मानेशी संबंधित आजार हा सामान्य असून, तो वेगवेगळ्या वयोगटांतील लोकांमध्ये आढळतो. सततच्या चुकीच्या बसण्याच्या सवयी, मोबाईल व संगणकाचा अतिरेकी वापर, अपघात, स्नायूंचे ताण आणि हाडांशी संबंधित आजार यामुळे मानदुखी व इतर मानेशी संबंधित समस्या उद्भवतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगभरातील 70% लोकांना आयुष्यातील कोणत्यातरी टप्प्यावर मानदुखीचा त्रास होतो. अमेरिकन ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या संशोधनानुसार, मोबाईल व संगणकाचा सतत वापर करणार्या 60% लोकांना टेक्स्ट नेक सिंड्रोमचा त्रास होण्याची शक्यता असते.भारतीय फिजिओथेरपी असोसिएशनच्या सर्व्हेंनुसार 15 ते 35 वयोगटातील 80% तरुण मोबाईल आणि संगणकामुळे मानदुखीचा त्रास अनुभवतात.
सर्व्हायकल स्पाँडिलोसिस ः ही एक हाडांंशी आणि संधिवाताशी संबंधित समस्या असून, ती वयोमानानुसार वाढते. या विकारात मणक्यांमधील गादी (डिस्क) झिजल्यामुळे मानेत वेदना, जडपणा आणि काहीवेळा हात व खांद्यांमध्ये मुंग्या येण्याची समस्या निर्माण होते. सतत एकाच पोझिशनमध्ये बसणे, संगणक व मोबाईलचा अधिक वापर, वय वाढल्यामुळे हाडे कमकुवत होणे, स्नायूंवरील अनावश्यक ताण यामुळे ही समस्या निर्माण होते. यावर वैद्यकीय उपचारांखेरीज नियमित मान व खांद्याचे व्यायाम, बसण्याची स्थिती सुधारणे आणि वेदना कमी करण्यासाठी गरम किंवा थंड शेक घेण्याने आराम मिळतो.
सर्व्हायकल डिस्क हर्निएशन ः मणक्यांमधील गादी (डिस्क) बाहेर येऊन मज्जातंतूंवर (नसा) दाब देते. यामुळे मानेत तीव्र वेदना, हात आणि बोटांमध्ये मुंग्या किंवा बधिरता जाणवू शकते. अतिजड वस्तू उचलणे, चुकीच्या स्थितीत झोपणे, अचानक मानेवर जास्त ताण येणे यामुळे हा त्रास उद्भवू शकतो.
टेक्स्ट नेक सिंड्रोम ः सतत मोबाईल वापरल्यामुळे मानेच्या स्नायूंवर ताण येऊन हा आजार जडतो. विशेषतः, चुकीच्या स्थितीत मान झुकवून दीर्घकाळ मोबाईल पाहात राहिल्याने ही समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणजे दर 30 मिनिटांनी मान ताणण्याचे व्यायाम करावेत. अर्थातच, यासाठी फिजिओथेरपिस्ट किंवा डॉक्टर किंवा योगातज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. फिजिओथेरपीने स्नायू बळकट करून मानेच्या वेदना कमी करता येतात. मसाज थेरपीमुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि स्नायूंना आराम मिळतो.गरम पाण्याने शेक घेतल्यामुळे स्नायू सैल होण्यास मदत होते; तर बर्फाने शेकल्यास जळजळ आणि वेदना कमी होतात.
मानेतील ताण कमी करण्यासाठी भुजंगासन उपयुक्त ठरते; तर मणका लवचिक ठेवण्यासाठी मार्जारासन उपयुक्त ठरते. याखेरीज आपली झोपण्याची उशी जास्त उंच किंवा खूप सपाट नसावी. मान सरळ ठेवून झोपण्याची सवय लावावी. तसेच कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ जसे की दूध, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करावा.एकूणच, मानदुखी आणि इतर मानेच्या समस्या जीवनशैलीतील चुकीच्या सवयींमुळे वाढत आहेत. संगणक आणि मोबाईलचा अतिरेकी वापर, चुकीची बसण्याची स्थिती आणि व्यायामाचा अभाव यामुळे हा त्रास अधिक वाढतो. मानेचे आरोग्य सुधारण्यासाठी, लहान-सहान सवयींमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. वेळेवर निदान आणि उपचार घेतल्यास या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते.