आरोग्य

नाशिक : बजरंगवाडीतील गर्भवती महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

Pudhari News

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहरातील बजरंगवाडी परिसरातील २० वर्षीय गर्भवती महिलेस कोरोना असल्याचा अहवाल बुधवारी (दि. ६) प्राप्त झाला आहे. दरम्यान या महिलेचा २ मे रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्याची पहिली घटना समोर आली आहे.

वाचा : नाशिक-पुणे रोडवरील बजरंगवाडी परिसर सील 

नाशिक पुणे महामार्गावरील बजरंगवाडी परिसरात या महिलेचा भाऊ राहतो. काही दिवसांपूर्वीच ही महिला सिन्नर येथून भावाकडे राहण्यास आली होती. तिला हृदयाचा त्रास जाणवू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे खबरदारी म्हणून तिच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेण्यात आला. दरम्यान २ मे रोजी तिला दाखल केल्यानंतर दोन तासांतच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला असून तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे शहरात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर मनपा प्रशासनाने तातडीने बजरंगवाडी परिसराची तपासणी सुरु केली असून तेथील परिसरात प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या महिलेस कोरोनाची लागण कशी झाली याचा शोध मनपा प्रशासन घेत आहे.

तसेच या महिलेचा शहरात कोणत्या परिसरात वावर होता, तिच्या कुटूंबियांची सर्व माहिती गोळा केली जात आहे. या महिलेवर प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार अंत्यसंस्कार झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली.

७५ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह 

बुधवारी ८० अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ७५ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सटाणा, सिन्नर, बजरंग नगर येथील महिला आणि येवला येथील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, तर एक कोरोनाग्रस्ताचा दुसराही अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. तर मालेगाव येथील १४ पैकी १३ अहवाल निगेटिव्ह आला आहे. एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

वाचा : नाशिक : सटाण्यात कोरोनाचा शिरकाव  

SCROLL FOR NEXT