Dog smell cancer research
नवी दिल्ली: कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता अत्यंत तीक्ष्ण असते. चोरीसारख्या प्रकरणांमध्ये पुरावे शोधण्यासाठी या क्षमतेचा वापर केला जात असल्याचे तुम्ही पाहिले असेलच; पण ते वासावरून कर्करोगासारखे आजारही ओळखू शकतात का? 'द आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन' या हॉलिवूड चित्रपटात तर एका कुत्र्याने आपल्या मालकाचा कर्करोग वासावरून ओळखल्याचे दाखवले आहे.
कुत्रे खरोखरच असे करू शकतात का, हे तपासण्यासाठी भारतातील एक 'हेल्थ-टेक स्टार्टअप' प्रशिक्षित कुत्रे आणि 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. जरी हे तंत्रज्ञान अद्याप वैद्यकीय निदानासाठी पूर्णपणे सज्ज नसले, तरी कर्करोग शोधण्याच्या प्रक्रियेत ते एक उपयुक्त साधन ठरू शकते, असे मानले जात आहे.
कोणताही आजार शरीराचे रासायनिक संकेत (केमिकल सिग्नेचर) बदलतो, हे वैज्ञानिकदृष्ट्या आधीपासूनच सिद्ध झाले आहे. आपल्या शरीराच्या आतील जैविक प्रक्रियांमुळे काही बाष्पीभवन होणारे सेंद्रिय घटक तयार होतात, जे श्वास, घाम, लघवी आणि इतर शारीरिक द्रव्यांवाटे बाहेर पडतात. कर्करोग झाल्यास या प्रक्रियांमध्ये बदल होतो, ज्यामुळे शरीरातून बाहेर पडणाऱ्या या घटकांचे स्वरूपही बदलते. कुत्रे त्यांच्या अफाट हुंगण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत आणि आता याच क्षमतेचा वापर वैद्यकीय क्षेत्रात केला जात आहे.
ही प्रक्रिया सुरुवातीला अगदी सोपी आहे. एखाद्या व्यक्तीला साधारण १० मिनिटे सुती मास्क घालून सामान्य संभाषण करण्यास आणि दीर्घ श्वास घेण्यास सांगितले जाते. या मास्कमध्ये त्या व्यक्तीच्या श्वासातील घटक जमा होतात; त्यानंतर हा मास्क प्रयोगशाळेत पाठवला जातो, जिथे प्रशिक्षित कुत्रे त्याचा वास घेतात. या प्रक्रियेदरम्यान कुत्र्यांना एक विशेष प्रकारचा सूट घातला जातो, जो हुंगताना त्यांच्या मेंदूची क्रियाशीलता, हृदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास आणि शारीरिक हालचालींची नोंद करतो. हा सर्व डेटा एका एआय मॉडेलमध्ये टाकला जातो, ज्याच्या आधारे 'व्हीओसी रिस्क स्कोर' तयार केला जातो.
या वर्षी एप्रिलमध्ये 'जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी'मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, या प्रणालीने कर्करोगाच्या १० पैकी ९ रुग्णांची अचूक ओळख पटवली. त्याचप्रमाणे, ज्यांना कर्करोग नव्हता अशा १० पैकी ९ व्यक्तींचीही तिने अचूक ओळख पटवली. कर्नाटकच्या ६ रुग्णालयांमध्ये तीन हजारांहून अधिक लोकांवर हा अभ्यास करण्यात आला. यामध्ये अंतिम चाचणी गटातील २८३ रुग्णांच्या बाबतीत बायोप्सीद्वारे आधीच कर्करोगाची पुष्टी करण्यात आली होती. या अभ्यासाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, कर्करोगाच्या सर्व टप्प्यांवर या तंत्रज्ञानाची कामगिरी अत्यंत प्रभावी आणि एकसारखी राहिली आहे.