डॉ. महेश बरामदे
अलीकडे काही तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की, चहा शरीरातील कॅल्शियम शोषणात अडथळा आणतो आणि त्यामुळे हाडे कमजोर होण्याचा धोका निर्माण होतो. दूध असलेल्या चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट ही संयुगे मोठ्या प्रमाणात असतात. ही दोन्ही संयुगे शरीरात मिळणार्या कॅल्शियमच्या अणूंना बांधून टाकतात. यामुळे आहारातून मिळणारे कॅल्शियम शरीरात शोषले जात नाही.
चहा हा भारतीयांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग मानला जातो. सकाळचा वाफाळलेल्या चहाचा पहिला घोट असो किंवा दुपारचा चहा असो किंवा सायंकाळचा चहा असो, त्या-त्यावेळी चहा मिळाला नाही तर अक्षरशः अस्वस्थ, बेचैन आणि प्रसंगी चिडचिड करणारे लोकही भोवताली मोठ्या प्रमाणावर दिसतात. काहींना तर दिवसात चार ते पाच कप चहा पिण्याची सवय असते, पण अलीकडे काही तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की, चहा शरीरातील कॅल्शियम शोषणात अडथळा आणतो आणि त्यामुळे हाडे कमजोर होण्याचा धोका निर्माण होतो. हे कितपत खरे आहे?
दूध असलेल्या चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट ही संयुगे मोठ्या प्रमाणात असतात. ही दोन्ही संयुगे शरीरात मिळणार्या कॅल्शियमच्या अणूंना बांधून टाकतात. यामुळे आहारातून मिळणारे कॅल्शियम शरीरात शोषले जात नाही. विशेषतः जर एखाद्याच्या आहारातून आधीपासूनच कॅल्शियम पुरेशा प्रमाणात जात नसेल आणि अशा स्थितीत सदर व्यक्ती दिवसातून अनेकदा चहाचे सेवन करत असेल तर त्याच्या हाडांवर, हाडांच्या घनतेवर, मजबुतीवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.
अनेक संशोधनांनुसार चहाचे अतिप्राशन अनेक प्रकारच्या आजारांना कारक ठरू शकते. अशा वेळी लोकांचा पहिला प्रश्न असतो तो म्हणजे, मग चहा पिणे बंद करायचे का? विशेषतः नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर असणार्या लोकांकडून हा प्रश्न हमखास विचारला जातो. चहा शरीरासाठी हानिकारक असेल, तर तो पिणे थांबवल्यास आयुष्य नीरस होईल, इथपर्यंत चहाप्रेमींची मते ऐकावयास मिळतात. चहा पूर्णपणे बंद करता आल्यास उत्तमच. पण तसे करणे शक्य नसेल तर किमान त्याचा अतिरेक तरी टाळता आला पाहिजे. सामान्यतः दिवसात एक ते दोन कप चहा पुरेसा आहे. त्यापेक्षा जास्त घेतल्यास, त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढते.
हाडे मजबूत ठेवण्यासाठी केवळ चहा कमी करणे पुरेसे नाही. आहारात दूध, दही, पनीर, तीळ, बदाम, हिरव्या पालेभाज्या यांसारख्या कॅल्शियम वाढवणार्या घटकांचा आहारात नियमित समावेश केला गेला पाहिजे. कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच चहा पिऊ नये. किमान दोन तासांचे अंतर ठेवावे, म्हणजे शरीर त्या कॅल्शियमचे योग्य शोषण करू शकेल.