डोळे अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असतात. त्यात किंचितही समस्या निर्माण झाली तरी तीव्र वेदना होते. अर्थात, याची तत्काळ लक्षणे दिसून येत असल्याने वेळीच उपाय करता येणे शक्य होते. आपल्याकडे ऋतूबदलाच्या काळात डोळे येणे किंवा पिंक आय ही डोळ्यांशी संबंधित एक सामान्य समस्या दरवर्षी दिसून येते. तिला वैद्यकीय भाषेत कंजेक्टिव्हायटिस म्हणतात.
डोळे येणे ही समस्या अॅक्यूट किंवा क्रॉनिक स्वरूपाची असू शकते आणि बहुतांश प्रकरणांमध्ये दोन आठवड्यांत ती आपोआप बरी होते. मात्र, काही व्यक्तींमध्ये कंजेक्टिव्हायटिसमुळे गंभीर लक्षणे दिसतात. यासाठी त्वरित उपचार घेणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे ही समस्या कोणालाही कधीही होऊ शकते; पण उष्ण आणि दमट हवामानात याचा धोका अधिक असतो.
आपल्या डोळ्यांमध्ये कंजेक्टिव्हा नावाचा एक पारदर्शक आणि पातळ पडदा असतो. तो पापण्यांचा आतील भाग आणि डोळ्याच्या पांढर्या भागावर पसरलेला असतो. हा पडदा संक्रमित झाल्यास किंवा सूज आल्यास त्याला कंजेक्टिव्हायटिस (डोळे येणे) म्हणतात. जेव्हा कंजेक्टिव्हामधील सूक्ष्म रक्तवाहिन्या सूजतात, तेव्हा डोळ्याचा पांढरा भाग लालसर किंवा गुलाबी दिसतो. म्हणूनच याला पिंक आय असेही म्हणतात.
डोळे येण्याची समस्या बॅक्टेरिया, विषाणूंचा संसर्ग किंवा अॅलर्जिक प्रतिक्रिया यांमुळे होऊ शकते. लहान मुलांमध्ये अश्रुनलिका पूर्णपणे न उघडल्यानेही कधी कधी पिंक आयची समस्या निर्माण होते. कंजेक्टिव्हायटिस अत्यंत संक्रामक असतो, त्यामुळे त्यावर त्वरित उपचार करणे आवश्यक असते.
1) व्हायरल कंजेक्टिव्हायटिस : बहुतांश प्रकरणांमध्ये अॅडेनोव्हायरस हे याचे प्रमुख कारण असते. तसेच हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस, व्हॅरिसेला झोस्टर व्हायरस आणि कोरोनासह इतर काही विषाणूही यास कारणीभूत ठरू शकतात. हा प्रकार सहसा एका डोळ्यात सुरू होतो आणि नंतर दुसर्या डोळ्यात पसरतो.
2) बॅक्टेरियल कंजेक्टिव्हायटिस ः काही बॅक्टेरिया संसर्गामुळे देखील कंजेक्टिव्हायटिस होऊ शकतो. व्हायरल आणि बॅक्टेरियल दोन्ही प्रकार संक्रामक असतात आणि संक्रमित व्यक्तीच्या डोळ्यातील स्रावाच्या थेट किंवा अप्रत्यक्ष संपर्कामुळे हा संसर्ग पसरू शकतो.
3) अॅलर्जिक कंजेक्टिव्हायटिस ः धूळ, परागकण, प्राण्यांचे केस इत्यादी अॅलर्जन्सच्या संपर्कामुळे ही समस्या निर्माण होते. विशेषतः ऋतूबदलाच्या काळात हा प्रकार जास्त प्रमाणात दिसतो.
4) रासायनिक संपर्कामुळे होणारा कंजेक्टिव्हायटिस ः डोळ्यांमध्ये रासायनिक पदार्थ, क्लोरीनयुक्त पाणी किंवा धूलिकण गेल्यास हा त्रास होऊ शकतो. बहुतेक वेळा हा प्रकार एकाच दिवसात बरा होतो.
लक्षणे : कंजेक्टिव्हायटिस अस्वस्थ करणारा असतो; पण फार क्वचित द़ृष्टिदोषाचा धोका असतो. तथापि, हा संसर्ग अतिशय वेगाने पसरू शकतो, म्हणून खालील लक्षणे दिसल्यास सावधगिरी बाळगणे गरजेचे असते :
* एका किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये गुलाबी किंवा लालसरपणा दिसणे
* डोळ्यांमध्ये जळजळ, खाज किंवा अस्वस्थता जाणवणे
* सामान्य स्थितीपेक्षा अधिक अश्रू वाहणे
* डोळ्यातून पाणीदार किंवा चिकट स्राव बाहेर पडणे
* डोळ्यांत किरकिर जाणवणे
* डोळ्यांना सूज येणे (विशेषतः अॅलर्जिक कंजेक्टिव्हायटिसमध्ये)
* संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणे
* अॅलर्जी निर्माण करणार्या पदार्थांचा संपर्क
* स्विमिंग पूलमधील क्लोरीनयुक्त पाणी
* लेन्सचा दीर्घकाळ वापर
* डोळ्यांना वारंवार हात लावू नका
* वारंवार हात स्वच्छ धुवा
* टॉवेल, उशांचे अभ्रे, मेकअप सामान इतरांसोबत शेअर करू नका
* रुमाल, उशीचे कव्हर, टॉवेल नियमित धुवा
सुरुवातीच्या टप्प्यावरच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यासाठी द़ृष्टी धूसर झाल्यास, प्रकाशाची जास्त संवेदनशीलता वाटल्यास, डोळ्यांची जळजळ आणि लाली अत्यंत वाढल्यास दुर्लक्ष करू नये.
कंजेक्टिव्हायटिसची उपचारपद्धती त्याच्या कारणांवर अवलंबून असते.
व्हायरल कंजेक्टिव्हायटिसवर कोणतेही विशिष्ट औषध नाही; पण 7-8 दिवसांत लक्षणे आपोआप कमी होतात, असेही दिसून आले आहे. या त्रासामध्ये गरम पाण्यात ओला केलेला कापड डोळ्यांवर ठेवल्यास आराम मिळतो.
बॅक्टेरियल कंजेक्टिव्हायटिस: नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अँटिबायोटिक आय ड्रॉप्स किंवा मलम यांचा वापर केल्यास काही दिवसांत सुधारणा दिसते.
अॅलर्जिक कंजेक्टिव्हायटिस मध्ये अँटी-हिस्टामिन आणि अँटी-इन्फ्लेमेटरी आय ड्रॉप्स दिले जातात.
कंजेक्टिव्हायटिस ही जरी सामान्य डोळ्यांची समस्या असली, तरी ती संक्रामक असल्याने योग्य उपचार आणि स्वच्छतेच्या सवयी आवश्यक असतात. संसर्ग टाळण्यासाठी हात स्वच्छ धुणे आणि वैयक्तिक वस्तू शेअर न करणे, हे सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहेत.