उष्ण कटीबंधातील हवामानात डेंग्यूचा प्रसार जास्त प्रमाणात होतो. भारतात डेंग्यू ताप हा आजार प्रदेशनिष्ठ (एन्डेमिक) स्वरूपात आढळून येतो. डेंग्यू सर्व वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. भारतात सर्वप्रथम 1812 साली डेंग्यूची साथ उद्भवली होती. 1956 ते 1996 या चाळीस वर्षाच्या कालावधीत डेंग्यूच्या सुमारे साठ साथी भारतात नोंदविल्या गेल्या. डेंग्यू आजार शहरी आणि ग्रामिण भागात सर्वत्र सारख्याच प्रमाणात आढळून येतो. जगात दरवर्षी 4 ते 8 कोटी लोक या आजाराने ग्रस्त होतात.
एडीस डासाच्या अनेक जाती डेंग्यू संसर्ग पसरवतात. भारतात डेंग्यूचा प्रसार प्रामुख्याने एडीस इजिप्ति या प्रकारच्या डासामुळे होतो. घरातील व इमारतीलवरील पाण्याच्या उघड्या टाक्या, फुलदाण्या, रस्त्यांवरील खड्यांत खाचखळग्यात साचलेले पाणी, बांधकामाच्या ठिकाणच्या पाण्याच्या टाक्या, मातीची भांडी, आग विझविण्याच्या बादल्यातींल पाणी, रबराचे टायर्स, प्लॅस्टीकच्या बादल्या, यंत्रसामग्रीमध्ये साचलेले पाणी, नारळाच्या करवंट्या, झाडावरील पोकळीत साचलेले पाणी, तरणतलाव, फेकलेल्या पत्र्याचे डबे, कृत्रिम पाण्याचे साठे आणि उथळ विहिरी या व अशा काही ठिकाणी साचलेल्या पाण्यात एडीस डासांची उत्पत्ती होते.
एडीस डासाची मादी मुख्यत्वे दिवसा चावते. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या दरम्यान दंशाचे प्रमाण अधिक असते. डास दंशाची वेळ वर्षातील सर्व ऋतूंमध्ये सारखीच आढळून येते. नर एडीस डास माणसांना चावत नाही. तो फुलांमधील रस, वनस्पती रस यावर जगतो. तर एडीस मादीला दर 2 ते 3 दिवसांनी अंडी घालण्यासाठी मानवी रक्त पोषण म्हणून लागते. अंडे ते प्रौढ डास तयार होईपर्यंत जवळपास 7 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो. म्हणून डेंग्यू संसर्ग रोखण्यासाठी सर्व पाण्याचे साठे आठवड्यातून किमान एकदा तरी रिकामे करणे गरजेचे असते.
डेंग्यू हा एक विषाणूजन्य आजार आहे. डेंग्युचे विषाणू ‘गट ब आर्बोव्हायरस’ या प्रकारात मोडतात. हा आरएनए प्रकाराचा विषाणू असून ‘फ्लॅव्हिव्हिरिडे’ या कुटुंबातील आहे. या विषाणूचे चार प्रकार असतात. हे चारही प्रकारचे विषाणू एक सारखाच आजार माणसांमध्ये उत्पन्न करतात. डेंग्यू विषाणूच्या प्रसाराचे चक्र ‘माणूस-डास-माणूस’ असे असते. एडीस डासाच्या संसर्गबाधीत मादीच्या दंशामुळे डेंग़्यूचा प्रसार होतो. या डासांच्या पाठीवर आणि पायांवर विशिष्ट असे पांढरे पट्टे असतात. त्यामुळे त्यांना ‘टायगर डास’ असेही म्हणतात. एडीस डासाची मादी डेंग्यू विषाणुंनी संसर्गबाधित झालेल्या व्यक्तीला चावल्यानंत्तर हे विषाणू एडीस डासाच्या मादीच्या शरिरात प्रवेश करतात.
मादीच्या शरिरात जंतूंची वाढ आणि विकास होण्यासाठी 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो. या कालावधीला बाह्य बिजपोषण काळ असे म्हणतात. 8 ते 10 दिवसांनंतर ही विषाणूबाधित एडीस डासाची मादी दुसर्या व्यक्तीला चावल्यानंतर डेंग्यूचे विषाणू त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. एडीसची मादी संसर्गबाधित झाली की मग ती जीवनभर संसर्गजन्य राहते. या मादीचे जीवनचक्र जवळपास तीन आठवड्यांचे असते. माणसाच्या शरिरात विषाणूंचा प्रवेश झाल्यानंतर 5 ते 6 दिवसांनी डेंग्यू आजाराची लक्षणे दिसू लागतात. या कालावधीस ‘अंतर्गत बीजपोषण काळ’ म्हणतात.
डेंग्यू आजार अनेक लक्षणांचा आणि अवस्थांचा समुच्चय असतो. घशाचा दाह, नाकाचा दाह, खोकला आणि पचनसंस्थेची लक्षणे ही डेंग्युची काही सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. मुलांमध्ये या आजाराची तीव्रता प्रौढांपेक्षा कमी असते. या आजारची लक्षणे इतर विषाणूंच्या संसर्गानंतर उद्भवणार्या लक्षणांसारखीच आढळून येतात. अचानक थंडी वाजून ताप येणे. जेवणाची इच्छा कमी होणे, तोंडाची चव बिघडणे, खूप अशक्तपणा येणे, तीव्र डोकेदुखी, घसादुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी आणि कधी कधी पोटदुखी अशी लक्षणे रुग्णांमधे येतात
शारीरिक तपासणी आणि सर्वसाधारण लक्षणांवरून सौम्य स्वरूपाच्या डेंग्यूचे निदान करणे कठीण असते. डेंग्यूची लक्षणे इतर विषाणूजन्य संसर्ग (उदा. चिकूनगुन्या फीवर) रिकेटसिअल संसर्ग व इतर जीवाणूजन्य संसर्गामध्ये सुद्धा आढळून येतात. सखोल तपासणी, काळजीपूर्वक निरीक्षणे नोंदवून आणि प्रयोगशाळा चाचण्यांच्या निष्कर्षाच्या आधारे डेंग्यूचे निदान होणे आवश्यक असते. डेंग्यू हिमोर्हेजिक फीवर व डेंग्यू शॉक सिंड्रोम,डेंग्यूचे उपचार व प्रतिबंध या बाबत आपण पुढील लेखात जाणून घेऊ .
डासांच्या माध्यमातून फैलावणारा डेंग्यूचा ताप हा पावसाळ्यातील एक आघाडीचा संसर्गजन्य आजार आहे. वाढते शहरीकरण, लोकसंख्येचा विस्फोट, सार्वजनिक अस्वच्छता, कृत्रिम पाण्याचे साठे, घाणीचे साम्राज्य इत्यादींमुळे एडीस इजिप्ती डासांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारत आणि इतर दक्षिण-पूर्व आशिया खंडांमधील देशांमधे दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूची साथ उद्भवते. साधारणतः मे महिन्यात डेंग्यूची साथ उद्भवून त्याचे प्रमाण जुलै व ऑगस्ट महिन्यांपर्यंत वाढत जाते आणि नंतर ऑक्टोबरपर्यंत कमी कमी होत जाते. दाट लोकसंख्या, अस्वच्छता, पाण्याचे कृत्रिम साठे इ.कारणे साथ उद्भवण्यास कारणीभूत ठरतात.