डॉ. अनिल मडके
सीओपीडी या आजाराचे प्रमाण दिवसागणिक वाढत असून मृत्यूच्या कारणांमध्ये याचा तिसरा क्रमांक लागतो. सीओपीडी दिनानिमित्त यावर्षीचे घोषवाक्य आहे "Short of Breath, Think COPD' दम लागत असेल, तर तो सीओपीडी नाही, याची खात्री करा.
नोव्हेंबरमधील तिसरा बुधवार म्हणजे यावर्षी 19 नोव्हेंबरला ‘जागतिक सीओपीडी दिवस’ म्हणून जगभर साजरा करण्यात आला. COPD (Chronic Obstructive Pulmonary Disease) हा एक फुफ्फुसाचा दीर्घकालीन चिवट विकार आहे, ज्यामध्ये फुफ्फुसात श्वसनाद्वारे आत घेतलेली हवा पूर्णत्वाने बाहेर सोडणे मुश्कील होते. त्यामुळे काहीअंशी हवा फुफ्फुसात अडकते आणि श्वासोच्छ्वास कठीण होतो. शरीराला पुरेसा प्राणवायू मिळण्यात अडथळा येतो.
याचे दोन मुख्य घटक आहेत.
1. क्रॉनिक ब्राँकायटिस - सतत कफ आणि खोकला येणे, वारंवार छातीमध्ये जंतुसंसर्ग होणे.
2. एम्फायझिमा - फुफ्फुसातील वायुकोश बाधित होऊन त्यात हवा अडकणे.
या दोन्ही प्रकारांमुळे चालताना, जिना चढताना, काही काम करताना धाप लागते.
विडी, सिगारेट किंवा अन्य प्रकारे धूम्रपान करणारे आणि अशा व्यक्तींच्या सान्निध्यात येणार्या व्यक्ती, चुलीचा, बंबाचा किंवा कचरा इत्यादी पेटविल्यामुळे होणार्या धुराच्या सान्निध्यात येणार्या व्यक्ती, विविध कारखाने किंवा गिरण्या येथील धूळ किंवा रसायनांचा संपर्क, वातावरणातील किंवा घरातील वायू प्रदूषण, बालवयात वारंवार झालेले फुफ्फुसाचे विकार, आनुवंशिक घटक. सीओपीडी संसर्गजन्य नाही; पण फुफ्फुसातील जंतुसंसर्गाकडे दुर्लक्ष केल्यास हा त्रास वाढत जातो.
पल्मोनरी फंक्शन टेस्ट (स्पायरोमेट्री) या साध्या फुंक मारून करण्याच्या चाचणीद्वारे फुफ्फुसाची क्षमता समजते. याशिवाय एक्स-रे, सीटी स्कॅन, ऑक्सिजनचे प्रमाण अशा चाचण्या उपयुक्त ठरतात.
उपचार : आपल्या फुफ्फुसाची वेळीच तपासणी करून सीओपीडीचे निदान करावे. श्वासावाटे घेण्याची अनेक आधुनिक औषधे आज उपलब्ध आहेत. ती नियमितपणे घ्यावीत. खोकला किंवा कफ वाढला, कफाचा रंग बदलला, तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा. धूम्रपान त्वरित थांबवावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने श्वसनाचे व्यायाम करावेत. न्यूमोनिया होऊ नये म्हणून फ्लू-न्यूमोकॉकल लस घ्यावी. आजार पुढच्या टप्प्यात गेला असेल, तर ऑक्सिजन थेरपी घ्यावी. धूर, धूळ आणि एकंदर प्रदूषणापासून दूर राहावे.
प्रतिबंध : धूम्रपान व तंबाखूचा वापर पूर्ण बंद करणे, चुलीचा वापर बंद किंवा कमीत कमी करणे. समाधान चूल या प्रकारची चूल वापरणे म्हणजे घरात धूर होणार नाही. स्वयंपाकघरात चिमणी किंवा एक्झॉस्ट वापरणे
घरात वायुविजन होईल असे धूरमुक्त वातावरण ठेवणे. प्रदूषित वातावरणात बाहेर जाताना एन -95 प्रकारचा मास्क वापरणे.
सीओपीडीचे निदान झालेल्या व्यक्तींनी सर्दी-खोकल्याकडे दुर्लक्ष करू नये. लक्षणे दिसताच डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेणे आवश्यक असते. सकस-पोषक आहार, पुरेशी झोप आणि ताणतणाव विरहित दैनंदिनी ही निरोगी दीर्घायुष्याची गुरुकिल्ली असते, हे सर्वांनीच लक्षात ठेवावे.
जिने चढताना किंवा चालताना किंवा काम करताना धाप लागणे, सकाळच्या वेळी सतत खोकला येणे, वारंवार कफ पडणे, छातीतून घरघर आवाज येणे, छातीवर दडपण आल्यासारखे वाटणे, वारंवार फुफ्फुसामध्ये जंतुसंसर्ग होणे, भूक मंदावणे, वजन कमी होणे, थोड्या हालचालींमुळे दम लागणे इ. ही लक्षणे वयामुळे आहेत किंवा अमुक एका कारणामुळे आहेत, अशा गैरसमजातून स्वतःची वैद्यकीय तपासणी केली जात नाही आणि त्यामुळे सीओपीडी हा आजार वाढत जातो.