डॉ. महेश बरामदे
जेव्हा आपले हृदय संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करते, तेव्हा ते रक्त पुन्हा हृदयाकडे परत आणण्याचे कठीण काम पायांचे स्नायू करतात. या नैसर्गिक प्रणालीमध्ये बिघाड झाल्यास ‘क्रॉनिक व्हेनस इनसफिशियन्सी’ (सीव्हीआय) सारखा गंभीर आजार उद्भवू शकतो.
मानवी शरीरात हृदयाचे कार्य जितके महत्त्वाचे आहे, तितकेच पायांच्या पिंडर्यांचे कार्यही महत्त्वपूर्ण मानले जाते. वैद्यकीय शास्त्रात पिंडार्यांच्या स्नायूंना शरीराचे ‘दुसरे हृदय’ किंवा ‘पेरिफेरल हार्ट’ असे संबोधले जाते. आपल्या पायांमधील शिरांमध्ये (व्हेन्स) रक्ताला एकाच दिशेने, म्हणजेच वर हृदयाकडे नेणार्या लहान झडपा (व्हॉल्व्ह) असतात. जेव्हा पिंडार्यांचे स्नायू कमकुवत होतात किंवा या झडपा खराब होतात, तेव्हा रक्त गुरुत्वाकर्षणामुळे वर जाण्याऐवजी पायांमध्येच साठू लागते. या स्थितीला ‘क्रॉनिक व्हेनस इनसफिशियन्सी’ असे म्हणतात. यामुळे पायांमधील शिरांवर प्रचंड दाब निर्माण होतो आणि रक्ताभिसरणाची प्रक्रिया मंदावते.
या आजाराची सुरुवात अत्यंत संथ गतीने होते; परंतु वेळेवर उपचार न केल्यास गंभीर रूप धारण करू शकते. सुरुवातीला पाय जड होणे, संध्याकाळच्या वेळी पायांना आणि घोट्याला सूज येणे, तसेच पायात तीव्र वेदना होणे अशी लक्षणे दिसतात. जसजसा आजार वाढतो, तसतसे पिंडार्यांमध्ये सतत पेटके येतात, त्वचा कोरडी आणि खाज सुटणारी होते. गंभीर अवस्थेत पायांवरील शिरा निळ्या-जांभळ्या रंगाच्या होऊन फुगतात, ज्याला व्हेरिकोज व्हेन्स म्हटले जाते. रक्ताचा प्रवाह दीर्घकाळ खंडित राहिल्यामुळे घोट्यांजवळ काळे डाग पडतात आणि तिथे बर्या न होणार्या जखमा (व्हेनस अल्सर) तयार होतात.
धोका कोणाला जास्त?
ज्या व्यक्तींचे काम सलग अनेक तास एकाच जागी बसून किंवा उभे राहून करण्याचे असते, त्यांना याचा सर्वाधिक धोका असतो. आयटी क्षेत्रातील कर्मचारी, शिक्षक, सुरक्षारक्षक आणि दुकानांमधील विक्रेते यामध्ये प्रामुख्याने येतात. याशिवाय वाढते वय, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, अनुवंशिकता आणि गरोदरपण यामुळेही हा आजार होण्याचा धोका वाढतो. या आजारापासून दूर राहण्यासाठी पिंडार्यांचे स्नायू मजबूत ठेवणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. दररोज किमान तीस मिनिटे वेगाने चालल्यामुळे हे स्नायू आकुंचन पावतात आणि रक्ताचा प्रवाह वर ढकलण्यास मदत करतात.
कार्यालयात काम करताना दर एका तासाने पाच मिनिटांचा विसावा घेऊन थोडे चालावे किंवा जागेवरच पावले वर-खाली करावीत. रात्री झोपताना पायांखाली उशी ठेवून पाय हृदयाच्या पातळीपेक्षा थोडे उंच ठेवावेत, ज्यामुळे साठलेले रक्त सहजपणे हृदयाकडे प्रवाहित होते. वजनावर नियंत्रण ठेवणे आणि आहारात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे देखील शिरांचे आरोग्य राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सुदृढ पिंडार्यांमुळे केवळ पायांचे आजार टळत नाहीत, तर संपूर्ण शरीराची रक्ताभिसरण संस्था गतिमान राहून हृदयावरील ताण कमी होतो.