Dehydration Joint Pain | डिहायड्रेशनमुळे सांधेदुखी Pudhari File Photo
आरोग्य

Dehydration Joint Pain | डिहायड्रेशनमुळे सांधेदुखी

पुढारी वृत्तसेवा

डॉ. प्राजक्ता पाटील

जड वस्तू उचलल्या नसतानाही किंवा चुकीच्या पद्धतीने बसलेले नसतानाही कधी अचानक कमरेत दुखणे जाणवले आहे का? बहुतेक वेळा अशा वेदनांचे कारण चुकीची देहबोली, स्नायूंवर आलेला ताण किंवा इजा असे मानले जाते; मात्र अनेकदा दुर्लक्षित राहणारे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता.

शरीरातील पाणी कमी झाले, तर त्याचा थेट परिणाम पाठीच्या आरोग्यावर होऊ शकतो आणि वेदना प्रत्यक्ष जाणवू शकतात. मानवी मणक्यांची रचना नीट कार्यरत राहण्यासाठी पाण्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. शरीरातील द्रवांचे प्रमाण कमी झाले की, त्याचा परिणाम मणक्यांमधील डिस्क, सांधे, स्नायू आणि मज्जासंस्थेवर होतो. यामुळे वेदना वाढू शकतात, स्नायूंमध्ये आकडी येऊ शकते आणि हालचालींवर मर्यादा येऊ शकतात.

पाण्याच्या कमतरतेमुळे पाठदुखी कशी होते, हे समजून घेतल्यास त्यामागील प्रक्रिया अधिक स्पष्ट होते. मणक्यांमधील डिस्क या उशांसारख्या काम करतात. या डिस्क साधारणतः 80 टक्के पाण्याने बनलेल्या असतात. शरीरात पाणी कमी झाले की, या डिस्क कोरड्या पडू लागतात, त्यांचा लवचिकपणा कमी होतो आणि धक्के शोषून घेण्याची क्षमता घटते. परिणामी, मणक्यांवर अधिक ताण येतो आणि वेदना वाढतात. दीर्घकाळ पाण्याची कमतरता राहिल्यास डिस्क झिजण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते किंवा आधीच असलेल्या स्लिप डिस्कसारख्या तक्रारी तीव्र होऊ शकतात.

पाठीचे स्नायू सुरळीत राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी आणि इलेक्ट्रोलाईटस् आवश्यक असतात. शरीरातील सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांचा समतोल बिघडला की स्नायूंमध्ये अचानक आकडी आणि ताठरपणा निर्माण होतो. यामागे पाण्याची कमतरता कारणीभूत असू शकते.

सांध्यांमध्ये असलेले सायनोव्हियल द्रव हाडांमधील घर्षण कमी करतो. शरीरात पाणी कमी झाले, की या द्रवाचे प्रमाण घटते. परिणामी, हाडांमधील घर्षण वाढते, कडकपणा जाणवतो आणि हालचाल करताना वेदना होतात. कमरेच्या आणि पाठीच्या भागात ही समस्या अधिक ठळकपणे दिसून येते. याखेरीज शरीर निर्जलित अवस्थेत असताना मज्जासंस्थेची कार्यक्षमता कमी होते, वेदनांची जाणीव अधिक तीव्र होते आणि अगदी किरकोळ हालचालींनीही दुखणे जाणवू लागते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT