Egg Freezing Health | एग फ्रीझिंग आणि आरोग्यशास्त्र File Photo
आरोग्य

Egg Freezing Health | एग फ्रीझिंग आणि आरोग्यशास्त्र

पुढारी वृत्तसेवा

डॉ. मनोज कुंभार

एग फ्रीझिंगमागील वैज्ञानिक वास्तव समजून घेतल्यास या संभ्रमावर काही प्रमाणात तरी प्रकाश पडतो आणि आधुनिक प्रजनन विज्ञान नेमके कुठवर पोहोचले आहे, हे लक्षात येते.

‘विट्रिफिकेशन’ची क्रांती

एग फ्रीझिंगच्या इतिहासात निर्णायक बदल घडवून आणणारी संकल्पना म्हणजे ‘विट्रिफिकेशन’. पूर्वी वापरली जाणारी संथ गोठवण्याची पद्धत अंड्यांच्या संरचनेसाठी अपुरी ठरत होती. गोठवताना तयार होणारे बर्फाचे स्फटिक अंड्यांचे नुकसान करीत असत. विट्रिफिकेशन ही अतिवेगाने गोठवण्याची पद्धत असून त्यात स्फटिक तयार होत नाहीत.

गेल्या दशकातील वैद्यकीय अभ्यासांनी दाखवून दिले आहे की, या पद्धतीने गोठवलेली अंडी वितळवल्यानंतर जवळपास 90 टक्के प्रमाणात सुरक्षित राहतात. एवढेच नव्हे, तर अशा अंड्यांपासून तयार होणारे भ्रूण गर्भाशयात यशस्वीपणे रोपित होण्याचे आणि जिवंत अपत्य जन्माला येण्याचे प्रमाण ताज्या अंड्यांपासून मिळणार्‍या परिणामांच्या जवळपास पोहोचले आहे. म्हणजेच आज तंत्रज्ञान मर्यादा ठरत नाही, तर जैविक वास्तवच निर्णायक भूमिका बजावते.

वय हा घटक महत्त्वाचा

या संपूर्ण प्रक्रियेत वय हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. अंडी ज्या वयात गोठवली जातात, त्यावर भविष्यातील यश अवलंबून असते. वय वाढत जाईल तशी अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता कमी होत जाते. चाळिशीनंतर ही घसरण अधिक तीव्र होते. त्यामुळे तज्ज्ञ एग फ्रीझिंगचा विचार लवकर करण्याचा सल्ला देतात, तो कोणत्याही प्रकारचा दबाव नसून जैविक वास्तवाची जाणीव करून देणारा असतो.

यशाची शक्यता किती?

एग फ्रीझिंगच्या यशाचे प्रमाण एका आकड्यात सांगता येत नाही. कारण ही प्रक्रिया अनेक टप्प्यांवर आधारित असते. किती अंडी सुरक्षितपणे वितळतात, किती अंडी फलित होतात, किती निरोगी भ्रूण तयार होतात आणि त्यापैकी किती भ्रूण गर्भाशयात स्थिरावतात, या प्रत्येक टप्प्याची शक्यता स्वतंत्र असते.

वय आणि अंडी

अभ्यासांनुसार पंचविशीच्या उत्तरार्धात किंवा पस्तीशीच्या आधी साधारण 12 ते 14 अंडी गोठवली असतील, तर भविष्यात किमान एक अपत्य होण्याची शक्यता 60 ते 70 टक्क्यांपर्यंत असू शकते. वय वाढल्यावर हीच शक्यता टिकवण्यासाठी अधिक अंड्यांची गरज भासते. म्हणूनच वैद्यकीय तज्ज्ञ हमी देण्याऐवजी वयानुसार वास्तववादी उद्दिष्टे मांडतात.

त्रास कोणते होतात?

वैद्यकीय दृष्टीने एग फ्रीझिंग ही तुलनेने सुरक्षित प्रक्रिया मानली जाते. अंडोत्सर्जनासाठी दिल्या जाणार्‍या औषधांमुळे काही काळ पोट फुगणे, अस्वस्थता जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात. क्वचित प्रसंगी अंडाशय अतिसंवेदनशील होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. मात्र ती अपवादात्मक असते. खरी मर्यादा ही वैद्यकीयपेक्षा भावनिक आणि व्यावहारिक अधिक आहे. एग फ्रीझिंगमुळे वयाबरोबर होणारी प्रजनन क्षमतेची घसरण थांबत नाही. मात्र भविष्यात गर्भधारणेसाठी अधिक अनुकूल सुरुवात मिळते, एवढाच या प्रक्रियेचा खरा लाभ आहे.

म्हणूनच एग फ्रीझिंगकडे एखाद्या खात्रीशीर हमीप्रमाणे नव्हे, तर भविष्यासाठीची एक शक्यता म्हणून पाहणे अधिक समंजस ठरते. आजचे विज्ञान अधिक सक्षम आणि अंदाजबद्ध झाले असले तरी वेळ, योग्य माहिती आणि स्वतःच्या शरीराची समज या गोष्टी निर्णायक ठरतात. जैविक घड्याळाशी संघर्ष करण्यापेक्षा त्याचे भान ठेवून विचारपूर्वक निर्णय घेतला, तर एग फ्रीझिंग हा पर्याय अनेक स्त्रियांसाठी आश्वासक ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT