Healthy Lifestyle | गोष्ट उपवासाची! 
आरोग्य

Healthy Lifestyle | गोष्ट उपवासाची!

पुढारी वृत्तसेवा

डॉ. अर्चना व हेमंत जोशी

आपल्याकडे चातुर्मासात खूप लोक उपवास करतात. याने मन बळकट होते. शरीर चांगले होते. म्हणून रोज एकदा जेवा. दरम्यान, दुसरे काही खाऊ नका. फक्त पाणी प्या. राहवले नाही, तर फळे, कोशिंबिरी खा. ज्या मुलाची व मोठ्या माणसाची कंबर जाड आहे, तो जाड समजावे. म्हणून कमी खा. उपास करा, व्यायाम करा आणि बारीक व्हा!

देशाला जाडेपणाची जीवघेणी कीड लागली आहे . ती केवळ उपवास व दरवेळा कमी खाणे यानेच जाईल. कारण, आपण जे अन्न घेतो त्याची शरीर साखर बनवते. ती यकृतात म्हणजे लिव्हरमध्ये जमा असते. ती आपण जगायला दरक्षणी वापरतो. ती संपल्यावर शरीर आपली चरबी वापरू लागते. हे फक्त उपास केल्याने होते. आपण बारीक झाल्याने निरोगी, दीर्घायुषी, सुखी आणि आनंदी होतो. १ किलो वजन घटले की, रक्तदाब २ ने घटतो. शरीरातील साखर, चरबी घटते. आपणाला जाडेपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यापासून सुटका मिळते. हे सर्व आजार वैद्यकीय इलाज केले तरी वाढतातच. यावर उपास हाच इलाज आहे. अनेक आजारांची तोंडे असलेला जाडेपणाचा अजगर आपल्या पोटाला घट्ट विळखा मारून बसतो. तेव्हा केवळ उपासच हा विळखा सोडवतो.

आपल्या शरीरातील अनेक पेशी रोज मरतात व नव्या पेशीत जन्माला येतात. हे निरंतर चालू असते. आपण घरात झाडू मारून स्वच्छता करतो. त्याचप्रमाणे आपल्या प्रतिकारशक्तीच्या ज्या पेशी असतात, त्या शरीरातील खराब पेशींना खातात. शरीरात शिरून आजार करणारे विषाणू, जीवाणू यांना खातात. कर्करोगाच्या पेशींनाही खातात. याला स्वभक्षण म्हणजे ऑटोफेजी म्हणतात. जेव्हा आपण उपाशी असतो, तेव्हा या पेशी हे काम जास्त प्रभावीपणे करतात. हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. हे संशोधन करणाऱ्या जपानी संशोधक योशिनोरी ओसुमी यांना त्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले आहे. आपण आजारी असताना भूक जाते. तर बरे झाल्यावर भूक लागते. भूक लागली म्हणजे आपला आजार गेला असे समजावे. जसे घराला रोज झाडू मारणे जरुरी असते, तसे आठवड्याला दोन तरी उपवास जरुरी असतात. त्याने जाडेपणा नाहीसा होतो.

आपल्या रक्तामध्ये इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर वन नावाचे रसायन असते. ते आपल्या शरीराची वाढ करते. कर्करोगाच्या पेशींचीही तेच वाढ करते. आपण आठवड्यातून दोन दिवस उपवास केले, तर इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर वनची पातळी निम्मी होते. त्यामुळे शरीराची वाढ कमी होते आणि आपल्याला कर्करोग होण्याची शक्यता कमी होते, असा अभ्यास आहे. म्हणूनच आठवड्याला दोन तरी उपवास करावेत. आपण उपास करून मनाचे सामर्थ्य वाढवू शकतो आणि आरोग्य रक्षण करू शकतो. उपवास वैज्ञानिक आहे. त्याने मनाला शिस्त लागते. आपण मोह टाळायला शिकतो. नाही म्हणायला शिकतो. उपवास केला की, आपण जास्त काम करतो. आपले आयुष्य बदलते. आपल्या संवेदना तीव्र होतात. मेंदू जास्त चांगला काम करतो. नवीन कल्पना सुचतात. तुलनेने चुका कमी होतात.

जशी उपाशी वाघाच्या हातून हरीण सुटत नाही, तर पोटभर जेवलेला अजगर सुस्त होऊन कुठेही पडतो. असेच आपलेही आहे. आपण पोटभर जेवलो की, सुस्त होतो आणि उपाशी किंवा अर्धपोटी असलो, तर आपण एकदम जागरूक असतो. आपल्यातल्या सर्व संवेदना तीव्र असतात. जाडेपणामुळे रक्तदाब, हृदयाचा त्रास असे अनेक विकार होतात. या आजारांनीच सर्वाधिक मृत्यू रोज घडतात. फक्त उपवास केल्यानेच व दरवेळी कमी खाल्ल्यानेच जाडेपणा कमी होऊ शकतो. सोबत व्यायाम केला, तर तो जास्त लवकर कमी होईल; पण उपवासाला पर्याय नाही.

धर्म म्हणजे जगण्याची पद्धत. ज्या गोष्टीचा फायदा होतो तीच अनेक वर्षे टिकते. आपल्याकडे कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी पूजा करणाऱ्यांना उपाशी राहावे लागते. नवरा-नवरीला लग्नाआधी उपाशी राहावे लागते. आपल्याकडे अनेकजण व्रतवैकल्ये करतात. सर्वांमध्ये उपास करतात. कोणी सोळा शुक्रवार करतात. कुणी सोळा सोमवार करतात. कोणी एकादशीला उपास करतात. जैन धर्मीय सायंकाळी सूर्यास्ताआधी जेवतात. नंतर सूर्योदयापर्यंत जेवत नाही. याने रोज बारा तास उपवास होतो. ही सर्वोत्तम पद्धत आहे. जगभर लोक सायंकाळी सात वाजता जेवतात. नंतर दुसऱ्या दिवशी नाश्ता करतात. रमजानचे रोजे - उपास करतात. दिवसभर पाणीही पीत नाहीत. जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपण मनाला नाही म्हणायला शिकवतो. आपले मन बळकट करतो. यामुळे आपले शारीरिक आरोग्यही छान होते.

सध्या सर्वाधिक लोक करत असलेला उपवास म्हणजे दिवसातून दोन वेळा जेवणे व इतर वेळा काही न खाणे. काहीजण उपवास करतात; पण त्या दिवशी दुप्पट खातात. असे लोक उपास म्हणजे आहारात बदल करून पोटभर खातात. ते चूक आहे. उपास म्हणजे न खाणे. कमी खाणे. गहू, तांदूळ, बटाटे, साबुदाणा हे एकसारखे पिष्टमय पदार्थ आहेत. उपवासाला हे खाणे टाळा. पोटभर खिचडी खाऊन उपासाचा शरीराला फायदाच होत नाही. उपवास कराल तेव्हा अन्नाच्या जागी पाणी प्यावे. नंतर जमेल तेव्हा विनापाण्याचा उपास करावा. आपल्याला झेपेल तेवढा उपास करावा. न झेपला तर उपास तोडावा. उपास सर्व मोठ्या लोकांनी करावा. विशेषत: ज्यांची कंबर बारीक नाही, जाड आहे त्या मोठ्यांनी व मुलांनी करावा. आठ वर्षांवरील जाड मुलांना उपास करायला शिकवावे. त्यांना झेपेल तेवढा उपास करू द्यावा. आपण फक्त रोज दोनवेळाच जेवा. इतर सर्व खाणे बंद करा. त्याऐवजी पाणी प्या. नंतर रात्रीच्या जेवणाऐवजी फक्त फळे, कोशिंबिरी खा. काही खावे वाटले, तर पाणी प्या. एकवेळ जेवायची सवय झाली की, दोनदा जेवण लागत नाही. चहा, कॉफी अजिबात पिऊ नका. असे कराल, तर कंबर निश्चित बारीक होईल.

एक गोष्ट अर्धपोटी दीर्घायुष्याची

दीर्घायुषी कोण? जेवणारे की अर्धपोटी राहणारे? हे कळायला शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला. खूप उंदीर घेतले. त्यांचे दोन गट केले. एका गटाला आयुष्यभर पोटभर जेवण दिले, तर दुसऱ्या गटाला आयुष्यभर अर्धपोटी ठेवले. दरम्यान, त्यांचा अभ्यास केला, तेव्हा अर्धपोटी उंदीर दीर्घायू आढळले, तर पोटभर खाणारे उंदीर अल्पायुषी ठरले. म्हणूनच आपण यातून धडा घेत नेहमी अर्धेपोट भरेल एवढेच खाऊ. आज भारतातील स्त्रिया सणावाराला वर्षभर पुरुषांच्या तुलनेत जास्त उपवास करतात. त्या सरासरी ७४ वर्षे जगतात, तर पुरुष सरासरी ७२ वर्षे जगतात. म्हणून पुरुषांनीही उपवास करावेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT