Creatine for women health | क्रिएटिन आणि महिलांचे आरोग्य  
आरोग्य

Creatine for women health | क्रिएटिन आणि महिलांचे आरोग्य

पुढारी वृत्तसेवा

डॉ. प्राजक्ता गायकवाड

वर्षानुवर्षे केवळ शरीरसौष्ठव आणि व्यायामाशी संबंधित पूरक आहार (सप्लिमेंट) म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘क्रिएटिन’कडे आता महिलांच्या आरोग्याच्या द़ृष्टीने एक महत्त्वाचे घटक म्हणून पाहिले जात आहे. आरोग्य क्षेत्रात होत असलेल्या नवीन संशोधनांनुसार, क्रिएटिन केवळ स्नायूंसाठीच नाही, तर स्त्रियांच्या पुनरुत्पादन संस्थेच्या ऊर्जेसाठीही उपयुक्त ठरू शकते.

पेशींमधील ऊर्जा आणि मासिक पाळीचा संबंध

स्त्री शरीरातील अंडाशय (ओव्हरीज) हे सर्वाधिक ऊर्जेची मागणी करणार्‍या अवयवांपैकी एक आहे. बीजांड उत्सर्जन (ओव्ह्युलेशन), संप्रेरकांचे संकेत आणि गर्भाशयाच्या अस्तराची तयारी या सर्व प्रक्रिया ‘अ‍ॅडिनोसाईन ट्रायफॉस्फेट’ या पेशींमधील ऊर्जेवर अवलंबून असतात. जेव्हा शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होते, तेव्हा या प्रक्रिया मंदावतात. ज्या स्त्रियांमध्ये उच्च शारीरिक ताण, आहारातील अनियमितता किंवा इन्सुलिनचा प्रतिकार यांसारख्या समस्या असतात. त्यांच्यामध्ये ऊर्जेच्या अभावामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते. क्रिएटिन हे या एटीपी ऊर्जेच्या पुनर्वापराला मदत करते, ज्यामुळे पुनरुत्पादन पेशींना आवश्यक ऊर्जा पुरवठा होण्यास साहाय्य मिळते.

पीसीओएस आणि इन्सुलिनची संवेदनशीलता

मासिक पाळीतील अनियमिततेचे मुख्य कारण असलेल्या ‘पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’मध्ये इन्सुलिनचा प्रतिकार ही मोठी समस्या असते. ‘न्यूट्रिएंटस्’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, क्रिएटिनमुळे स्नायूंच्या पेशींमधील ग्लुकोज शोषून घेण्याची क्षमता वाढते आणि इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते. इन्सुलिनचे नियमन सुधारल्याचा सकारात्मक परिणाम अंडाशयाच्या कार्यावर आणि बीजांड उत्सर्जनाच्या नियमिततेवर होतो. मात्र, तज्ज्ञांच्या मते, क्रिएटिन हे पीसीओएसवरचे थेट औषध नसून ते योग्य आहार आणि व्यायामासोबत एक पूरक घटक म्हणून काम करू शकते.

स्त्रीची प्रजनन क्षमता ही अंडाशयातील पेशींच्या ऊर्जेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. अंड्यांची परिपक्वता आणि गर्भाच्या सुरुवातीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची गरज असते. क्रिएटिनमुळे पेशींमधील ऊर्जेची उपलब्धता कायम राखण्यास मदत होते, ज्याचा सकारात्मक परिणाम पुनरुत्पादन ऊतींच्या आरोग्यावर होऊ शकतो. असे असले, तरी क्रिएटिन थेट प्रजनन क्षमता वाढवते किंवा वंध्यत्वावर उपचार करते, असे कोणतेही ठोस क्लिनिकल पुरावे अद्याप उपलब्ध नाहीत. हे केवळ एक सहायक घटक म्हणून पाहिले पाहिजे.

क्रिएटिन हे संप्रेरकांचे (हार्मोन्स) थेट नियमन करत नाही, तर ते केवळ पेशींच्या चयापचय क्रियेला आधार देते. निरोगी स्त्रियांसाठी याचे सामान्य डोस सुरक्षित मानले जातात; परंतु पीसीओएस किंवा इतर आरोग्य समस्या असलेल्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचे सेवन करू नये. हे सप्लिमेंट म्हणजे कोणत्याही आजारावरील पूर्ण उपचार नसून, संतुलित जीवनशैलीचा एक भाग असू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT