’ म्हणतात. मोबाईल किंवा संगणकाकडे दीर्घकाळ पाहताना ही प्रक्रिया सतत सक्रिय राहते. शिवाय स्क्रीन पाहताना पापण्यांची उघडझाप कमी होऊ शकते. परिणामी अशुपटल अस्थिर होऊन डोळ्यांत कोरडेपणा, जळजळ आणि तात्पुरती धूसर दृष्टी जाणवते. यालाच डिजिटल आय स्ट्रेन म्हणतात. दर 20 मिनिटांनी 20 सेकंद दूर पाहण्याचा नियम डोळ्यांना विशांती देण्यासाठी उपयुक्त ठरतो.

डोळे चोळल्याने कॉर्नियाला धोका

डोळ्यांच्या पुढील पारदर्शक आवरणाला कॉर्निया म्हणतात. वारंवार आणि जोराने डोळे चोळल्यामुळे या आवरणावर यांत्रिक ताण निर्माण होतो. विशेषतः केरॅटोकोनसची प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींमध्ये कॉर्निया पातळ होऊन त्याचा आकार बदलण्याचा धोका असतो. अस्वच्छ हातांमुळे संसर्गाची शक्यताही वाढते.

कॉन्टॅक्ट लेन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा

कॉर्नियामध्ये रक्तवाहिन्या नसतात. त्याला आवश्यक ऑक्सिजन प्रामुख्याने वातावरणातून मिळतो. कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपल्यास कॉर्नियापर्यंत पोहोचणार्‍या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते. त्याचबरोबर सूक्ष्मजंतूंच्या संसर्गाचा धोका वाढतो. विशेषतः जिवाणूंमुळे होणारा मायक्रोबियल केरॅटायटिस हा गंभीर विकार दृष्टीसाठी धोकादायक ठरू शकतो. म्हणून लेन्स वापरताना निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता अत्यावश्यक आहे.

अतिनील किरणांचा पेशींवर परिणाम

सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे डोळ्यांतील ऊतींचे नुकसान करू शकतात. दीर्घकालीन संपर्कामुळे मोतीबिंदूचा धोका वाढू शकतो, तर तीव्र संपर्कामुळे कॉर्नियाला वेदनादायक इजा होऊ शकते. त्यामुळे अतिनील किरणांपासून 99 ते 100 टक्के संरक्षण देणारा चष्मा वापरणे महत्त्वाचे आहे.

लक्षणे नसतानाही नेत्रविकार

काचबिंदूमध्ये दृष्टीसंदेश मेंदूपर्यंत पोहोचविणार्‍या ऑप्टिक मज्जातंतूचे नुकसान होते. सुरुवातीला कोणतीही लक्षणे जाणवत नसल्याने निदान उशिरा होऊ शकते. मधुमेहामुळे दृष्टिपटलातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नियमित नेत्रतपासणीला विशेष महत्त्व आहे.

चुकीचा चष्मा आणि दृष्टीचा ताण

चष्म्याचा नंबर बदलल्यानंतरही जुना चष्मा वापरल्यास प्रतिमा स्पष्ट करण्यासाठी डोळ्यांना अधिक प्रयत्न करावे लागू शकतात. त्यामुळे डोकेदुखी आणि दृष्टीचा थकवा जाणवतो. मात्र, चुकीच्या नंबरचा चष्मा वापरल्याने प्रौढ व्यक्तींचे डोळे कायमचे खराब होतात, असे नाही.

झोप, पोषण आणि अशुपटल

झोपेच्या कमतरतेमुळे अशुपटलाची स्थिरता कमी होऊन डोळ्यांचा कोरडेपणा वाढू शकतो. जीवनसत्त्व अ हे कॉर्निया आणि डोळ्यांच्या पृष्ठभागाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्याच्या तीव्र कमतरतेमुळे रातांधळेपणा आणि गंभीर नेत्रविकार उद्भवू शकतात. संतुलित आहार, पुरेशी झोप आणि योग्य प्रमाणात पाणी पिणे डोळ्यांच्या सामान्य कार्यासाठी उपयुक्त ठरते. डोळ्यांचे आरोग्य टिकविण्यासाठी केवळ स्क्रीनचा वापर कमी करणे पुरेसे नाही. डोळ्यांच्या जैविक कार्यप्रणालीला अनुकूल सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. सतत धूसर दिसणे, वेदना किंवा प्रकाशाचा त्रास जाणवल्यास नेत्रतज्ज्ञांची तपासणी करावी. अचानक दृष्टी कमी झाल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT