Correct Water Drinking habits | तुम्ही चुकीच्या पद्धतीने पाणी पीत आहात; वेळीच सुधारा 'या' सवयी 
आरोग्य

Correct Water Drinking habits | तुम्ही चुकीच्या पद्धतीने पाणी पीत आहात; वेळीच सुधारा 'या' सवयी

पुढारी वृत्तसेवा

डॉ. मनोज शिंगाडे

अनेकांना हे वाचून धक्का बसेल; पण ओठ फुटणे, डोळ्यांखालील काळी वर्तुळे, त्वचा कोरडी होणे, केस तुटणे, पिंपल्स, वारंवार लघवी होणे किंवा जळजळ होणे अशा अनेक त्रासांमागे चुकीच्या पद्धतीने पाणी पिण्याचाही मोठा वाटा असू शकतो.

पाणी किती प्यायचे, हे सर्वांना माहीत असते; पण पाणी कसे पिणे चुकीचे ठरू शकते, हे मात्र फार कमी लोकांना समजते. पाणी पिण्याच्या काही सवयी आरोग्यास हानी पोहोचवू शकतात.

गटागट पाणी पिणे : अनेकजण एकदम पाणी गिळतात किंवा बाटली तोंडापासून अंतरावर धरून पितात. अशाप्रकारे पाणी थेट घशातून पोटात जाते. पोटातील आम्लीय द्रवांवर अचानक येणार्‍या जास्त प्रमाणातील पाण्याचा परिणाम होऊन वायू, फुगणे किंवा अ‍ॅसिडिटी वाढते. त्याउलट पाणी हळूहळू, छोट्या घोटांनी प्यायले असता ते सर्वप्रथम जिभेला स्पर्श करते. जिभेवरील क्षारीय लाळ पाण्यात मिसळून पोटातील आम्लीय वातावरणाशी संतुलन साधण्यास मदत करते. यामुळे पचन सुधारते आणि अनावश्यक त्रास कमी होतो.

पाण्याचे तापमान जाणीवपूर्वक दुर्लक्षित करणे : ऋतूनुसार पाणी कसे प्यावे, हे महत्त्वाचे आहे. थंड पाणी उन्हाळ्यात ताजेतवाने वाटते; पण सतत फ्रिजमधील पाणी पिण्याने घसा बसणे, सर्दी, अ‍ॅलर्जी अशा समस्यांचा धोका वाढतो. काही संशोधनांनुसार थंड पाण्याने मायग्रेन वाढू शकतो किंवा नाकातील श्लेष्मा साचण्याचा त्रास वाढतो. काही वैद्यकीय स्थितींमध्ये जसे अ‍ॅकलेशिया, थंड पाणी वेदना वाढवू शकते. दुसरीकडे, कोमट पाणी पचन सुधारते, कॅलरी बर्न करण्यास मदत करते आणि शरीराला आराम देते. उन्हाळ्यात थंड पाण्याच्या ऐवजी माठातील पाणी सर्वोत्तम मानले जाते.

तिसरी चूक म्हणजे जेवणाच्या अगदी आधी किंवा जेवणानंतर लगेच पाणी पिणे. असे केल्याने पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो. पाण्यामुळे पोटामध्ये पचनासाठी आवश्यक एन्झाइम्स पातळ होतात, अन्न एकत्रित होण्याची प्रक्रिया मंदावते आणि त्यामुळे गॅस, फुगणे, जडपणा अशा समस्या उद्भवू शकतात. जेवणाच्या 30 मिनिटे आधी किंवा 30 मिनिटे नंतर पाणी घेणे योग्य मानले जाते.

चौथी चूक म्हणजे व्यायामानंतर लगेच घटाघट पाणी पिणे. व्यायामादरम्यान शरीरातील पाणी कमी होते आणि घसा कोरडा पडतो; पण व्यायामानंतर मोठ्या घोटांनी थंड किंवा जास्त पाणी पिणे धोकादायक ठरू शकते. श्वासोच्छ्वास वेगाने चालू असल्याने घोट लागण्याची शक्यता वाढते. त्यामुळे व्यायामादरम्यान प्रत्येक 10 ते 15 मिनिटांनी थोडे थोडे घोट घेणे आणि व्यायामानंतर शरीर शांत झाल्यावर हळूहळू पाणी पिणे अधिक सुरक्षित असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT