Social Media Diet Pudhari Online
आरोग्य

Social Media Diet | सोशल मीडियावरील 'त्या' डाएट ट्रेंडचा घातक परिणाम

सध्या सोशल मीडियावर अतिरिक्त डाएटिंगच्या ट्रेंडचा प्रभाव वाढत असून, त्यामुळे अनेक लोक अपायकारक आणि धोकादायक आहार पद्धती स्वीकारत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

सध्या सोशल मीडियावर अतिरिक्त डाएटिंगच्या ट्रेंडचा प्रभाव वाढत असून, त्यामुळे अनेक लोक अपायकारक आणि धोकादायक आहार पद्धती स्वीकारत आहेत. केरळमधील प्रकरणात संबंधित तरुणीने महिनोनमहिने केवळ गरम पाणी पिऊन उपवास केला होता. तिने आपल्या खाण्याच्या सवयी कुटुंबापासून लपवल्या होत्या; पण असले अघोरी उपाय जीवघेणे ठरू शकतात.

केरळ येथील ठालासेरीमध्ये घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेची सध्या समाजमाध्यमांत चर्चा आहे. वजन कमी करण्याच्या तीव्र ध्यासाने ग्रस्त असलेल्या १८ वर्षीय मुलीचा, प्रदीर्घ काळ उपाशी राहिल्यामुळे झालेल्या तीव्र गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला. जवळपास सहा महिने अन्नच न खाल्ल्यामुळे तिची प्रकृती गंभीरपणे बिघडली होती. मृत्यूच्या १२ दिवस आधी तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.

मात्र, वैद्यकीय उपचार देऊनही तिचे प्राण वाचवता आले नाहीत. सदर रुग्णालयातील सल्लागार डॉक्टर नागेश मनोहर प्रभू यांच्या मते, मुलीची प्रकृती अत्यंत अशक्त होती. तिचे वजन केवळ २४ किलो होते आणि हाय शुगर, सोडियम तसेच रक्तदाब अत्यंत कमी झाल्याने ती गंभीर अवस्थेत होती.

उपचार देऊनही तिचे शरीर त्यास प्रतिसाद देऊ शकत नव्हते, अगदी व्हेंटिलेटरच्या साहाय्यानेही. अखेर तिची प्रकृती सतत ढासळत गेली आणि दुर्दैवाने तिचा अकाली मृत्यू झाला. अलीकडील काळात वजन कमी करण्यासाठी अनेक लोक अत्यंत कठोर डाएट आणि उपवासाचा अवलंब करतात. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा अतिरिक्त उपायांचे गंभीर परिणाम शरीरावर होऊ शकतात. त्यात तीव्र कुपोषण, अवयव निकामी होणे, तसेच चयापचय प्रणाली बिघडणे यांचा समावेश होतो.

उपवास हा काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकतो. मात्र, तो केवळ वैद्यकीय सल्ल्याने आणि योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे. दीर्घकाळ फक्त पाण्यावर उपाशी राहण्यासारख्या टोकाच्या पद्धती शरीराला कधीही न भरून येणारी हानी पोहोचवू शकतात. अॅनॉरेक्सिया नवर्वोसा समजून घ्या नॅशनल इन्स्टिट्यूटस् ऑफ हेल्थच्या मते, अॅनॉरेक्सिया नर्वोसा हा एक खाण्याचा विकार असून, तो अत्यंत कमी प्रमाणात कॅलरीज घेण्याशी संबंधित आहे.

असे केल्यामुळे व्यक्तीचे वजन लक्षणीयरीत्या घटते. या विकाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना वजन वाढण्याची तीव्र भीती वाटते. त्यांची स्वतःच्या शरीराविषयीची धारणा विकृत झालेली असते. त्यामुळे त्यांना स्वतःचे अत्यंत कमी झालेले वजन गंभीर स्वरूपाचे आहे, हेही समजत नाही. सामाजिक दबाव, सोशल मीडियाचा प्रभाव, मानसिक तणाव आणि अनुवंशिक कारणे ही अॅनॉरेक्सियाच्या वाढीमागील प्रमुख कारणे असू शकतात. वेळीच लक्ष न दिल्यास आणि योग्य वैद्यकीय मदत न मिळाल्यास या विकारामुळे मृत्यूसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

अतिरिक्त वजन घटवल्याने कोणते परिणाम होऊ शकतात?

एनआयएचच्या अभ्यासानुसार, अॅनॉरेक्सियामुळे अनेक अवयव प्रणालींवर परिणाम होतो.

* ब्रेडिकार्डिया (हृदयाचे मंदगती ठोके), हायपो टेन्शन आणि माईट्रल वॉल्व प्रोलॅप्स यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

* वजन अत्यंत कमी झाल्याने शरीराची एकंदरीत वाढ खुंटू शकते. तसेच हायपोथर्मिया (शरीराचे तापमान खूपच कमी होणे), स्नायूंचे क्षय होणे अशा स्थिती उद्भवू शकतात.

* कॅरोटेनोडर्मा, लॅनुगो आणि झेरोसिस (त्वचा कोरडी आणि खडबडीत होणे) यांसारखे विकार दिसून येतात.

* हाडे ठिसूळ होणे (ऑस्टिओपोरोसिस), प्रजननासंबंधी अडचणी निर्माण होणे.

* गॅस्ट्रोपेरेसिस (पचनसंस्थेच्या हालचाली मंदावणे), बद्धकोष्ठता, विशेषतः रेचक औषधांच्या (लॅक्सेंटिव्हज्) अतिवापरामुळे.

* मेंदूचा आकार कमी होणे, मज्जासंस्थेच्या समस्या यांसह मूत्रपिंड निकामी होणे, चयापचय प्रणाली बिघडणे, नैराश्य, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव आणि झोपेच्या समस्या निर्माण होणे अशा असंख्य समस्या आणि व्याधीविकार जडण्याची भीती असते.

सध्या तरुण पिढीमध्ये वाढत चाललेले नवनवीन डाएट फॅड लक्षात घेता पालक, शिक्षक आणि आरोग्य तज्ज्ञांनी एकत्र येऊन तरुणांना आरोग्यदायी आहाराच्या सवयी अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. तसेच, शरीराच्या प्रतिमेसंदर्भातील समस्या असलेल्या व्यक्तींना समुपदेशन व वैद्यकीय मदत मिळायला हवी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT