Pregnancy Care Tips | गर्भावस्थेतील डेंग्यूमुळे वाढतो अकाली प्रसूतीचा धोका 
आरोग्य

Pregnancy Care Tips | गर्भावस्थेतील डेंग्यूमुळे वाढतो अकाली प्रसूतीचा धोका

पुढारी वृत्तसेवा

डॉ. प्रतिमा थमके

पावसाला सुरुवात होताच डासांची संख्या झपाट्याने वाढते. त्यामुळे डेंग्यूसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. विशेषतः गर्भवती महिलांनी या काळात अधिक सावध राहणे गरजेचे आहे. डेंग्यूचा संसर्ग आई आणि बाळ या दोघांच्याही आरोग्यास घातक ठरू शकतो. त्यामुळे वेळीच निदान आणि योग्य उपचार अत्यंत महत्त्वाचे आहे.

पावसाळ्यात घरात साठवून ठेवलेले पाणी किंवा आजूबाजूच्या परिसरात साचलेले पाणी जसे की कुंड्या, बादल्या, कूलर, बांधकामांच्या ठिकाणी साचलेले अस्वच्छ पाणी हे डेंग्यू पसरवणाऱ्या एडीस डासांच्या प्रजननासाठी पोषक ठरते. या डासांची संख्या वाढल्याने डेंग्यूचा प्रसार वाढतो. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला डेंग्यूची प्रकरणे मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

गर्भावस्थेत आढळणारी डेंग्यूची लक्षणे

गर्भवती महिलांमध्ये डेंग्यूची लक्षणे इतरांप्रमाणेच दिसून येतात.

• तीव्र ताप • डोकेदुखी • अंगदुखी व सांधेदुखी • मळमळ आणि उलट्या • थकवा • त्वचेवर पुरळ

वरील लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

गर्भावस्थेत डेंग्यूचा संसर्ग अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतो. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन), प्लेटलेटस्‌ची संख्या कमी होणे, रक्तस्रावाचा धोका आणि आईच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये डेंग्यूमुळे रक्ताभिसरण आणि अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे आईचे आरोग्य बिघडू शकते आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम गर्भातील बाळाच्या वाढीवर व आरोग्यावर होऊ शकतो.

अकाली प्रसूतीचा वाढता धोका

डेंग्यूचा तीव्र संसर्ग झाल्यास शरीरावर ताण निर्माण होतो. यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते आणि अकाली प्रसूती (Preterm Labour) होण्याचा धोका वाढू शकतो. काही महिलांमध्ये प्लेटलेटस्‌ची संख्या धोकादायकरीत्या कमी झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची गरजही भासू शकते.

स्वमर्जीने औषधोपचार करणे टाळा

गर्भवती महिलांनी ताप आल्यास स्वतःहून कोणतीही औषधे घेऊ नयेत. विशेषतः काही वेदनाशामक औषधे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये रक्तस्रावाचा धोका वाढवू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेणे टाळावे.

डेंग्यूपासून संरक्षणासाठी खालील उपाय प्रभावी ठरू शकतात :

• घराच्या आत व बाहेर पाणी साचू देऊ नका.

• झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.

• खिडक्या आणि दरवाजांवर जाळ्या बसवा.

• डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरक्षित मॉस्किटो रिपेलंट वापरा.

• संपूर्ण अंग झाकले जाईल असे पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.

• संध्याकाळच्या वेळी खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा.

• नियमित प्रसूतीपूर्व तपासण्या करून घ्या.

एक डास चावणे हे देखील गर्भवती महिलांसाठी गंभीर समस्या निर्माण करू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. योग्य प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घेतल्यामुळे आई आणि बाळ या दोघांनाही डेंग्यूपासून सुरक्षित ठेवता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT