WHO El Nino health risk File Photo
आरोग्य

WHO El Nino health risk: 'एल निनोमुळे भारताला आरोग्याचा मोठा धोका': डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले, WHO चा गंभीर इशारा

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात भारताचा समावेश 'एल निनो'मुळे आरोग्याचा उच्च किंवा अत्यंत उच्च धोका असलेल्या देशांच्या यादीत करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

WHO El Nino health risk:

नवी दिल्ली: देशाच्या अनेक भागांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात भारताचा समावेश आरोग्याचा उच्च किंवा अत्यंत उच्च धोका असलेल्या देशांच्या यादीत करण्यात आला आहे. 'एल निनो'च्या प्रभावामुळे दक्षिण आशियातील हवामानात होत असलेले बदल हे यामागील मुख्य कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे.

'एल निनो' म्हणजे मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागरातील पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान वाढणे होय. यामुळे जगातील हवामानाचे चक्र बिघडते आणि प्रशांत महासागरापासून दूर असलेल्या प्रदेशांमधील पाऊस व तापमानावर मोठा परिणाम होतो.

अहवालात काय?

जागतिक आरोग्य संघटनेचा 'ग्लोबल पब्लिक हेल्थ सिच्युएशन ॲनालिसिस: एल निनो २०२६' हा अहवाल ५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाला. यात भारताला उच्च किंवा अत्यंत उच्च-धोक्याच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. अहवालानुसार, ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत दक्षिण आशियाच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे.

भारतात वाढणारे आजार

देशातील काही भागांत आधीच डासांमार्फत पसरणाऱ्या आजारांनी डोके वर काढले आहे. राजधानी दिल्लीत ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे तब्बल ९० रुग्ण आढळले, जो या वर्षातील एका महिन्यातील उच्चांक आहे. यासह २९ ऑगस्टपर्यंत एकूण रुग्णांची संख्या ३११ वर पोहोचली आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, मलेरियाचे रुग्ण जुलै महिन्यातील १७ वरून ऑगस्टमध्ये ५३ पर्यंत वाढले, ज्यामुळे या वर्षातील एकूण रुग्णसंख्या ११९ झाली आहे.

आरोग्य यंत्रणा डेंग्यू किंवा मलेरियाच्या सध्याच्या रुग्णांना थेट 'एल निनो'शी जोडत नसली, तरी या परिस्थितीला 'धोका वाढवणारा घटक' मानत आहे. या परिस्थितीचा प्रभाव स्थानिक हवामान, आरोग्याची स्थिती आणि आरोग्य यंत्रणेच्या क्षमतेवर अवलंबून असतो.

भारतासमोर आरोग्याचे मोठे संकट

उष्णता ही भारतासाठी एक मोठी चिंतेची बाब आहे. अति उष्णतेमुळे थकवा येणे आणि उष्माघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच हृदय, श्वासोच्छ्वास, किडनी आणि चयापचय विकारांचे आजार बळावू शकतात. अति उष्णतेचा परिणाम माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. कुपोषण, अन्नाचा तुटवडा आणि असंसर्गिक आजारांची तीव्रता वाढणे या गोष्टीही चिंतेचे विषय आहेत.

पाऊस आणि पाण्याच्या उपलब्धतेतील बदलांचा परिणाम धान्य उत्पादनावर होऊ शकतो, तर मुसळधार पाऊस आणि पुरामुळे 'लेप्टोस्पायरोसिस'चा धोका वाढू शकतो. विशेषतः जिथे स्वच्छता आणि सांडपाण्याची व्यवस्था निकृष्ट आहे अशा भागांत. जागतिक आरोग्य संघटनेने भारत-नेपाळ आणि भारत-भूतान सीमांकडेही लक्ष वेधले आहे; कारण तेथे होणाऱ्या लोकांच्या स्थलांतरामुळे सीमापार रोग प्रसाराचा धोका वाढू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT