Spine Care Tips | चुकीच्या पद्धतीने बसून काम करताय? विशीतील तरुणांमध्ये वाढतोय चकतीचे आजार 
आरोग्य

Spine Care Tips | चुकीच्या पद्धतीने बसून काम करताय? विशीतील तरुणांमध्ये वाढतोय चकतीचे आजार

पुढारी वृत्तसेवा

डॉ. महेश बरामदे

पूर्वीच्या काळी दिसून येणारे मणक्याचे आणि चकतीचे (डिस्क) आजार वयाच्या पन्नाशीनंतर पाहायला मिळायचे, ते आता विशी आणि तिशीतील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने बसून काम करणे, ज्याला टेक्स्ट नेक किंवा फॉरवर्ड हेड पोश्चर असे म्हटले जाते.

सामान्य स्थिती म्हणजेच आपली मान सरळ असते, तेव्हा मानवी डोक्याचे वजन साधारणपणे ५ ते ६ किलोग्रॅम असते. आपले स्नायू आणि मणका हे वजन सहज पेलू शकतात. लॅपटॉप किंवा फोन पाहताना मान केवळ १५ अंशाने पुढे झुकते, तेव्हा मानेच्या मणक्यावरील भार थेट तिपटीने वाढून १५ किलोच्या आसपास पोहोचतो. आपण जास्त खाली वाकून स्क्रीनकडे पाहतो (अंदाजे ४५ अंश), तेव्हा मानेवर पडणारा भार तब्बल २२ किलोग्रॅम इतका होतो. दिवसातून ८ ते १० तास, आठवड्याचे पाचही दिवस मानेवर असे २२ किलोचे जणू काही ‘अदृश्य ओझे’ वाहिल्यामुळे मणक्याची झीज वेगाने होऊ लागते.

अनेकदा रुग्ण या लक्षणांकडे कामाचा ताण म्हणून दुर्लक्ष करतात; परंतु ही शरीराने दिलेली धोक्याची घंटा असते. कवटीच्या खालच्या भागात (मानेच्या वर) सतत मंद वेदना होणे, खांदे आणि पाठीचा वरचा भाग कडक होणे, मान वारंवार कडक होऊन ती कडकड वाजवण्याची गरज भासणे, डोकेदुखीची सुरुवात मागून होऊन ती पुढे कपाळाकडे येणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. रुग्ण या वेदना कमी करण्यासाठी मान एका बाजूला झुकवून किंवा खांदे उंचावून काम करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा शरीराचा तोल बिघडतो. यामुळे स्नायू आणि सांध्यांवर असमान ताण पडून दीर्घकालीन समस्या निर्माण होतात.

या समस्येवर मात करण्यासाठी जिममध्ये जाऊन तासनतास घाम गाळण्याची गरज नाही, दर ४५ मिनिटांच्या कामांनंतर ५ मिनिटांचा ब्रेक घ्यावा. या ५ मिनिटांत कोणतेही कठीण स्ट्रेचिंग करण्याची गरज नाही; फक्त जागेवरून उठून चालणे, गॅलरीपर्यंत फेरफटका मारणे किंवा खांदे गोल फिरवणे देखील मणक्याला मोठा आराम देते.

संगणक किंवा लॅपटॉपचा मॉनिटर नेहमी डोळ्यांच्या सरळ रेषेत असावा, जेणेकरून मान खाली झुकवावी लागणार नाही. काम करताना पाय जमिनीवर सपाट असावेत. शरीराची हालचाल महत्त्वाची आहे. ताठ बसणे आणि ठरावीक अंतराने हलकी हालचाल करणे या दोन गोष्टी मणक्याचे आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवतात. आपला मणका अत्यंत लवचिक आणि मजबूत असतो, फक्त आपण त्याला स्वतःला सावरण्याची आणि विश्रांतीची योग्य संधी दिली पाहिजे. डेस्क जॉब करताना या छोट्या गोष्टींचे भान ठेवल्यास मणक्याचे मोठे आजार सहज टाळता येऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT