Ronaldo Workout Routine | चाळीशीतही 28 वर्षांचा दिसतो रोनाल्डो, जाणून घ्या त्याचा फिटनेस मंत्र Pudhari File Photo
आरोग्य

Ronaldo Workout Routine | चाळीशीतही 28 वर्षांचा दिसतो रोनाल्डो, जाणून घ्या त्याचा फिटनेस मंत्र

पुढारी वृत्तसेवा

मंजिरी फडके, आहारतज्ज्ञ

क्रिस्टियानो रोनाल्डोने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो दररोज सुमारे 17,000 पावले चालतो. त्याच्या मते चांगली झोप ही फिटनेसचा महत्त्वाचा भाग आहे. कारण, शरीर झोपेतच आपले पुनरुज्जीवन करते. रोनाल्डो रात्री साधारणतः 11 वाजता झोपतो आणि सकाळी 8.30 च्या सुमारास उठतो; मात्र तो एकाच वेळी 6 ते 8 तास झोप न घेता दिवसभरात 90-90 मिनिटांच्या पाच झोप घेतो. या प्रकाराला पॉलिफेसिक स्लीप म्हटले जाते. तो भु्रणाच्या स्थितीत झोपतो, जे मानसिक ताजेपणा आणि एकाग्रतेसाठी फायदेशीर मानले जाते.

रोनाल्डोचा व्यायामक्रम

प्रत्येक मॅचनंतर रोनाल्डो अर्धा तास पोहतो. मानसिक ताण कमी करण्यासाठी तो कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवतो. त्याचा व्यायाम प्रामुख्याने कार्डिओ प्रकारांचा असतो. धावणे, रोइंग आणि वेटलिफ्टिंग. मांसपेशी सक्रिय ठेवण्यासाठी तो क्विक लेग वर्कआउट आणि वॉर्मअप करतो. त्याचबरोबर पोहणे, सायकलिंग आणि बॉडीवेट व्यायाम हेदेखील त्याच्या दिनचर्येचा भाग आहेत.

रोनाल्डोचा आहार

त्याचा आहार सामान्य माणसांपेक्षा वेगळा असतो. तो दिवसभरात दोन वेळा नाश्ता, दोन वेळा दुपारचे जेवण आणि दोन वेळा रात्रीचे जेवण घेतो. त्याच्या आहारात सॅलड, फळं, भाज्या, संपूर्ण धान्य, अंडी, मासे आणि चिकन असते. या प्रोटीनयुक्त आहारातून ओमेगा-3फॅटी अ‍ॅसिडस् मिळतात, जे वृद्धत्व विरोधात कार्य करतात. नाश्त्यात तो अंड्याचा पांढरा भाग, अवोकाडो टोस्ट, साबुत धान्य आणि फळं खातो. दुपारी हिरव्या भाज्या, उकडलेली अंडी, चिकन व मासे घेतो. रात्री हलका आहार - सॅलड, चिकन आणि कलिंगड असा असतो.

क्रायोथेरपीद्वारे स्नायूंची पुनर्बांधणी

रोनाल्डो नियमितपणे क्रायोथेरपी घेतो. क्रायोथेरपी म्हणजे शरीराला अतिशय थंड तापमानात काही वेळ ठेवणे, ज्यामुळे सूज कमी होते आणि स्नायू लवकर बरे होतात. रोनाल्डो -130 अंश सेल्सियस तापमान असलेल्या विशेष कक्षात 3 मिनिटे राहतो. या प्रक्रियेमुळे वयानुसार शरीरात होणार्‍या बदलांशी सामना करण्यास मदत होते आणि त्याच्या शरीराची झपाट्याने रिकव्हरी होते.

क्रिस्टियानो रोनाल्डोच्या फिटनेसचं रहस्य म्हणजे अत्यंत काटेकोर झोप, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि विशेष उपचार पद्धतींचा समावेश. वय वाढत चाललं असलं, तरी त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे तो आजही तरुण, तंदुरुस्त आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरतो.

क्रिस्टियानो रोनाल्डो जगभरात केवळ त्याच्या फुटबॉल खेळासाठी नव्हे, तर त्याच्या जबरदस्त फिटनेससाठीदेखील सतत चर्चेत असतो. वयाच्या 40व्या वर्षीही 28 वर्षांच्या तरुणासारखा दिसणार्‍या रोनाल्डोच्या तरुणाईचं रहस्य जाणून घेण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे, रोनाल्डो त्याच्या वर्कआऊट आणि डाएटबाबतीत कधीच तडजोड करत नाही. त्याचा दैनंदिन आहार आणि व्यायामक्रम अतिशय शिस्तबद्ध असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT