डॉ. मनोज कुंभार
डाळिंब हे फक्त चविष्ट फळ नसून अँटिऑक्सिडंटस्चा एक शक्तिशाली स्रोत आहे. लालचुटूक डाळिंबाचे दाणे अनेक आजारांविरुद्ध शरीराचे संरक्षणही करतात.
आजच्या काळात हृदयविकारांविषयी जागरूकता वाढत असताना अनेक लोक डाळिंबाच्या रसाला हृदयासाठी अमृत मानतात. काहीजण तर असा दावा करतात की, रोज डाळिंबाचा रस प्यायल्याने धमनीतील ब्लॉकेज कमी होते किंवा पूर्णपणे निघून जातात; मात्र विज्ञान याबाबत काय सांगते, हे समजून घेणे आवश्यक आहे.
वैज्ञानिक संशोधन काय सांगते?
अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या (एनआयएच) सहयोगाने करण्यात आलेल्या एका क्लिनिकल अभ्यासात आर्टरी स्टेनोसिस असलेल्या रुग्णांचे तीन वर्षे निरीक्षण करण्यात आले. या रुग्णांच्या मानेतील धमनी अरुंद झाल्या होत्या. अभ्यासात असे दिसले की, जे रुग्ण दररोज डाळिंबाचा रस घेत होते त्यांच्या धमण्यांची जाडी हळूहळू कमी झाली आणि सिस्टोलिक रक्तदाबातही घट झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे फायदे तीन वर्षांनंतरही टिकून राहिले.
दुसर्या एका अथेरोक्लेरोसिस विषयक संशोधनात असे आढळले की, डाळिंबाच्या अर्काने धमनीतील सूज कमी करणारे जैव घटक कमी केले. कारण, दीर्घकालीन सूज (क्रोनिक इनफ्लेमेशन) हीच हृदयविकाराची गती वाढवते. त्यामुळे डाळिंब हे कोरोनरी आर्टरींचे संरक्षण करण्यात साहाय्यक ठरते, असा निष्कर्ष काढण्यात आला. तथापि, सर्व अभ्यास एकमताने परिणाम दाखवत नाहीत. अनेक संशोधनांत डाळिंबाच्या रसाचा धमनीतील प्लाकवर थेट परिणाम मर्यादित किंवा अस्थिर दिसून आला. संशोधनाचे नमुना आकार छोटे असल्याने हे निष्कर्ष अजून प्राथमिक अवस्थेत आहेत, तरीदेखील डाळिंबाचे काही अप्रत्यक्ष फायदे निश्चितच हृदयाच्या आरोग्यास मदत करतात.
डाळिंबात पॉलिफेनॉल्स आणि प्युनिकॅलेजिन्स हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून धमनींच्या आतील भिंतींचे नुकसान टाळतात. त्यामुळे प्लाक तयार होण्याची प्रक्रिया मंदावते आणि रक्तवाहिन्या अधिक लवचिक राहतात. दीर्घकालीन सूज हीच धमनी कठीण होण्याचे (आर्टिअरी स्टिफनिंग) एक प्रमुख कारण आहे. संशोधनानुसार, डाळिंबाच्या अर्कामुळे सूज निर्माण करणारे घटक कमी होतात. यामुळे आधीपासून असलेला प्लाक स्थिर राहतो आणि पुढील हृदयविकाराचा धोका घटतो.
डाळिंबातील संयुगे वाईट कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडेशन कमी करतात, जे प्लाक तयार होण्याचा पहिला टप्पा असतो. ते कोलेस्टेरॉलची पातळी मोठ्या प्रमाणात कमी करत नाहीत, तरी वाईट कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडेशन रोखल्यामुळे धमनींचे आरोग्य टिकून राहते. दररोज डाळिंबाचा रस घेतल्यास सिस्टोलिक रक्तदाबात घट होते, असे अनेक अभ्यास सुचवतात. रक्तदाब कमी झाल्याने धमनींवरचा ताण कमी होतो आणि हृदयाचे कार्य अधिक कार्यक्षम होते. यामुळे अप्रत्यक्षरीत्या हृदयविकाराच्या गुंतागुंतींचा धोका घटतो.
डाळिंबाचा रस हा धमनीतील ब्लॉकेजचा थेट उपचार नाही; पण वैद्यकीय सल्ल्याने त्याचे नियमित, योग्य प्रमाणातील सेवन ऑक्सिडेटिव्ह नुकसान आणि सूज कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि ताणतणाव नियंत्रणासोबत डाळिंबाचा समावेश केल्यास हृदयाची कार्यक्षमता वाढू शकते आणि ब्लॉकेज निर्माण होण्याचा धोका कमी होऊ शकतो. थोडक्यात, डाळिंब हे जादूई औषध नाही; पण हृदयाला दीर्घकाळ तरतरीत ठेवणारे नैसर्गिक संरक्षण कवच नक्कीच आहे.