Raw Beetroot Risks | बीट खाताना 'ही' चूक पडू शकते महागात! कच्चं बीट खाण्यापूर्वी जाणून घ्या 'हे' वास्तव  Pudhari File Photo
आरोग्य

Raw Beetroot Risks | बीट खाताना 'ही' चूक पडू शकते महागात! कच्चं बीट खाण्यापूर्वी जाणून घ्या 'हे' वास्तव

पुढारी वृत्तसेवा

मंजिरी फडके

कोणताही आरोग्यदायी पदार्थ खाण्याची पद्धत चुकली तर ती शरीरासाठी घातक ठरू शकते. विशेषतः बीट खाताना ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे, अन्यथा फायद्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.

शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवणे, रोगप्रतिकारशक्ती सुधारणे आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी बीट खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये व्हिटॅमिन सी, ए, अँटिऑक्सिडंटस् आणि खनिजांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याने याला सुपरफूड म्हटले जाते. मात्र, कोणताही आरोग्यदायी पदार्थ खाण्याची पद्धत चुकली तर ती शरीरासाठी घातक ठरू शकते. अनेकजण बीट कच्चे खातात किंवा त्याचा रस पितात. परंतु, ही पद्धत चुकीची ठरू शकते. बीट ही मुळाची भाजी असल्याने त्यात जमिनीतील मातीतून येणारे बॅक्टेरिया, पेस्टिसाईडस् आणि हेवी मेटल्स असण्याची शक्यता असते. यामुळे पोटाचे विकार जडण्याची किंवा शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना इजा पोहोचण्याची भीती असते. म्हणूनच, बीट नेहमी हलके शिजवून किंवा वाफवून खाणे अधिक सुरक्षित मानले जाते.

ज्यांना किडनी स्टोन म्हणजेच मूतखड्याचा त्रास आहे, त्यांनी बीट खाणे टाळावे. बीटमध्ये ऑक्सलेटस्चे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे किडनीमध्ये कॅल्शियम ऑक्सलेटस् स्टोन तयार होण्याचा धोका वाढतो. तुम्हाला मूत्रपिंडाशी संबंधित इतर काही समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बीटचे सेवन करू नका. ज्या व्यक्तींना ‘आयबीएस’ (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम) किंवा ‘आयबीडी’ (इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज) यांसारख्या आतड्यांच्या समस्या आहेत, त्यांनी कच्च्या बीटचे सेवन पूर्णपणे टाळावे. कच्चे बीट खाल्ल्याने पोटदुखी, गॅस, पोट फुगणे आणि पोटातील अस्वस्थता वाढू शकते. यामुळे आधीच असलेला आजार अधिक बळावण्याची शक्यता असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT