डॉ. गौरांगी वैद्य
मानवी डोळा हा अत्यंत प्रगत आणि संवेदनशील अवयव आहे. आपण अनेकदा डोळ्यांच्या तपासणीकडे दुर्लक्ष करतो; पण दातांच्या आरोग्याप्रमाणेच डोळ्यांची दर सहा महिन्यांनी तपासणी करणे आवश्यक आहे. कारण, अंधत्वाची अनेक कारणे वेळेत निदान झाल्यास पूर्णपणे टाळता येतात.
एकाएकी द़ृष्टी अंधुक होणे, विशेषतः एकाच डोळ्याने स्पष्ट न दिसणे, हे धोक्याचे लक्षण आहे. हे लक्षण मिनी स्ट्रोक (टीआयए), काचबिंदूची (ग्लॉकोमा) सुरुवात, मधुमेहामुळे होणारा रेटिनोपॅथी हा आजार किंवा डोळ्यांच्या पडद्याशी संबंधित समस्यांचे संकेत असू शकते. डोळ्यांसमोर लहान काळे ठिपके किंवा कोळ्याच्या जाळ्यासारखे तंतू फिरताना दिसणे (फ्लोटर्स) त्यांचे प्रमाण अचानक वाढणे आणि त्यासोबत प्रकाशाचे झोत दिसणे ही आणीबाणीची स्थिती असू शकते. याचा अर्थ डोळ्याचा पडदा (रेटिना) फाटत आहे किंवा निखळत आहे, ज्यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.
पेरिफेरल व्हिजन लॉसच्या समस्येत तुम्हाला समोरचे स्पष्ट दिसते; पण बाजूच्या गोष्टी पाहण्यास त्रास होत असेल, तर तो काचबिंदूचा (ग्लॉकोमा) सुरुवातीचा टप्पा असू शकतो. डबल व्हिजन म्हणजे एकाच वस्तूच्या दोन प्रतिमा दिसणे हे कॉर्नियाशी संबंधित दोष किंवा मोतीबिंदूचे लक्षण असू शकते. जर दोन्ही डोळ्यांना हा त्रास होत असेल, तर तो मज्जासंस्थेशी संबंधित आजार किंवा स्ट्रोकचा इशारा असू शकतो.
सरळ रेषा नागमोडी दिसणे किंवा द़ृष्टीच्या मध्यभागी काळा ठिपका दिसणे हे वय-संबंधित मॅक्युलर डिजनरेशन (एएमडी) चे लक्षण आहे. उजेडातून अंधारात गेल्यावर डोळे जुळवून घेण्यास वेळ लागणे किंवा रात्री गाडी चालवताना अडचण येणे ही रातांधळेपणाची लक्षणे असू शकतात. ‘अ’ जीवनसत्वाची कमतरता, मोतीबिंदू किंवा रेटिनायटिस पिगमेंटोसासारख्या आजारांमुळे होऊ शकते.