डॉ. जयदेवी पवार
मोठ्या आतड्याचा कर्करोग हा प्रामुख्याने आतड्याच्या किंवा मलाशयाच्या आतील अस्तरावर असलेल्या ‘पॉलिप्स’ (लहान गाठी) मध्ये सुरू होतो. ‘क्लीव्हलँड क्लिनिक’च्या माहितीनुसार, या कर्करोगामुळे माणसाचे आयुर्मान साधारणपणे 10 वर्षांनी कमी होऊ शकते. उपचारांनंतर रुग्ण किती काळ जगू शकतो, हे त्याचे वय, निदानाची वेळ, कर्करोगाचा टप्पा आणि एकूण आरोग्य यावर अवलंबून असते.
आपल्या तोंडात, विशेषतः दातांवरील थरांमध्ये आणि हिरड्यांच्या संसर्गात ‘फ्युसोबॅक्टेरियम न्यूक्लिएटम’ नावाचा जीवाणू असतो. संशोधकांना असे आढळले आहे की, हाच जीवाणू कर्करोगाच्या गाठींमध्येही उपस्थित असतो. हा जीवाणू तोंडातून थेट आतड्यांपर्यंत पोहोचतो. हा जीवाणू कर्करोगाच्या पेशींना वाढण्यास आणि शरीराच्या इतर भागात पसरण्यास मदत करतो. निरोगी पेशींच्या तुलनेत कर्करोगग्रस्त पेशींमध्ये या जीवाणूंचे प्रमाण प्रचंड असते.
अतिप्रमाणात साखरयुक्त पदार्थ आणि शीतपेये पिणे टाळावे. नियमितपणे दात घासणे आणि ‘फ्लॉसिंग’ (दातांमधील फटी स्वच्छ करणे) करणे आवश्यक आहे. श्वासदुर्गंधी दीर्घकाळ राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.