आरोग्य

डोळ्यांचे आरोग्य जपताना… | पुढारी

Pudhari News

डॉ. मनोज कुंभार

डोळे ही माणसाला मिळालेली अत्यंत मौल्यवान देणगी आहे. ज्यांना डोळे नाहीत, त्यांनाच डोळ्यांचे महत्त्व उमगत असते. शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव असलेल्या डोळ्यांच्या आरोग्याकडे आपण पाहिजे तेवढे लक्ष देत नाही. आपल्या दृष्टीचे अनेक गोष्टींपासून रक्षण करण्यासाठी काळजी घेतली पाहिजे, हे आपल्यापैकी अनेकांना कधीच कळत नाही. त्यामुळेच डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. डोळ्यांना होणारे विकार आणि यासंदर्भातील समस्या यावर तातडीने उपचार केले तर आपल्या दृष्टीचे रक्षण होऊ शकते. साध्या साध्या उपायांद्वारे आपल्याला डोळ्यांचे आरोग्य चांगले राखता येते. 

सकाळी उठल्या उठल्या प्रथम आपल्या डोळ्यांवर गार पाणी शिंपडावे. दररोज डोळे गार पाण्याने धुतल्यास त्याचे चांगले परिणाम आपल्याला काही दिवसांनी दिसून येतात. उठल्यावर आपल्या तोंडात पाणी भरून घ्या आणि काही सेकंद त्या स्थितीत थांबून राहा. या स्थितीत डोळे बंद ठेवा. तोंडातले पाणी बाहेर काढा. ही क्रिया दोन-तीन वेळा करा. हे झाल्यानंतर आपल्या डोळ्यांची सात-आठ वेळा उघडझाप करा. तसेच डोळे चहूबाजूंनी फिरवा. या क्रियेने डोळ्यांच्या अंतर्गत अवयवांना व्यायाम मिळतो. 

आपल्या डोळ्यांचा प्रखर ऊन, वारे, धूळ, धूर यांपासून बचाव करा. उन्हाळ्यात बाहेर पडताना डोळ्यांना गॉगल लावावा. अंघोळ करताना अतिगरम पाणी वापरू नका. मनावरचा ताण वाढला, वारंवार संतापू लागलात तर त्याचाही विपरीत परिणाम डोळ्यांवर होत असतो. डोळ्यांभोवतीचा भाग चोळू नका. त्यामुळे डोळ्यांना हानी होऊ शकते. झोपण्यापूर्वी कॉफी, दारू पिऊ नका. कॉफी प्यायल्याने रात्री शांत झोप लागत नाही. डोळ्यांच्या आरोग्यासाठी शांत झोप मिळणे अत्यंत गरजेचे असते. त्रिफळाच्या साहाय्याने दररोज डोळे धुणे हा चांगला उपाय आहे. यासाठी एक चमचा त्रिफळाचूर्णाचा वापर करावा.

सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना शुद्ध गायीच्या तुपाचे एक-दोन थेंब नाकात सोडा. या उपचारामुळे आपली दृष्टी चांगली राहण्यास मदत होते. डोळ्यांचे आरोग्य बिघडण्यास आहारात मीठाचे प्रमाण अधिक असणे, नियमित मद्यसेवन करणे, अतिगोड पदार्थ खाणे, उडदापासून बनवलेल्या पदार्थांचे अतिसेवन करणे यांमुळे डोळ्यांचे कार्य व्यवस्थित होऊ शकत नाही. त्याचबरोबर आपला आहार संतुलित नसला तर त्याचाही परिणाम दृष्टीक्षमता कमी होण्यात होतो. पोट साफ नसेल तरीही डोळ्यांचे कार्य व्यवस्थित चालू शकत नाही. दूध, दही, गायीचे तूप, बकरीचे दूध यांसारख्या पदार्थांचा आहारात नियमित समावेश असला तर डोळ्यांच्या आरोग्याचे रक्षण होऊ शकते. मटणसूप, ब्राऊन राईस, मूग या पदार्थांचाही आहारात समावेश असावा. रातांधळेपणा येऊ नये यासाठी आहारात गाजराचा दररोज समावेश करावा. मधाबरोबर आवळ्याचे ज्यूस घेणे उपयोगी ठरते. ढोबळी मिरची, कोबी, भोपळा, टोमॅटो, पालक, आंबे, पपई, पेरू, संत्री, मोसंबी या फळे आणि भाज्यांपासून डोळ्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी अनेक घटकांचा पुरवठा शरीराला होत असतो. मासे आणि अंडी या पदार्थांचीही शरीराला गरज असते.

दिवसभरात ठरावीक अंतराने गार पाण्याने डोळे धुणे हा उत्तम उपचार आहे. संगणकावर आठ-आठ दहा-दहा तास काम करावे लागणार्‍या मंडळींनी एक तासाच्या अंतराने डोळ्यांवर गार पाण्याचा शिडकावा करावा. तसेच संगणकाच्या पडद्यापासून दृष्टी काढून घेऊन दुसर्‍या ठिकाणी नजर एकाग्र करावी. दोन मिनिटांकरिता संगणकाच्या पडद्यावरून अन्यत्र दृष्टी वळवल्यास संगणकातून बाहेर पडणार्‍या किरणांपासून दृष्टीचा बचाव करता येतो. तसेच ठरावीक वेळाने डोळ्यांची उघडझाप करावी. संगणकाचा स्क्रीन हा आपल्या दृष्टीशी समांतर असावा. तो वर किंवा खाली असू नये. संगणकाला प्रोटेक्टिव्ह स्क्रीन बसवावा अथवा डोळ्यांचे रक्षण करणारे चष्मे वापरावेत. अनेक तास संगणकासमोर बसून काम केल्याने संगणकातून बाहेर पडणारी किरणे डोळ्यांवर विपरीत परिणाम करत असतात. एक तासांपेक्षा अधिक काळ टीव्ही पाहू नका. कमी प्रकाशात वाचणे, लिहिणे हे टाळा. या उपायांमुळे आपल्या डोळ्यांच्या आरोग्याचे रक्षण होण्यास मदत होत असते. डोळ्यांचे सूर्यप्रकाशातून बाहेर पडणार्‍या अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी चष्मा अथवा गॉगलपासून संरक्षण होऊ शकते. उन्हाळा अथवा अन्य ऋतूत घराबाहेर पडताना डोळ्यांना गॉगल लावायलाच हवा. कापसाच्या बोळ्यावर गुलाबपाणी शिंपडून त्याची घडी डोळ्यांवर ठेवावी. तसेच काकडीचे काप डोळ्यांवर ठेवून दहा मिनिटांकरिता डोळे बंद ठेवावेत. 

लहान मुलांच्या डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी पालकांनीच काळजी घेतली पाहिजे. लहान मुलांचे डोळे नियमितरीत्या तपासले पाहिजेत. अशी तपासणी करण्यात पालकांनी आळस दाखवता कामा नये. अनेकदा या तपासणीत काहीच निष्पन्‍न होत नाही; मात्र काही लहान मुलांना दीर्घ दृष्टिदोष, लघू दृष्टिदोष असू शकतो. याचे निदान नियमित तपासणीतून होऊ शकते. तसेच साथीच्या आजारांपासूनही लहान मुलांच्या डोळ्यांचा बचाव करता येतो.  लहान मुलांची खेळणीसुद्धा त्यांच्या डोळ्यांना अपायकारक ठरू शकतात.  लहान मुले खेळताना दगड मारणे, तीक्ष्ण वस्तू मारणे, माती फेकणे, मारामारी करणे यांसारख्या प्रकारांतून डोळ्यांना इजा उद्भवू शकते. लहान मुलांच्या हाताला डिटर्जंट पावडर, टॉयलेट क्लीनरसारख्या वस्तू लहान मुलांच्या हाती लागणार नाहीत अशा तर्‍हेने ठेवा. फटाके उडवीत असताना लहान मुलांसोबत थांबा. डोळ्यांच्या डॉक्टरांकडून आपल्या मुलांना डोळ्यांचे व्यायाम कसे करायचे, हे शिकवा. लहान वयात दृष्टी विकसित होत असते. अशा काळात डोळ्यांचे व्यायाम केल्यास त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकतो. 

हल्‍लीच्या तरुण पिढीला सतत्याने संगणकासमोर बसून काम करावे लागते. याशिवाय त्यांना इलाज नसतो; मात्र संगणकासमोर सतत बसल्याने संगणकातून बाहेर पडलेल्या किरणांचा आपल्या दृष्टीवर अनिष्ट परिणाम होत असतो. म्हणून तरुण मंडळींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने संगणकाच्या अनिष्ट परिणामांपासून आपल्या डोळ्यांचे रक्षण केले पाहिजे. अशा मंडळींनी डोळे मिटून घेऊन त्यावर हातांचे तळवे 30 सेकंदांकरिता झाकावेत. तुमच्या डोळ्यांवर ताण पडतो आहे असे वाटल्यावर हा उपाय न विसरता करावा. साठी ओलांडलेल्या ज्या मंडळींना उच्च रक्‍तदाब आहे किंवा मधुमेह आहे, अशा व्यक्‍तींनी आपल्या डोळ्यांची नियमित तपासणी करून घेतली पाहिजे. उच्च रक्‍तदाब, मधुमेह यासारख्या व्याधींमुळे डोळ्यांचे काही विशिष्ट आजार उद्भवण्याची शक्यता असते. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या डोळ्यांच्या आरोग्याकडे नियमित लक्ष द्यायला पाहिजे. 

आयुर्वेदात डोळ्यांच्या आरोग्यासाठी पंचकर्म करण्यास सांगितले आहे. शिरोबस्ती, पद् अभ्यंग, नस्य, तर्पण, पिचू अशाप्रकारे आयुर्वेदात डोळ्यांवर उपचार केले जातात. बुब्बुळाभोवतीच्या भागाचा दाह होत असेल तर अशा व्यक्‍तींनी धणे उकळून तयार केलेल्या काढ्याच्या पाण्याने डोळे धुवावेत. डोळे जळजळ करत असतील तर तसेच ते वारंवार लाल होत असतील तर या उपचाराने आराम मिळतो. डोळे बंद करून त्यावर कोरफड ज्यूस घातलेला कापूस ठेवावा. पंधरा ते वीस मिनिटांकरिता कोरफडीचा रस कापसाद्वारे डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांची आग होणे थांबते. एरंडेल तेलाचे पाच थेंब घेऊन ते डोळ्यांभोवतीच्या भागाला लावल्यास डोळे चुरचुरणे थांबते. बदाम तेलाचा एक थेंब घेऊन तो डोळ्यांच्या वरच्या आणि खालच्या भागास लावल्यास डोळ्यांभोवतीची त्वचा मऊ राहण्यास मदत होते. डोळे धुण्यासाठी झेंडू, चमेली या फुलांचा वापर करणे उपयुक्‍त ठरते. डोळे जर वारंवार लाल होत असतील तर चंदन आणि दूध यांचा लेप तयार करावा आणि तो डोळ्यांवर लावावा. त्रिफळा, तूप, मध, सप्‍तांमृत लोह यांचे मिश्रण हे डोळ्यांच्या विकारांवर अत्यंत गुणकारी ठरते, असे दिसून आले आहे. डोळ्यांभोवती काळी वर्तुळे आली असल्यास त्या ठिकाणी बदाम, खोबरेल अथवा तिळ तेल लावावे. द‍ृष्टी मंदावली असेल तर दररोज गायीच्या शुद्ध तुपाचे एक-दोन थेंब नाकात सोडण्याने चांगला फायदा होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT